पावन पुण्यतिथी, सुंदर मुक्ताईची !

33

(संत मुक्ताबाई पुण्यतिथी)

आई वडिलांनी पाळण्यात ठेवलेले नाव आपल्या कर्तृत्वातून सार्थकी लावणारे फार कमी लोक असतात. अशाच एक महान संत मुक्ताबाई होऊन गेल्या. सद्गुणी चार मुले होती, विठ्ठलपंत कुलकर्णी यांची! निवृत्ती, ज्ञानदेव, सोपान, मुक्ताबाई… आधी विषयातून निवृत्ती, मग ज्ञानप्राप्ती म्हणजे आत्मज्ञानाचा मार्ग मगच देवप्राप्ती, पुढे मिळेल तो अध्यात्माचा मार्ग सोपान (जिना) सोपा नसलेला मार्ग आणि मग शाश्वत मुक्तीची प्राप्ती. किती सुंदर नावे आणि नावाप्रमाणे सार्थक केलेली –

“निवृत्ती हा खांद्यावरी। सोपानाचा हात धरी।।
पुढे चाले ज्ञानेश्वर। मागे मुक्ताई सुंदर।।”

संतकवयित्री जनाबाईंनी केलेले विठ्ठलभक्तांच्या सोहळ्याचे हे सुंदर वर्णन. त्यातल्या संतश्रेष्ठ मुक्ताईची आज वैशाख कृष्ण दशमीला पुण्यतिथी. त्यानिमित्ताने त्यांच्या पावन चरणी या लेखरुपाने विनम्र अभिवादन!

शके १२०१ अश्विन शुद्ध प्रतिपदेला संतश्रेष्ठ मुक्ताबाईंचा जन्म झाला. म्हणजे ती तारीख दि.१२ ऑक्टोबर १२७९ ही होती. योगमायेचे ते रूप जणू आदिशक्तीच ती अवतरली होती. ती तीन लोकोत्तर असलेल्या भावांची लाडकी बहीण होती. मुक्ताईंचा अध्यात्मात आणि परमार्थात फार मोठा अधिकार होता. बालवयातच आई वडिलांच्या प्रेमाला त्या पारख्या झाल्या. त्यांना प्रतिकूल परिस्थितीचे तीव्र चटके सोसावे लागल्याने अकालीच प्रौढ झाल्या. आधीच फटकळ व हजरजबाबी होत्या त्या! वीजेसारखे डोळे दीपावणाऱ्या ज्ञानी परंतु दाहकतेचा लवलेशही नसणाऱ्या. त्यातही तल्लख बुद्धिमान, विरक्त, संत प्रवृत्तीच्या. ती सर्व भावंडे संन्यासाची पोरे म्हणून जगाने वाळीत टाकलेली, सगळीकडून धिक्कारलेली व झिडकारलेली होती. त्यांना एकमेकांव्यतिरिक्त दुसर्‍या कोणाचाच आधार नव्हता. एक आत्मा पण देह चार असे ते चौघे एकत्वाने, एकमताने आणि एकोप्याने वागत असत. त्यात मातापित्यांच्या अकाली वियोगाने चिमुकल्या मुक्ताबाईंना स्वतःचे बालपण विसरून तीनही भावंडांची आई व्हावे लागले. ज्या वयात भातुकली खेळावयाची त्या वयात संतशिरोमणी ज्ञानेश्वरमाऊलींच्या त्या माऊली झाल्या. आपण अनुकूल परिस्थितीतही मनातच मांडे खात असतो. परंतु एकदा संत ज्ञानराजाला खरेखुरे मांडे खावेसे वाटले.

त्या प्रतिकूल परिस्थितीतही त्यांनी कुंभाराकडून खापराचा तवा मागितला. परंतु सन्याशाच्या मुलांना कशाला हवे हे मांडे? म्हणत माघारी धाडले होते. तत्कालीन समाजाने बहिष्कार घालून काहीही मदत न करण्याचे ठरवले असल्यामुळे विसोबा चाटी नावाच्या सद्गृहस्थाने सर्व कुंभारांना तंबी दिल्याने कुणीही मदत केली नाही. उलट अपमानीत करून हाकलून दिले. किती हे कारुण्य? शेवटी संत ज्ञानदेवांनी आपला जठराग्नी प्रज्वलित केला. त्यांनी आपली पाठ तव्यासारखी तापवली व छोट्या मुक्ताबाईंना त्यावर मांडे रांधावयास लावून सर्व भावांची इच्छा पूर्ण केली.

एवढ्याशा त्या चिमुकलीने आपल्या दादांचा म्हणजे ज्ञानोबा माऊलींचा एकदा स्वत: माऊली बनून राग घालवला होता. तोही केवळ मधुर पण अर्थगर्भ व कोमल अशा शब्दातून –

“शब्द शस्त्रे झाले क्लेश| संती मानावा उपदेश||
विश्वरागे झाले वन्ही| संते सुखे व्हावे पाणी||
सुखसागर आपण व्हावे|जग बोधे तोषवावे ||
तुम्ही तरोनि विश्व तारा| चिंता क्रोध मागे सारा||
ताटी उघडा ज्ञानेश्वरा ||”

म्हणत अनेक आर्जवे, विनवण्या केल्या. तत्वज्ञानाचे बोधामृत सहित धीरगंभीर ज्ञान दिले. “अरे दादा, योगी हा निरंतर मनाने पवित्र असतो, क्षमाशील असतो. सगळे जगच आपले आहे, आपण सगळे एकरूप आहोत. आपण परमेश्वराच्या ठायी लीन झालो की तो आणि आपण यात काही अंतर उरतच नाही. हे अंतर नसले की – आदि अंती हरी, सर्व ज्याचा जाला|| हरी आपला झाला की जगात आपले करून घेण्यासारखे उरले तरी काय? आपण योगियांचे योगेश्वर आहात. आपल्याला राग शोभत नाही.” किती गहन ज्ञान हे! ज्या श्रेष्ठग्रंथकार ज्ञानेश्वरजींनी जगाला ज्ञान दिले, त्या माऊलीला चिमुरड्या संत मुक्ताईने समजाविले. ते ‘ताटीचे अभंग’ म्हणून प्रसिद्ध पावले आहेत. खरच, धन्य त्या संतश्रेष्ठ मुक्ताबाईंची!

संतकविवर्य नामदेवजींशी प्रत्यक्ष देव बोलत व खेळत असे, असे म्हणतात. मात्र त्यांनाही सुनवायला मुक्ताईंनी कमी नाही केले –
“अखंड जयाला देवाचा शेजार। कारे अहंकार नाही गेला।।”
त्यांना गुरूचे महत्व “गुरुविण तुझ न आलेची गा मोक्ष, होशील मुमुक्षू साधक तू||” मग संत नामदेव महाराजांना गुरूंकडे पाठवून ‘ज्ञानीभक्त’ बनवले. थोरले संत गोरोबा काकांद्वारे समजावले. तपोवृद्ध योगिराज, अत्यंत बुद्धिवान, वयोवृद्ध चांगदेवाला सुद्धा केवळ दहा वर्षाच्या मुक्ताईने गुरुपदेश व ज्ञानभक्तीची शिकवण दिली.निवृत्तींनाथांसाह सर्व संतमंडळींबरोबर तीर्थयात्रा करीत असताना तापी नदीवरील एदलाबाद जे आता मुक्ताईनगर, जि.जळगाव, खांदेश, महाराष्ट्र या गावावरून जात असता माणगाव आता श्री क्षेत्र मेहूण येथे पोहोचतांना एकाएकी वादळ सुटले.

ढगांचा कडकडाट आणि विजांचा चमचमाट थैमान घालू लागला होता. आकाशातून विजेचा एक प्रचंड लोळ पृथ्वीच्या दिशेने झेपावला आणि कु.मुक्ता विठ्ठल कुलकर्णी उर्फ संतश्रेष्ठ मुक्ताबाईंवर कोसळला.त्या वयाच्या साडे सतराव्या वर्षीच अनंताच्या शाश्वत स्वरुपात विलीन झाल्या. तो दिवस होता वैशाख वद्य दशमी शके १२१९. म्हणजेच आज त्यांची ८०२वी पावन पुण्यतिथी आहे. एकाच वेळी त्या जीवन्मुक्त व देहमुक्त झाल्या. त्यांनी संत मुक्ताई हे नाव सार्थ केले –

“मुंगी उडाली आकाशी!
तिने गिळिले सुर्यासी!!”

हे त्यांनी लिहीलेल्या अभंगातूनच सर्व काही स्पष्ट सांगितले आहे.अशा त्या तत्वज्ञानी संतश्रेष्ठ मुक्ताबाईंना शतकोटी सादर प्रणाम!

!! पुरोगामी संदेश परिवारातर्फे त्यांच्या पावन पुण्यतिथी निमित्त त्यांना विनम्र अभिवादन !!

✒️संकलन व लेखन:-श्रीकृष्णदास (बापू) निरंकारी,C/o – वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज चौक,मु. रामनगर वॉर्ड नं.२०, गडचिरोली.जि. गडचिरोली, व्हा.नं. ९४२३७१४८८३.
ई-मेल – Krishnadas.nirankari@gmail.com