मोहता इंडस्ट्रीज लॉक-डाऊन आदेशाचा चूकीचा अर्थ काढून कामगारांचे वेतन देण्यास टाळाटाळ करीत असल्याचा इंटक महामंत्री आफताब खान यांचा आरोप !

28

✒️इकबाल पैलवान(हिंगणघाट प्रतिनिधी)मो:-९९२३४५१८४१

हिंगणघाट(दि.20मे):-वर्धा जिल्ह्यात जिल्हाधिकारी यांनी दि ५ मे ते १ जून या कालावधीचा लॉक-डाऊन लागू केला आहे मात्र या जिल्ह्यातील कार्यरत उद्योगाना यातून सूट देण्यात आलेली असूनही येथील मोहता इंडस्ट्रीजने गिरणीला टाळे लावून काम करण्याची इच्छा असलेल्या कर्मचाऱ्यांना वापस पाठवून लॉक-डाउनच्या काळातील वेतन न देण्याचा इंडस्ट्रीजचा इरादा दिसत असल्याचा आरोप इंटक महामंत्री आफताब खान यांनी आज उपविभागीय अधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनातून केलेला आहे.
निवेदनातून मागणी करण्यात आलेली आहे की, मोहता इंडस्ट्रीजने या लॉक-डाऊनच्या काळात आपला उद्योग बंद ठेवल्याने या काळातील कामगारांचे वेतनाची कपात करू न देता कामगारांना या दिवसांचे वेतन देण्यात यावे अशी मागणी राष्ट्रीय मिल मजदूर संघाचे महासचिव आफताब खान यांनी निवेदनातून केली आहे.

या संदर्भात प्रकाशनार्थ दिलेल्या निवेदनातून आफताब खान यांनी म्हटले आहे की,वर्धा जिल्हाधिकारी यांनी ५ मे ते १जून पर्यंत लॉक-डाऊन करण्याचा आदेश काढला आहे. या काळात जिल्ह्यातील कार्यरत उद्योगांना या आदेशातून सूट देण्यात आलेली होती परंतु या आदेशाचा चुकीचा अर्थ काढून मोहता इंडस्ट्रीजने हेतुपुरस्सर या लॉक-डाऊनच्या काळात उद्योग बंद करून ६५० कामगारांचे आर्थिक नुकसान करण्याचे षडयंत्र रचले असल्याचे दिसून येत आहे वास्तविक व्यवस्थापकांनी या बाबत नियमानुसार इंटकला सूचना देऊन या कालावधीच्या वेतन नुकसान भरपाई संबंधी पूर्ण चर्चा करणे औद्योगिक संबंध व शांततेच्या दृष्टीने बंधनकारक होते.परंतु मोहता इंडस्ट्रीजने तसे न करता या लॉक-डाऊनच्या काळात गिरणी बंद ठेवण्याचा एकांगी निर्णय घेतलेला आहे.

याबाबत जिल्हाधिकारी वर्धा यांनी जिल्ह्यातील इतर उद्योगा प्रमाणे मोहता गिरणी सुरू ठेवण्याचे निर्देश देऊन लॉक-डाऊन च्या काळातील कामगार/कर्मचारी यांचे नुकसान होणार नाही व कामगारांच्या वेतनाचा प्रश्न निकालात काढावा अशी विनंती जिल्हाधिकारी यांना एका निवेदनातून आफताब खान यांनी केली आहे.सदर निवेदन सादर करतांना, विलास धोबडे, एकनाथ डेकाटे, नाना हेडाऊ, रवी गोडसेलवर,प्रवीण चौधरी,विलास बोडे, रणजित ठाकूर,महेश इत्यादी कामगार प्रतिनिधी उपस्थित होते.