अनलॉक म्हणजे कोरोना गेला अशा भ्रमात राहू नका

26

राज्यातील कोरोनाचा प्रादुर्भाव हळूहळू कमी होऊ लागला आहे. राज्यातील कोरोना बाधितांचा आणि मृतांचा आकडा घटत चालला आहे. त्यामुळे राज्य सरकार, प्रशासन, वैद्यकीय अधिकारी तसेच राज्यातील जनतेला दिलासा मिळाला आहे. कोरोनाची दुसरी लाट ओसरली असल्याने राज्य सरकारने लॉक डाऊन उठवुन राज्य अनलॉक केले आहे. अर्थव्यवस्था पूर्वपदावर येण्यासाठी राज्य अनलॉकच असणे आवश्यक आहे म्हणूनच राज्य सरकारने मिशन बिगीन अंतर्गत अनलॉकचे टप्पे आखून दिले आहेत. पण, राज्य अनलॉक झाले म्हणजे कोरोना गेला अशा अविर्भावात सार्वजनिक स्थळांवर वावरणाऱ्या नागरिकांकडून मार्गदर्शक तत्वांना हरताळ फासला जात आहे. रस्ते, दुकाने, बाजारपेठा, सार्वजनिक स्थळे याठिकाणी गर्दी ओसंडून वाहत आहे.

गर्दी वाढली की कोरोनाला शिरकाव करण्यास संधी मिळते हे माहीत असूनही लोक गर्दी करत आहेत म्हणून चिंता पुन्हा वाढली आहे. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेला ओहोटी लागली असली तरी ती पूर्ण नियंत्रणात आलेली नाही. आजही राज्यात दररोज दहा हजाराच्या आसपास कोरोना बाधित रुग्ण सापडत आहेत त्यातच तिसरी लाट राज्यात कधीही दाखल होऊ शकते असा इशारा तज्ज्ञांनी दिला आहे. तिसऱ्या लाटेला रोखण्यासाठी प्रशासनाने युद्धपातळीवर प्रयत्न सुरू केले आहेत पण काही बेजबाबदार नागरिक मात्र मास्क, शारिरीक अंतराचे पालन न करता सार्वजनिक ठिकाणी राजरोसपणे फिरत आहे. राज्यातील बहुतेक व्यवहार पूर्ववत सुरू झाल्याने नागरिकांना कोरोनाचा विसर पडला आहे. राज्य अनलॉक झाले म्हणजे कोरोना गेला या भ्रमात नागरिक कोरोनाची त्रिसूत्री विसरून गेले आहेत.

कोरोनाचा दर कमी झाला पण कोरोना हद्दपार झालेला नाही याचा नागरिकांना विसर पडला म्हणूनच नागरिकांच्या चेहऱ्यावरील मास्क हनुवटीवर आला. सोशल डिस्टन्सचा फज्जा उडाला. सॅनिटायजरचा लोकांना विसर पडला. नागरिकांचे हे बेजबाबदारपणाचे वर्तन असेच चालू राहिले तर कोरोना पुन्हा आक्रमक होईल आणि तसे झाले तर कोरोनाला हद्दपार करणे प्रशासनाला अवघड जाईल. सरकारकडेही लॉक डाऊनशिवाय पर्याय उरणार नाही म्हणून नागरिकांनी बेजबाबदारपणा सोडून कोरोना नियमांचे काटेकोरपणे पालन करावे. सार्वजनिक ठिकाणे, विवाह समारंभ, अंत्यविधी याला नागरिकांनी गर्दी करू नये. सर्वात महत्वाचे म्हणजे सॅनिटायजर, मास्क आणि सोशल डिस्टन्स ( एस एम एस ) या त्रिसूत्रीचा वापर करावा. राज्य अनलॉक झाले म्हणजे कोरोना गेला अशा भ्रमात कोणीही राहू नये. एप्रिल, मे महिन्यात आपली काय परिस्थिती होती याचा विचार करूनच नागरिकांनी खबरदारी घेत दैनंदिन व्यवहार करावेत.

✒️लेखक:-श्याम ठाणेदार(दौंड,जिल्हा पुणे)मो:-९९२२५४६२९५