तौत्के वादळामुळे झालेल्या नुकसानीचा प्रस्ताव जिल्हा प्रशासनाने शासनाकडे पाठवावा ; मदतीसाठी पाठपुरावा करणार-गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई

    36

    ✒️सचिन सरतापे(प्रतिनिधी,म्हसवड)मोबा.9075686100

    सातारा(दि.19मे):-कोकण किनार पट्टीवर आलेल्या तौत्के या चक्रीवादळाचा फटका पाटण तालुक्यालाही बसला आहे. त्या वादळासह मुसळधार पावासामुळे ज्यांच्या घरांचे नुकसान झाले. त्यांना तातडीची मदत मिळण्याबाबतचा प्रस्ताव प्रशासना मार्फत पाठवून शासनाकडे पाठपुरावा करण्यात येईल असे, गृह (ग्रामीण ) राज्यमंत्री शंभूराज देसाई यांनी सांगितले. चक्री वादळामुळे व पावसामुळे झालेल्या नुकसानीबाबत आज गृह राज्यमंत्री यांनी पाटण तालुक्यातील शिरेवाडी, मंद्रुळकोळे, चिबेवाडी, केरळ आदि नुकसानग्रस्त गावांना भेट देऊन पाहणी केली व त्यानंतर झालेल्या बैठकीत ते बोलत होते.

    यावेळी उपविभागीय अधिकारी श्रीरंग तांबे,तहसिलदार योगेश टोमपे, गटविकास अधिकारी श्रीमती मीना साळुंखे, पोलीस निरिक्षक निंगाप्पा चौखंडे, सहाय्यक पोलीस निरीक्षक चंद्रकांत माझी, उपअभियंता सार्वजनिक बांधकाम विभाग अजित पाटील, विद्याधर शिंदे उपस्थित होते.सातारा जिल्ह्याला नुकताच चक्रीवादळाचा व मुसळधार पावसाचा फटका बसला. याचा परिणाम पाटण तालुक्यात विशेषत: डोंगरी भागामध्ये मोठ्या प्रमाणात झाला आहे. वादळी वारे व मुसळधार पावासाने घरांचे पत्रे उडाले, घरांच्या भिंती पडल्या जनतेचे मोठे नुकसान या वादळामुळे झाले आहे. या पावसामुळे पिण्याच्या पाण्याच्या योजनांचे पाईप वाहुन गेले आहेत.

    जवळजवळ 300 पेक्षा जास्त विजेचे खांब वाकुन पडले, काही पूर्ण निखळुन पडले. त्यामुळे बऱ्याच ठिकाणी विद्युत पुरवठ खंडीत झाला आहे. वाकलेले विजेचे खांब तातडीने सरळ करुन विद्युत पुरवठा पूर्ववत करण्याच्या सुचना यावेळी त्यांनी दिल्या. उद्या दुपारपर्यंत विद्युत पुरवठा सुरळीत करण्याच्या सुचनाही त्यांनी यावेळी केल्या. ज्यांच्या घरांचे नुकसान झाले आहेत. त्यांना तातडीची मदत देण्याबाबतचा प्रस्ताव जिल्हा प्रशासनाने शासनाकडे करावा व त्यांच्या झालेल्या नुकसानीची भरपाई देण्याबाबत आपण शासनाकडे पाठपुरावा करणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.