खासदार संभाजी राजे यांची भूमिका स्वागतार्ह: अनिल म्हमाने

29

✒️कोल्हापूर(पुरोगामी संदेश नेटवर्क)

कोल्हापूर(दि.27मे):-सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षणाला स्थगिती दिल्यानंतर महाराष्ट्रभर त्याचे पडसाद उमटत आहेत. त्याच पार्श्वभूमीवर खासदार संभाजीराजे आज वंचित बहुजन आघाडीचे नेते आणि ज्येष्ठ विधिज्ञ ऍड. प्रकाश तथा बाळासाहेब आंबेडकर यांची भेट घेत आहेत. सामाजिक सलोखा राखण्यासाठी आणि मराठा समाजातील गोरगरीब युवकांना आरक्षण मिळवून देण्यासाठी खासदार संभाजीराजे यांनी घेतलेला हा निर्णय स्वागतार्ह असल्याचे मत सामाजिक कार्यकर्ते अनिल म्हमाने यांनी व्यक्त केले आहे.

सर्वोच्च न्यायालयाने महाराष्ट्र सरकारने दिलेले मराठा आरक्षण रद्द ठरल्यानंतर महाराष्ट्रातील मराठा समाजाचे युवकांमध्ये प्रचंड असंतोषाचे वातावरण होते. मात्र अशावेळी ऍड. प्रकाश आंबेडकर यांनी सदैव मराठा समाजातील गरीब घटकाला न्याय मिळाला पाहिजे ही घटनात्मक भूमिका मांडली आहे. येणाऱ्या काळात सुद्धा मराठा समाजातील लोकांना आरक्षण मिळण्यासाठी आवश्यक असणारे सर्व लढ्यामध्ये सहभागी असल्याचे यापूर्वीही ऍड. प्रकाश आंबेडकर यांनी स्पष्ट केले होते. त्या पार्श्वभूमीवर ही भेट ऐतिहासिक ठरणार आहे.

या भेटीतून मराठा समाजाला आरक्षण मिळण्याचा लढा आणखी गतिमान होईल अशी अपेक्षा आहे. त्यामुळे संभाजीराजे यांनी ऍड. प्रकाश तथा बाळासाहेब आंबेडकर यांना भेटण्याचा घेतलेला निर्णय सर्वत्र कौतुकाचा आणि स्वागताचा विषय झाला आहे. या भेटीतून आरक्षणासंबंधी सखोल व ठोस निर्णय होईल अशी अपेक्षा आहे. या भेटीमुळे मराठा समाजाला आरक्षण मिळणे सोपे होणार आहे.या भेटीमुळे दोन महामानवांचे वारसदार भेटण्याचा ही संदर्भ असणार आहे. त्यामुळे या भेटीला एक वेगळेपण प्राप्त झाले आहे.