ही वेळ राजकारण करण्याची नसून सर्वांनी समन्वयाने कोरोनावर मात करण्याची आहे- आ. श्वेता महाले पाटील

24

✒️अंबादास पवार(विशेष प्रतिनिधी)

चिखली(दि.14मे):- कोरोना चे संकट आल्यापासून कोरोना नियंत्रणासाठी कोरोना रुग्णांना कमीत कमी त्रास व्हावा , त्यांना मोफत अथवा कमीत कमी किंमतीमध्ये उपचार मिळावेत याकरिता मी गत एक वर्षापासून प्रयत्न करीत आहे. ऑक्सिजन मिळवून देणे , रेमडीसिविर चा पुरवठा कमी होत असताना तो गरजू रुग्णांना मिळावा यासाठी प्रयत्न करणे हे लोकप्रतिनिधी म्हणून माझे कर्तव्य आहे व ते कर्तव्य मी प्रामाणिकपणे पार पाडत आहे. कोरोना नियंत्रणासाठी काम करीत असताना अनेक रुग्णांनी डॉक्टरांचे मन भरून कौतुक केले.

परंतु त्याच वेळेस काही डॉक्टरांचे पेशंट सोबत उर्मट वागणे, आरेरावी करणे, जास्तीची बिले आकारणी, अतिरिक्त किमतीमध्ये रेमडीसीवीर विकणे अशा तक्रारीही केल्या. माननीय पालकमंत्री डॉक्टर राजेंद्रजी शिंगणे साहेब यांनी घेतलेल्या बैठकीमध्ये सर्व लोकप्रतिनिधींनी रुग्णांच्या होणाऱ्या हेळसांड याबद्दल चिंता व्यक्त केली व या बैठकीमध्ये रुग्णालयांचे ऑडिट करण्याचा निर्णय घेण्यात आला व तो देखील गोरगरीब जनतेसाठी. रुग्णालयाचे ऑडिट होत असताना प्रामाणिकपणे दिवस-रात्र कष्ट करणाऱ्या 90% डॉक्टरांवर थोडा अतिरिक्त ताण येईल हे खरे आहे . यामुळे ज्या 90 % चांगले काम करणाऱ्या डॉक्टरांना त्रास होणार आहे त्यांची मी माफी मागते.

परंतु जे प्रामाणिकपणे सेवा देत आहे त्यांची या त्रासासाठी तयारी आहे. परंतु ज्यांचे पितळ उघडे पडेल असे वाटते ते खळखळ करीतच राहणार. जिल्हा प्रशासनाकडे याबाबत अनेक तक्रारी आल्या , वृत्तपत्रांनी रेमडीसीवीरचा काळाबाजार , लाखो रुपयांच्या देयकाबाबत रकानेच्या रकाने भरून आली. दूरचित्रवाणीवर व सोशल मीडियावर वैद्यकीय क्षेत्रातल्या या काळ्या बाजूवर अनेक प्रहार झाले. परंतु प्रत्यक्षात जेव्हा रेमडीसीवीरचे वाटप जिल्हा प्रशासनाने हातात घेतले , बिलांबाबत तपासणीसाठी कमिटी नेमली त्याचवेळी त्यावर नाराजी व्यक्त न करता किंवा त्याबद्दल कुणावरही त्याचे खापर न फोडता जिल्हाधिकारी यांनी या आणीबाणीच्या काळात घेतलेल्या या निर्णयाचे स्वागत करून आपला पारदर्शी कारभार दाखवून देऊन वैद्यकीय क्षेत्रावरील संशयाचे गडद होत असलेले ढग दूर करता येणे शक्य होते / आहे. वैद्यकीय क्षेत्रात असे गैरकृत्य करणारे काही मोजकेच लोक आहेत. ते कोण आहेत हे सर्वाना माहीत आहेत. अशा गैरकृत्य करणाऱ्यांसाठी प्रामाणिकपणे कार्य करणाऱ्यांनी त्यांचे समर्थन करून स्वतःवर संशय ओढवून घेऊ नये.

परंतु या 90 टक्के डॉक्टर्सवर परिस्थिती ओढवली आहे केवळ दहा टक्के चुकीच्या वागणाऱ्या डॉक्टर्स मुळे. काही माजी लोकप्रतिनिधीनी शेतकऱ्यांच्या जिल्हा बँकेचे 50 कोटी पेक्षा जास्त रक्कम थकविली . शेतकऱ्यांची कर्जमाफीही खाल्ली. त्यामुळे कधी कधी आम्हालाही नागरिकांच्या नाराजीचा सामना करावा लागतो. परंतु ज्याप्रमाणे एक लोकप्रतिनिधी भ्रष्टाचारी आहे म्हणून सर्व लोकप्रतिनिधी भ्रष्टाचारी होत नाहीत त्याचप्रमाणे काही डॉक्टर्स चुकीचे आकडे दाखवतात म्हणून नव्वद टक्के प्रामाणिक कार्य करणारे डॉक्‍टर्स दोषी ठरत नाही. कोरोनाच्या संकटामध्ये राजकारण न करता कोरोना रुग्णांची सेवा करणे जास्त महत्त्वाचे आहे. परंतु राजकीय पार्श्वभूमी असणाऱ्यांना यामध्ये ही राजकारण करावयाचे आहे. माझ्या साठी दिवस दिवस-रात्र कष्ट करणारा कोरोनाच्या या संकटामुळे आर्थिक परिस्थिती खालावलेला गोरगरीब नागरिक , शेतकरी बांधव तेवढेच महत्त्वाचे आहे .

एक जबाबदार लोकप्रतिनिधी म्हणून दीड वर्षांपूर्वी चिखली येथील अनुराधा हॉस्टेलवर कोविड केअर सेन्टर सुरू करुन घेतले होते . यावेळी सदर इमारत कुणाची आहे ? हे न पाहता केवळ रुग्ण उपचार महत्वाचा ही बाब लक्षात घेऊन तिथे सुविधा नसतांना ही कोविड केअर सेंटर सुरू केले. त्यावेळी अनुराधा इंजिनिअरिंग कॉलेजची जरा बऱ्यापैकी असलेली मुलींच्या वस्तीगृहाची इमारत अधिकाऱ्यांनी पसंत केली होती. परंतु ती न देता अतिशय असुविधा असलेली इमारत मुलांच्या वसतिगृहाची इमारत देण्यात आली. ती सुद्धा नाराजी व्यक्त करून. ( राष्ट्रीय आपत्तीचा बडगा उगारल्यानंतर त्यामुळे त्याबाबत कुणीही उपकाराची भाषा करू नये .)

त्या मुलांच्या वसतिगृहात मी माझ्या स्वतःच्या पैशातून त्या ठिकाणी साहित्य खरेदी करून सुविधा निर्माण केल्या. जी मुलींच्या वस्तीगृहाची इमारत अधिकारी यांनी कोविड केअरसाठी मागितली होती आता त्याच इमारतीमध्ये ” माफक ” दरात या गोंडस नावाखाली अनुराधा मेमोरियलच्या माध्यमातून सिद्धिविनायक कोविड रुग्णालय सुरू झालेले आहे.

कोरोनाचे संकट आल्यापासून अनेकांनी त्यांच्या आयुष्यातील सर्वात मोठ्या आनंदाचे क्षणही अगदी साधेपणाने साजरे केले. लग्न व इतर खुशीचे सोहळे अत्यंत साधेपणाने करून त्यांनी शासकीय प्रोटोकॉलचेच पालन केले असे नाही तर जबाबदार नागरिक म्हणूनही आपले कर्तव्य पार पाडले. परंतु काही बेजबाबदार माजी लोकप्रतिनिधीनी चाचणी निगेटिव्ह आली त्याचाही इव्हेंट केला. त्यानंतर कोरोना पॉझिटीव्ह आल्यानंतर तब्येत चांगली झाली त्याचाही इव्हेंट केला. कोरोना काळातले दोन्ही वाढदिवस गर्दी जमवून मोठ्या थाटामाठात साजरे केले. एव्हढेच नव्हे तर स्वतःच्या सत्काराचे ही आयोजन केले. तुम्ही कोरोना पॉझिटिव्हचे निगेटिव्ह आले परंतु स्वतःचा सत्कार आयोजित करून स्वतःच्या वाढदिवसाला गर्दी करून तुम्ही इतर नागरिकांचा जीव धोक्यात घालत आहात एवढे तर भान ठेवणे गरजेचे आहे. त्यामुळे जबाबदार कोण ? व बेजबाबदार कोण ? हे पूर्ण चिखली मतदारसंघात माहिती आहे .

राहिला प्रश्न डॉक्टरांची काहीही चूक नसताना डॉक्टर भवटे यांच्या हॉस्पिटल वर मोर्चा काढणारे तुम्हीच. त्यामुळे माझे एवढेच सांगणे आहे की आज राजकारण करू नका. कारण आज सर्वांनी मिळून कोरोनाच्या संकटाला हरवायचे आहे. त्याकरता मी चिखली येथील ग्रामिण रुग्णालयात 50 खाटांचे समर्पित कोविड रुग्णालय , दुसरे चिखली येथेच 50 खाटांचे कोविड केअर सेन्टर जिथे किमान 10 बेड ऑक्सिजनचे असणार आहे. तसेच धाड येथे 50 खाटांचे कोविड रुग्णालय सर्वांच्या मदतीने लोक सहभागातून सुरू करत आहे. माझ्यासारखी केवळ दीड वर्ष आमदार राहिलेली साध्या घरची शेतकरी कुटुंबातील महिला शंभर खाटांचे मोफत उपचार देणारे सीसीसी सुरू करते. तुम्ही तर दहा वर्षे आमदार होतात तुम्ही 500 खाटांचे व तेही मोफत उपचार देणारे सी सी सी कोविड केअर सेंटर सुरू करा मी आपले स्वागतच करील.

परंतु राजकारण करू नका मी कोरोना ग्रस्तांच्या भल्यासाठी कष्ट करणाऱ्या 90 % डॉक्टरांच्या पाठीशी तर उभी आहेच परंतु तेव्हढ्याच खंबीरतेने गोरगरीब जनतेची ही काळजी मला घ्यावी लागणार आहे. परंतु रेमडीसीवीरची गरज नसतांना ते रुग्णांना द्यावेच लागेल असे सांगून रुग्ण व त्यांचे मनोबल खच्चीकरण करणाऱ्या 1/ 2 डॉक्टर व त्यामुळे रेमडीसीवीरचा काळाबाजार करून 20 / 25 ते ५५ हजार रुपयांपर्यंत ते इंजेक्शन विकणाऱ्यांचे मी कदापि समर्थन करू शकणार नाही. करणार ही नाही आणि ज्यांनी ज्यांनी कोरोनाच्या या संकट काळात रुग्ण व त्यांचे नातेवाईक यांच्या अगतिकतेचा फायदा घेऊन त्यांची लूट केली त्यांना न्याय देण्याचा प्रयत्न होणे गरजेचे आहे. त्यामुळे याबाबत ज्या रुग्णांचे उपचार करतांना अवाजवी रक्कम मोजावी लागली असेल त्यांनी याबाबत लेखी स्वरूपात तक्रारी कराव्यात त्यांना नक्कीच न्याय दिल्या जाईल एव्हढे मात्र निश्चीत .
त्यामुळे जबाबदारीने वागुयात व सर्वांनी मिळून या कोरोनाच्या संकटाला हरवू या.