बुद्ध आणि कार्ल मार्क्स हे परस्पर विरोधी नसून पूरक आहेत- अॕड.अप्पाराव मैन्द

23

✒️बाळासाहेब ढोले(पुसद प्रतिनिधी)

पुसद(दि.27मे):- ‘तथागत गौतम बुद्धांचा उदय चातुर्वर्ण्य व्यवस्थेतील यज्ञ संस्कृतिने निर्माण केलेल्या शोषित व्यवस्थेच्या पार्श्वभूमीवर झाला, तर कार्लमार्क्सचा उदय औद्योगीकरणाने निर्माण झालेल्या भांडवली शोषित वर्गव्यवस्थेच्या पार्श्वभूमीवर झाला.तथागतांना नितिमान समाज निर्माण करून स्वंयशासीत समाज निर्माण करावयाचा होता, तसेच मार्क्सचे ध्येय शासन विरहित समाज निर्मितीचे होते.कामगारांची सत्ता प्रस्थापित झाल्यानंतर शोषणरहित समाज व्यवस्था निर्माण होईल असे मार्क्सचे भाकीत होते.

ध्येय समान असले तरी तथागताचे अहिंसा हे निती तत्व असल्यामुळे ध्येयसिद्धीसाठी तथागताची बळाचा वापर करण्यास सक्त मनाई होती, तर कामगाराची सत्ता स्थापन करण्यास बळाचा वापर करण्यास मार्क्सने प्रतिबंध केला नाही.या एकाच कारणाने बुद्ध विरूद्ध मार्क्स अशी मांडणी करण्यात येते ते उचित नाही.’ असे प्रतिपादन चार्वाकवनाचे संस्थापक अॕड.अप्पाराव मैन्द यांनी दि.२६ मे २०२१ रोजी संपन्न झालेल्या बुद्ध जयंती कार्यक्रमात बोलतांना केले.ते पुढे म्हणाले की मार्क्स आणि बुद्ध परस्पर विरोधी नसून पूरक होते, अशी मांडणी करणेच योग्य होईल .

दरवर्षीप्रमाणे बुद्ध जयंती कार्यक्रमाचे आयोजन चार्वाकवनात आज सकाळी ९ वा.करण्यात आले होते.कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी भारतीय बौद्ध महासभेचे पुसद शहर शाखेचे अध्यक्ष उपा.ल.पु.कांबळे हे होते,प्रमुख पाहुणे म्हणून सर्व उपा.टी.बी.कानिंदे ,उत्तमलाल रामधनी आणि प्रज्ञा पर्वाचे संस्थापक अध्यक्ष भीमराव कांबळे उपस्थित होते.सामुदायिक बुद्ध वंदना आणि म.फुले,डाॕ.बाबासाहेब आंबेडकर आणि सावित्री माता फुले यांना पुष्पमाला अर्पण करून अभिवादन केल्यानंतर झालेल्या सभेचे प्रास्तविक म.फुले समता विचार मंचाचे विश्वस्त उपा.गोवर्धन मोहिते यांनी केले आणि बुद्ध आणि मार्क्स यांचा दोघाचाही लढा पिळवणूकीविरूद्ध होता असे सांगितले.

कार्यक्रमात झालेल्या भाषणात उपा.मारोती धुळध्वज यांनी डाॕ.बाबासाहेबांना श्रीलंकच्या भिक्खुकडून मिळालेल्या वागणूकीमुळे भिक्खूसंघाबाबत बाबासाहेबाची नाराजी होती असे सांगितले.उपा.पी.बी.भगत यांनी प्रतीत्य समुत्पाद सिद्धांताबद्दल सांगण्याचा प्रयत्न केला.तर उपा.यशवंंत देशमुख यांनी डाॕ.बाबासाहेब आंबेडकर यांचे ‘भगवान बुद्ध आणि त्याचा धम्म ‘हा ग्रंथ वाचून आपल्यात परिवर्तन झाले असे सांगून बुद्ध मार्गावर आलो असल्याचे सांगितले.उपा.पंजाबराव सुरोशे यांनी आईनस्टाईनचा सापेक्षतावादाचा सिद्धांत बुद्ध शिकवणीवर आधारित आहे असे सांगितले.उपा.नारायणराव क्षिरसागर यांनी बोधगयेच्या भेटीचा वृतांत सांगून बौद्ध धम्माच्या स्थळाची प्रशंसा केली आणि बौद्ध धम्माचा प्रसार झाला पाहिजे असे मत व्यक्त केले.

उपा.प्रल्हाद खडसे यांनी पंचशीलाची माहिती दिली.उपा.जी.एम.कांबळे यांनी शिल पालन आणि आर्य आष्टांगिक मार्गाच्या अवलंबनाने निब्बाणाप्रत जाता येते असे सांगितले.प्रमुख पाहुणे उपा.भिमराव कांबळे यांनी चार्वाकवनातर्फे चाललेल्या बौद्ध धम्म प्रचाराच्या कार्याची प्रशंसा केली.प्रमुख पाहुणे टी.बी.कानिंदे यांनी बौद्धधम्म प्रचार कार्य प्रभावी न होण्यासंबधीच्या कारणाचा ओहापोह केला आणि सांगितले बौद्ध धम्म सत्याच्या मार्गचे अवलंब करण्यास सांगतो आणि दुसरे धर्म खोटी आश्वासने देऊन लोकांना भ्रमित करतात. त्यामुळे इतर धर्माच्या तुलनेत बौद्ध धम्माचा प्रचार पाहिजे तितक्या गतीने होत नाही असे सांगितले.

कार्यक्रमाचे अध्यक्ष तथा भारतीय बौद्ध महासभा पुसद शहर चे अध्यक्ष उपा.ल.पु.कांबळे यांनी सर्व वक्त्यांच्या मुद्याचा उल्लेख आपल्या समारोपीय भाषणात केला आणि चार्वाकवनातर्फे करण्यांत आलेल्या सत्काराबद्दल कृतज्ञता व्यक्त केली.ल.पु.कांबळे यांनी योगाबाबत उचित मार्गदर्शन केले.कार्यक्रमाचे संचलन अॕड.अप्पाराव मैंद यांनी केले. तर
उपा.संजय आसोले यांनी आभार मानले.कार्यक्रमास राजेंद्र वाघमारे,बी.जी.राठोड,के.व्हि. मुनेश्वर,तुकाराम चौरे,दगडू कांबळे,रमेश सरागे,मिलिंद काळेकर,बौद्धाचार्य भगवानराव बरडे,प्रा.एन.डी.ताटेवार,यशवंत कांबळे,ज्ञानेश्वर तडसे,सुभाष दायमा,विश्वजीत भगत,प्रदीप तायडे,भीमराव भवरे,विनयकुमार भवरे,साहेबराव ढोले उपस्थित होते. प्रेसचे काम बंद असल्यामुळे चार्वाकवनातर्फे प्रकाशित करण्यात येत असलेल्या ,बौद्ध धम्म प्रचार पत्रिकेची छपाई झाली नाही.लाॕकडाऊन उठल्यास पुढील धम्मसंगितीमध्ये बौद्ध धम्म प्रचार पत्रिका प्रकाशित करण्यांत येईल असे संपादक अॕड.अप्पाराव मैन्द यांनी सांगितले