पितृदिनाची महती : वर्णावी बरं किती?

83

(जूनचा ३रा रविवार – जागतिक पितृदिन विशेष)

प्रत्येकासाठी आई-वडील हे नाते फार प्रेमळ व स्पेशल असते. आई हे घराचे मांगल्य असते तर वडील हे अस्तित्व असतात, असे म्हटले जाते. प्रत्येक वडील आपल्या मुलाच्या भविष्यासाठी दिवसरात्र मेहनत करतात. त्यांच्या सन्मानासाठी आज जगभर ‘पितृदिन’ अर्थात ‘फादर्स डे’ साजरा केला जात आहे.
पितृदिनाच्या इतिहासाबद्दल दोन वेगवेगळे दाखले दिले जातात- १) फादर्स डे हा सन १९०७ मध्ये व्हर्जिनियामध्ये सर्वप्रथम साजरा केला गेला असे म्हटले जाते. व्हर्जिनियातील एका खाणीत झालेल्या स्फोटात २१० कष्टकऱ्यांचा मृत्यू झाला होता. या मृतांना विशेष श्रद्धांजली वाहण्यासाठी दि.१९ जून १९०७ रोजी फादर्स डे साजरा करण्यात आला. मात्र याबाबत कुठेही अधिकृत नोंद आढळत नाही. २) सोनोरा स्मार्ट डोड हिने सन १९१० मध्ये साजरा केलेला फादर्स डे हा अधिकृतरित्या पहिला मानला जातो. सोनोरा स्मार्ट डोड लहान असताना तिच्या आईचे अचानक निधन झाले. यानंतर तिचा सांभाळ तिचे वडील विलियम स्मार्ट यांनी केला.

एक दिवस ती प्रार्थना सभेसाठी गेली असता चर्चमध्ये आई या विषयावर उपदेश देण्यात आला. त्याने ती फार प्रभावित झाली. सोनोरा मोठी झाल्यानंतर आईप्रमाणे वडिलांसाठी एखादा खास दिवस असावा, या पार्श्वभूमीवर तिने फादर्स डे साजरा करण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार तिचे वडील विलियम स्मार्ट यांच्या जन्मदिनी ५ जूनला तिने फादर्स डे साजरा केला. वडिलांच्या सन्मानार्थ तिने साजरा केलेल्या फादर्स डे या संकल्पनेला सन १९२४ मध्ये अमेरिकेचे तत्कालीन राष्ट्रपती कॅल्विन कोली यांनी अधिकृतरित्या मंजूरी दिली. यानंतर सन १९६६ मध्ये राष्ट्रपती लिंडन जॉनसन यांनी दरवर्षी जून महिन्याच्या तिसऱ्या रविवारी फादर्स डे साजरा केला जाईल, अशी घोषणा केली. मात्र ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड यासारख्या देशात सप्टेंबर महिन्याच्या पहिल्या रविवारी तो साजरा केला जातो. तर ब्राझीलमध्ये ऑगस्ट महिन्याच्या दुसऱ्या रविवारी साजरा करतात.

सुरुवातीला केवळ अमेरिकेतच फादर्स डे साजरा केला जात असे. मात्र कालांतराने यादिवसाचे महत्त्व पटल्यानंतर भारतातही तो पितृदिन म्हणून साजरा करण्यात येऊ लागला. वडिलांप्रती आपल्या भावना व्यक्त करण्यासाठी संपूर्ण जगभरात त्या दिवसाचे अनोखे महत्त्व आहे.सन २०२१मधील दि.२० जून हा दिवस अनेकार्थाने महत्त्वाचा आणि विशेष असणार आहे. या दिवशी अनेक गोष्टी घडणार व साजऱ्या केल्या जाणार आहेत. मे महिन्यात मदर्स डे साजरा केल्यानंतर जून महिन्यात फादर्स डे साजरा केला जातो. आई व वडील यांच्याविषयी कितीही बोलले तरी कमीच आहे. दोघेही आपल्या मुलांना वाढविण्यासाठी, त्यांना मोठे करण्यासाठी, त्यांच्या गरजा, इच्छा, अपेक्षा पूर्ण करण्यासाठी रात्रंदिन झटत असतात. या दोघांविषयीची कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी अमेरिकेने दोन दिवस निश्चित केले आहेत. मे महिन्याचा पहिला रविवार आईबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी मदर्स डे तर जून महिन्यातील तिसरा रविवार फादर्स डे म्हणून साजरा केला जातो. जून महिना सुरू झाला की, फादर्स डेच्या चर्चांना उधाण येते.

फादर्स डे कधीपासून? आणि कोणत्या देशात साजरा केला जातो? याबाबत फार कमी जणांना माहिती असते. चला, जाणून घेऊया या फादर्स डेविषयी…अमेरिकन सरकारतर्फे सन १९१३ मध्ये मदर्स डे अधिकृतपणे जाहीर करण्यात आला. त्यानंतर जवळपास ६० वर्षांनी म्हणजेच सन १९७२ मध्ये फादर्स डे जाहीर करण्यात आला. तरीही अमेरिका आणि इंग्लंडमधील काही ठिकाणी फादर्स आणि मदर्स डे जून महिन्याच्या तिसऱ्या आठवड्यात साजरा केला जातो. जागतिक पातळीवर फादर्स डे साजरा करण्याच्या वेळा आणि त्यामागील कारणे वेगवेगळी आहेत. पोर्तुगाल, इटली व स्पेनमध्ये १९ मार्च रोजी सेंट जोसेफ यांचा जन्मदिवस म्हणून फादर्स डे साजरा केला जातो. तर, जिजसला माता मानणारे तिच्या नवऱ्याचा जन्मदिवस म्हणून हा दिवस फादर्स डे म्हणून साजरा करतात. इंग्लंडमध्ये दुसऱ्या महायुद्धानंतर हा दिवस साजरा केला जाऊ लागला. यानंतर हळूहळू जगभरतील सुमारे ७० देशांमध्ये जून महिन्याच्या तिसऱ्या रविवारी फादर्स डे साजरा केला जाऊ लागला. सन १९०९ मध्ये साजरा करण्यात आलेल्या मदर्स डेच्या दिवशी फादर्स डे साजरा करण्याची प्रेरणा मिळाली होती, असे सांगितले जाते.

वॉशिंग्टनमधील स्पोकेन शहरातील सोनोरा डॉड नामक व्यक्तीने आपल्या वडिलांच्या स्मृतिप्रित्यर्थ हा दिवस साजरा केला होता, असे सांगितले जाते. सन १९१६ मध्ये अमेरिकेचे तत्कालीन राष्ट्रपती वुड्रो विल्सन यांनी फादर्स डे साजरा करण्याच्या प्रस्तावाला मंजुरी दिली होती. सन १९६६ मध्ये प्रथम जून महिन्याच्या तिसऱ्या रविवारी फादर्स डे साजरा करण्यात आला होता. अमेरिकेत वडिलांना डिनर किंवा ब्रंच, कपडे, इलेक्ट्रॉनिक वस्तू, कार तसेच खेळाशी निगडीत वस्तू भेट म्हणून दिल्या जातात. तर इंग्लंडमध्ये चॉकलेट, अल्कोहोल, पुस्तके व इलेक्ट्रॉनिक वस्तू या गिफ्ट म्हणून दिल्या जातात.
असे म्हणतात, आई आपल्या बाळाला जगात आणते, तर वडील आपल्या मुलाला जग दाखवतो. त्यामुळे आपल्या जन्मात, जडणघडणींत जेवढा आईचा वाटा असतो. वडीलही आपल्या मुलांसाठी तितकीच महत्त्वपुर्ण अशी भूमिका बजावतात. आई आपल्या मुलाला नऊ महिने पोटात सांभाळते तर वडील आपल्या मुलाला नेहमी डोक्यातच ठेवतात. म्हणजेच त्याच्या भविष्यासाठी तरतूद करण्याची तयारी हा प्रत्येक वडील आपल्या मुलाच्या जन्माआधीपासून करायला सुरुवात करतो.

मात्र अनेकदा आईच्या अफाट प्रेमामुळे वडीलांचे हे प्रेम आपल्या दृष्टीस पडत नाही. अशा या वडीलांचा विशेष सन्मान करण्याचा हा दिवस होय. जगातील प्रत्येक आईप्रमाणे वडिलांनाही सन्मान देण्याचा आणि ते आपल्यासाठी किती खास आणि महत्त्वाचे आहेत, हे दाखवून देण्याचा दिवस म्हणजे फादर्स डे. या दिवशी मुले आपल्या वडीलांसाठी खास सरप्राइज प्लान करतात. त्यांना भेटवस्तू देतात. बरेचदा मुले जितकी आपल्या आईविषयी असणारे प्रेम मन मोकळेपणाने प्रकट करतात, तेवढे बाबांविषयी असणारे प्रेम व्यक्त करत नाही. कदाचित बाबांविषयी असणारी भीती हे त्यामागचे कारण असू शकते. मात्र या दिवशी तुम्ही बाबांविषयी असणाऱ्या तुमच्या भावना अगदी बिनधास्त व्यक्त करु शकतात. म्हणूनच या दिवसाला विशेष असे महत्त्व आहे.
कुटुंबाचा आधारस्तंभ असलेल्या, संयमशील व वेळेवर तितकेच कठोर होणाऱ्या समस्त पित्यांना पुरोगामी संदेश परिवारातर्फे जागतिक पितृदिनाच्या हार्दिक शुभेच्छा !

 

✒️संकलन व शब्दांकन:-श्रीकृष्णदास (बापू) निरंकारी.(मराठी साहित्यिक विदर्भ प्रदेश.]मु. पोटेगावरोड, पॉवर स्टेशनच्या मागे, रामनगर, गडचिरोली.जि. गडचिरोली, व्हा. नं. ९४२३७१४८८३.