प्रशासन स्तरावर वणा नदीच्या संवर्धनासाठी स्वच्छता अभियान राबवा- माजी आमदार प्रा.राजु तिमांडे

32

🔹माजी आमदार प्रा.राजू तिमांडे यांची जिल्हाधिकार्‍यांकडे मागणी

✒️इकबाल पैलवान(हिंगणघाट प्रतिनिधी)

हिंगणघाट(दि.१जुन):-प्रशासन स्तरावर हिंगणघाट येथील वणा नदीच्या संवर्धनासाठी स्वच्छता अभियान राबविण्याबाबत माजी आमदार प्रा.राजू तिमांडे यांनी जिल्हाधिकारी वर्धा, निवासी जिल्हाधिकारी व अप्पर जिल्हाधिकारी यांना निवेदनाद्वारे मागणी केली आहे.हिगणघाट हे शहर वणा नदीच्या काठावर बसले आहे शहरातील सर्व नागरिकांना वणा नदीच्या पात्रातून पाण्याची उचल करून पिण्याच्या पाण्याची व्यवस्था केली आहे. हिंगणघाट शहरात असलेल्या मोहता इंडस्ट्री, गिमा टेक्स वणी, सगुना फॅक्टरी वणी इत्यादी उद्योगांना वणा नदी पात्रातून पाणी दिले जाते.वणा नदीच्या पात्रात लव्हे, गवत ,मातीचे खड्डे, रेतीचे गड्डे पडल्यामुळे वणा नदी विद्रूप झाली आहे. काही वर्षांपूर्वी नदी लागतच्या गावांना सुख-समृद्धीचे स्वरूप होते.

वाहत्या नदी नाल्या मुळे सभोवतालच्या परिसरात जलसाठे खूप मोठ्या प्रमाणात असल्याने गावांची परिस्थिती भक्कम होती. दरवर्षी होणाऱ्या भरपूर पावसाने नदी-नाल्यांना मोठ्या प्रमाणात पूर येत होते. त्यामुळे दोन्ही थड्या भरून वाहल्यानंतर नद्यांची स्वच्छता होऊन रेतीचा साठा भरपूर प्रमाणात वाहून येत होता.
नदीच्या रेतीचे उत्खनन खूप मोठ्या प्रमाणात सुरू असल्यामुळे पाण्याचे नैसर्गिक स्त्रोत बंद पडल्यामुळे जनतेला पाणी टंचाईचा सामना करावा लागत असून दोन दिवसा आड एक वेळ पाणी देण्यात येते तसेच पाणी टंचाईमुळे शेतकऱ्यांना ओलित करण्यासाठी पाणी उपलब्ध होत नाही. त्यामुळे त्यांना उन्हाळ्याच्या दिवसात शेतीत ओलित करता येत नाही. अशा सर्व समस्या निर्माण होत आहे.

वणा नदीच्या पात्रातून शेतीसाठी दाभा ,कान्हापूर व इतर गावांना पाण्यातून जाण्यासाठी मार्ग होते. परंतु त्या मार्गावर मोठमोठे खड्डे पडल्यामुळे जाता येत नाही. उलट त्या गड्ड्यामध्ये देवी – गणपती विसर्जन करताना काही लोकांचा मृत्यू सुद्धा झाला आहे. अश्या अनेक घटना त्या ठिकाणी झाल्या आहे.

पाणी टंचाईचा सामना करण्यासाठी शेवटी पाणी विकत घेऊन वणा लोअर प्रकल्प व रामा डॅम्प मधून पाणी सोडावे लागते. त्याचे पैसे नगरपरिषद व कंपन्यांना भरावे लागते.
वणा नदीचे संवर्धन वाचण्यासाठी शासकीय यंत्रणेकडून स्वच्छता अभियान राबविण्यात यावे. नदी वाचली तरच पिण्याच्या पाण्या सोबत शेतकर्‍यांच्या शेतीला पाणी उपलब्ध होऊ शकते. सभोवतालचा परिसर सुजलाम सुफलाम करावयाचा असेल तर शेतीला पाणी देऊन शेतकऱ्यांची आर्थिक स्थिती बळकट करणे आवश्यक आहे. असे माजी आमदार प्रा.राजू तिमांडे यांनी सूचना निवेदनाद्वारे दिल्या.
तरी प्रशासन स्तरावर वणा नदीचे स्वच्छता अभियान राबविण्यात यावे अशी मागणी माजी आमदार प्रा.राजू तिमांडे यांच्या वतीने जिल्हाधिकारी वर्धा यांना केली आहे.