कोविडने मरणारा व्यापारी/दुकानदार ‘कोविड योद्धा’ का होऊ शकत नाही…?

17

भारत देशाची अर्थव्यवस्था ही नॉमिनल जी.डी.पी. नुसार जगातील 6वी सर्वात मोठी अर्थव्यवस्था आहे, तर हाच क्रमांक क्रयशक्ती समानतेनुसार ( पी.पी.पी.) जगात तिसरा आहे. भारतीय अर्थव्यवस्थचे तीन प्रमुख विभागात वर्गीकरण केले जाते. अनुक्रमे कृषी व संलग्न क्षेत्र, उद्योग क्षेत्र व सेवा क्षेत्र. या सर्वामध्ये सर्वात मोठा उत्पन्नात वाटा हा ‘सेवा क्षेत्राचा’ आहे. तो 55% च्या आसपास राहतो. म्हणजे निम्म्यावर अधिक अर्थव्यवस्थेवर सेवा क्षेत्राचे प्राबल्य आहे. मग यात आरोग्य, बांधकाम क्षेत्र, पोस्ट, पत्रकारिता, संशोधने, हॉटेल्स, पोलीस प्रशासन,शिक्षण, माहिती, दुकानदारी पासून वाहतुकी पर्यन्त आशा कैक सेवांचा समावेश होतो. आपण वेगवेगळे कामे करून जो स्वतः चा उदरनिर्वाह करत असतो त्यासोबतच दुसऱ्यांना सेवाच देत असतो की!

आता छोटे- छोटे दुकानदार ते मध्यम व बरेच व्यापारी,उद्योग क्षेत्रातून तयार झालेल्या वस्तूंची आपल्यापर्यन्त सेवा पुरवत असतात. मग तो कापड दुकानदार- आपल्याला वस्त्र देत असेल, इलेक्ट्रॉनिक दुकानदार- पंखे, शितकपाट, स्टेशनरी- वाला कपाळाची टिकली ते अंगाची साबण, बांधकाम व्यावसायिक, मोबाईल दुरुस्ती, कृषी व संलग्न क्षेत्र संसाधने प्रतिष्ठान, भाजीपाला विक्रेत्यापासून चांभारापर्यन्त ते किराणा दुकानदार- दैनंदिन खायला लागणाऱ्या गरजेच्या वस्तू देत असेल तर ती त्यांची आपल्याला मिळणारी सेवाच आहे. अर्थात ते या सेवेचे मूल्य आकारतात, त्यात त्यांचा नफा जोडून! आणि आपण सर्वजण जे जे स्वतःचे काम म्हणून दैनिक व्यवहारात करत असतो हे नफ्यासाठीच की; आणि हा नफा आपल्या उदरनिर्वाहासाठीच असतो. हे विसरून चालणार नाही. मग तो कोणत्याही क्षेत्रातील कोणीही व्यक्ती असो, या मार्गानेच जाणार. निःशुल्क सेवा करायला कोणीही बसलेले नाही. मी शिक्षक आहे तर मुलांना शिकविण्याचे पगारी रुपात मानधन घेतोच की! असो!

एवढी मांडणी यासाठी आहे, की दिनांक 13 मे 2021 ला मी नांदेच्या प्रवासात असताना, मला एक दुःखद बातमी एका व्हाट्सअप्प ग्रुपवर वाचण्यात आली. निवघा बाजार नगरीतील स्वीट मार्ट तथा बेकरी चे सर्वेसर्वा/मालक, एक मध्यम दुकानदार कै.रुस्तूमजी पतंगे यांच्या निधनाची ती वार्ता होती. आशाही रोज रोज भावपूर्ण श्रद्धांजली व निधनाच्या बातम्या वाढदिवसापेक्षाही जास्त झाल्या आहेत. पण रोज काही आपल्या पाहण्यातला किंवा आपल्या जवळचा माणूस मरत नसतो. रुस्तूमजी आणि मी, माझ्यापेक्षाही जास्त माझे वडील यांचे संबंध एक दुकानदार व गिऱ्हाईकापूरते असले तरी, रोजच्या संबंधामुळे जिव्हाळ्याचे होते. विशेषतः माझ्या वडिलांचे ते वर्गमित्र होत!

अत्यंत शांत, सुस्वभावी, चिकाटी असणारा,जिद्दी, हरहुन्नरी असे ते व्यक्तिमत्त्व होते. कोळीसारख्या एका छोट्या खेड्यातून येऊन त्यांनी पाच वर्षे झाले नसतील एवढया कमी वेळात आपले सुस्थितीत बस्तान मांडले होते. त्यांच्या मुलांनाही आता कुठे प्रगतीचे फळे चाखायला मिळणार होती. कच्चे फळ झाडावरून अचानक तुटून पडावे, कोणी मुद्दाम दगड मारल्यासारखे! अशी ती घटना होती. अचानक घडलेली तर होतीच, शिवाय वेळ चुकवून घडली होती. वेळ होती माणसाच्या मरणाची. ज्याला अजूनतरी काही वर्षे अवधी होताच की! बऱ्याच जणांना तर काय आणि कधी घडले हे कळलेही नाही.

मागे असेच कै. दत्तरावजी कदम यांचे पण निधन झाले. असे कित्येक व्यापारी हसत खेळत असताना आपल्यातुन विनाकारण निघून गेले. दोष काय त्यांचा होता की त्या नियतीचा? प्रश्नच आहे?

ते आपल्याला सेवा देत असताना निघून गेले. एक भाजीपाला विकत होता, तर एक गोडवा वाटत होता. पण आपण काय दिले नको असलेले मरणच न! हो! आपल्यातूनच कोणाचा तरी ते सेवा देत असताना त्यांना संसर्ग झाला असेल. विषय हा नाही की संसर्ग कोणामुळे झाला. दुःख याचे आहे की जाता- जाता आशा कित्येक सेवेकऱ्यांना आपण ‘कोविड योद्धा’ म्हणूनही सन्मान का देऊ शकलो नाही? त्यांचे मरण हे इतके साधे व सोपे कसे काय होऊ शकते. आपले गाव सोडून परगावात येऊन आपले प्रतिष्ठान उभे करणे, प्रगतीच्या शिखरावर नेणे हे तितके सोपे काम नव्हते; आणि एका क्षणात तो व्यक्ती आपल्यातुन निघून जात असेल तर फक्त ‘भावपूर्ण श्रद्धांजली!’

आंबे पाडाचे आपण खायचे; पण झाड पडले की आंबा बदलायचा! ही प्रवृत्ती लोकांची होत चालली आहे. कुत्र्याचे पुण्यस्मरण करणारे लोकं आपणच पाहतो न? मग माणूस हा त्यापेक्षाही हलकाच का जो परिवारपुरताच मर्यादित राहून कुत्र्या मांजरावानी मरून जातो. इतका सहज कसा काय लोप पावू शकतो? हेच कळत नाही.

पतंगेजी असो की दत्तरावजी घरी बसून असते तर त्यांची सेवा आपल्याला मिळाली नसती. आपल्या जीवनशैलीवर थोडाबहुत परिणाम हा झाला असता, पण कदाचित त्या घरातला कर्ता व्यक्ती आपल्यात राहिला असता. प्रत्येकाने हा विचार करूनही चालणार नाही. काम तर आज न उद्या करावे लागणारच आहे. असो!

आज तकचे पत्रकार रोहित सरदाना मरणे हे जितके महत्वाचे व दुःखद आहे तितकेच महत्व हे आमचे बंधू आपल्यातुन जाण्याचे आहे. माणूस जर मरून जाऊन आपली कर्तबगारी बजावत असेल तर याहून मोठा त्याग व कर्म या जगात कुठलेच नाही.

आता यांना कोविड योद्धा म्हणा की न म्हणा, तुमची मर्जी! पण ते आपल्याला सेवा देत असताना स्वर्गवासी झाले हे कायम लक्षात ठेवा!

( उपरोक्त व्यक्ती पैसे घेऊन सेवा देत आहेत, हा प्रतिप्रश्न विचारून स्वतः आणि मला गोंधळात टाकू नका. मोबदला न घेता काम करणाऱ्याचे मला नाव सांगा कोणी असेल तर! आहे का या पृथ्वी तलावावर तसे? असतील तर ते बोटावर मोजण्याइतके समाजसेवी असतील! बाकीचे मग आपल्यासारखीच हाडा-मांसाची माणसेच! )

धन्यवाद!

 

लेखक:-अमोल चंद्रशेखर भारती,नांदेड(मो:-8806721206)