ऊसतोड कामगारांची मुलं मोठे अधिकारी होतील तेंव्हा माझ्या कामाचे चिज होईल – ना.धनंजय मुंडे

28

🔹कोविड योध्यांच्या पाठिवर कौतुकाची थाप मारण्याचे काम अमरसिंह पंडित यांनी केले – आ.बाळासाहेब आजबे

🔸शारदा प्रतिष्ठानच्यावतीने गेवराईत कोविड योध्यांचा सन्मान व ना.धनंजय मुंडे यांचा नागरी सत्कार नेत्रदिपक सोहळ्यात संपन्न

✒️गेवराई तालुका प्रतिनिधी(नवनाथ आडे)मो:-9075913114

गेवराई(दि.14जून):-आपल्या मातीतील माणसांशी नाळ जुळली असल्यामुळे अमरसिंह पंडित यांनी लोकसेवेचा वसा घेतला आहे, कोरोना संक्रमण काळात त्यांनी केलेले कार्य लोक विसरणार नाहीत. ऊसतोड कामगारांच्या मुलांसाठी काम करणे माझे कर्तव्य आहे, ही मुलं जेंव्हा मोठमोठे अधिकारी होतील तेंव्हा माझ्या कामाचे चिज होईल आणि खर्या अर्थाने मी त्यावेळी सत्कारास पात्र होईल असे प्रतिपादन सामाजिक न्यायमंत्री ना.धनंजय मुंडे यांनी केले. माजी आ.अमरसिंह पंडित यांनी आयोजित केलेल्या कोविड योध्दा सन्मान व नागरी सत्कार सोहळ्यात ते बोलत होते. यावेळी आ.सतिष चव्हाण, आ.बाळासाहेब आजबे, आ.संजय दौंड यांच्यासह मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते.

शारदा प्रतिष्ठानच्यावतीने गेवराई येथे आयोजित केलेल्या कोविड योध्दा सन्मान व ना.धनंजय मुंडे यांच्या नागरी सत्कार समारंभास सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांच्यासह आ.सतिष चव्हाण, आ.बाळासाहेब आजबे, आ.संजय दौंड, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष महेबुब शेख, राष्ट्रवादी डॉक्टर्स सेलचे प्रदेशाध्यक्ष डॉ.नरेंद्र काळे, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष बजरंग सोनवणे, जिल्हा परिषद अध्यक्ष शिवाजी सिरसाट, माजी आ.पृथ्वीराज साठे, जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष विजयसिंह पंडित यांच्यासह मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते. या नेत्रदिपक समारंभात गेवराई तालुक्यातील सर्व आशा स्वयंसेविका कार्यकर्ती, वार्ड बॉय, डॉक्टर्स, कोरोना रुग्णसेवा समिती, रुग्णालयातील सेवक यांच्यासह कोविड संक्रमण काळात स्वतःच्या आरोग्याची काळजी न करता उल्लेखनीय काम करणार्या सामाजिक कार्यकर्त्यांचा सन्मान करण्यात आला. ऊसतोड कामगारांच्या मुलांसाठी संत भगवानबाबा वसतीगृह योजना मंजुर करून ऊसतोड कामगारांच्या मुलांना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणण्याची बहुमोल कामगिरी करणार्या ना.धनंजय मुंडे यांचा ऊसतोड मुकादमांच्या हस्ते यावेळी भव्य नागरी सन्मान करण्यात आला.

कोरोनाच्या संक्रमण काळात खाजगी पहिले कोविड सेंटर उभारणारा नेता म्हणून अमरसिंह पंडित यांचे नाव घेतले जाते. त्यांनी कोरोनाच्या महामारीत लोकांचे प्राण वाचविणार्या कोविड योध्यांचा सन्मानसुध्दा महाराष्ट्रात सर्वप्रथम आयोजित करून पवित्र कार्य केले आहे. लोकांचे प्राण वाचविण्यासाठी ऑक्सिजन उपलब्ध करणार्या अमरसिंह पंडित यांचा सन्मान लवकरच होईल असे संकेतही त्यांनी आपल्या भाषणात दिले. ऊसतोड कामगारांच्या मुलांसाठी गेवराई तालुक्यात वसतीगृह उभारण्याची आग्रही भुमिका अमरसिंह पंडित यांनी घेतली होती. त्यांच्या पाठपुराव्यामुळे गेवराईत लवकरच १०० मुले आणि १०० मुलींचे वसतीगृह उभारणार असल्याचेही सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांनी आपल्या भाषणात सांगितले.

कोविड योध्यांच्या पाठिवर कौतुकाची थाप मारण्याचे काम अमरसिंह पंडित यांनी केले आहे, असे काम प्रत्येक मतदार संघात करण्याची आवश्यकता आहे. कोविडच्या काळात त्यांनी मोठे काम उभे केले मात्र त्याचा गाजावाजा केला नाही. महाविकास आघाडीच्या सरकारने या काळात केलेल्या योग्य नियोजनामुळे कोरोनाच्या दुसर्या लाटेतून महाराष्ट्र सावरल्याचे प्रतिपादन राष्ट्रवादीचे आष्टी विधानसभा मतदार संघाचे आ.बाळासाहेब आजबे यांनी केले. आपल्या भाषणात त्यांनी माजी आ.अमरसिंह पंडित व विजयसिंह पंडित यांनी केलेल्या सामाजिक कामाचा गौरव केला. कार्यक्रमात प्रास्ताविकपर बोलताना माजी आ.अमरसिंह पंडित यांनी ऊसतोड कामगारांच्या मुलांसाठी वसतीगृह योजना सुरु केल्याबद्दल ना.धनंजय मुंडे यांचे कौतुक केले. लोकनेते गोपीनाथ मुंडे यांचे स्वप्न या निमित्ताने पूर्ण करून त्यांचा वारसा आपण चालवत असल्याचे प्रतिपादन केले.

गेवराई तालुक्यातील लोकांनी सर्वाधिक सामाजिक सहभाग या कोरोनाच्या संकटात दिल्याचे सांगताना त्यांनी विविध संघटना, सामाजिक संस्था व व्यक्तिंच्या मदत कार्याचा आपल्या भाषणात आवर्जुन उल्लेख केला. कोविड योध्यांच्यावतीने प्रातिनिधीक स्वरुपात विचार व्यक्त करताना अ‍ॅड.सुभाष निकम यांनी कोरोना रुग्णसेवा समितीने केलेल्या कामाची माहिती देवून रुग्णवाहका आणि ऑक्सिजन प्लांट उपलब्ध करून दिल्याबद्दल ना.धनंजय मुंडे आणि माजी आ.अमरसिंह पंडित यांचे आभार व्यक्त केले.

कोरोनाविषयक सर्व नियमांचे पालन करून हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला. सन्मानित झालेल्या कोविड योध्यांच्या चेहर्यावर आनंदाचे भाव दिसून येत होते. मंडपात गुलाबी फेटे घातलेल्या आशा कार्यकर्ती आणि कोविड योध्यांमुळे कार्यक्रमाला वेगळीच रंगत आली. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे सर्व पदाधिकारी, विविध संस्थांचे प्रमुख, सामाजिक कार्यकर्ते यावेळी कार्यक्रमाला उपस्थित होते.

या कोविड योध्यांचा झाला सन्मान…

सर्व डॉक्टर, नर्स आणि रुग्णालयातील स्टाफ यांच्यावतीने प्रातिनिधीक स्वरुपात वैद्यकीय अधिक्षक डॉ.महादेव चिंचोळे आणि तालुका आरोग्य अधिकारी डॉ.संजय कदम यांना सन्मानित करण्यात आले. आशा स्वयंसेविका कार्यकर्ती यांच्यावतीने ज्योति वाघमोडे, संजीता मोटे, मिराबाई मिसाळ, उमा सुतार, सुबाना शेख आणि संजीता कोकणे यांचा प्रातिनिधीक स्वरुपात सन्मान करण्यात आला. सुमारे ४० वार्ड बॉयच्या वतीने गणेश महानोर, महेश धुंरंधरे आणि प्रदिप शेंबडे यांना संपुर्ण पोशाख, शाल-श्रीफळ, पुष्पगुच्छ आणि प्रमाणपत्र देवून गौरविण्यात आले. मृत रुग्णांच्या अंत्यसंस्कारा पर्यंतची कामे करणार्या बालाजी करांडे यांचाही सन्मान झाला. कोरोना रुग्णसेवा समितीच्यावतीने अ‍ॅड.सुभाष निकम, बाळासाहेब सानप, कडुदास कांबळे आणि प्रशांत गोलेच्छा यांचा प्रातिनिधीक स्वरुपात सन्मान झाला. तात्यासाहेब मेघारे, बाळासाहेब मस्के, शेख एजाज (ड्रायफ्रुटवाले) डॉ.सर्वोत्तम शिंदे, अक्षय पवार, संदिप मडके, अर्जुन सुतार आणि सौ.मुक्ता आर्दड या सामाजिक कार्यकर्त्यांचाही सोहळ्यात सन्मान करण्यात आला. व्यासपीठावरील मान्यवरांच्याहस्ते सर्वांचा सन्मान टाळ्यांच्या गजरात करण्यात आला.