पटोले साहेब, कॉंग्रेसला स्वबळावर लढायचे असेल तर पक्षातल्या निष्क्रिय सरंजामांना घरी बसवा

34

✒️दत्तकुमार खंडागळे(संपादक वज्रधारी)मो. 9561551006

काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी काँग्रेस पक्ष स्वबळावर निवडणूका लढवणार असल्याचे घोषित केले आहे. त्यांच्या या घोषणेने राष्ट्रवादी आणि शिवसेनेत थोडी अस्वस्थता पसरली आहे तर भाजपाला उकळ्या फुटल्या आहेत. आघाडीत कुरकुर सुरू झाली की कमळी गोरीमोरी व्हायला सुरूवात होते. तिच्या महत्वकांक्षा जाग्या व्हायला सुरूवात होते. मनात सत्तेचा वसंत फुलारायला सुरूवात होते. कोल्हापुरचे चंदू भाऊ, किरीट सोमय्या, दरेकर वगैरे कंपनी आराधना चालू करतात. यांचे फाटतय आणि आम्ही कधी चिकटतोय ? असे भाजपेयी टोळक्यांना वाटते. नाना पटोलेंच्या वक्तव्यांना काहीसे असेच झाले आहे. तोवर राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटलांनी लगेच “तुम्ही लढणार असाल तर लढा आम्ही शिवसेनेला सोबत घेवून लढू !” असे सांगत कॉंग्रेसच्या स्वबळाच्या उकळीला वाकुल्या दाखवल्या आहेत. काँग्रेसवाले स्वबळावर लढणार म्हणत असले तरी काँग्रेसकडे स्वबळ किती उरलय ? हा चिंतनाचा विषय आहे. जर लढायचेच असेल तर कॉग्रेसने आपल्याच पक्षातल्या निष्क्रीय सरंजामांना घरी बसवले पाहिजे. नवीन नेतृत्व पुढे आणायला हवी आहेत. तरच कॉंग्रेसला भविष्य आहे.

कॉंग्रेसचे शत्रू कॉंग्रेसबाहेर नाहीतच. काँग्रेसचे शत्रू कॉंग्रेसमध्येच आहेत. जे पिढ्यानपिढ्या पक्षातल्या महत्वाच्या जागा अडवून बसले आहेत. आज्जा झाला की बाप, बाप झाला की नातू अशा परंपरेने ज्यांनी जागा अडवलेल्या आहेत तेच संरजामी खरेतर कॉंग्रेसची मुख्य अडचण आहेत. हे सगळे लोक पदं घेतात, अंडी उबवल्या सारखी पदं उबवत बसतात. अंडी उबवल्यावर किमान अंड्यातून पिल्लतरी निघतात पण या वारसा हक्काने पदावर आलेल्या सरंजामाच्या पदं उबवण्यातून काहीच निघत नाही. हे निष्क्रीय लोक पदं उबवण्यापलिकडे काहीच करत नाहीत. कॉंग्रेसमधले परंपरेने, वारसा हक्काने पदावर आलेले लोक पक्षासाठी काय करतात ? त्यांनी पक्षासाठी काय योगदान दिले ? तळागाळात जावून पक्ष किती वाढवला ? किती नवे कार्यकर्ते पक्षाला जोडले ? सत्ता गेल्यावर लोकांच्या प्रश्नावर किती लढे उभारले ? लोकांच्या प्रश्नासाठी किती चळवळी उभारल्या ? किती मोर्चे काढले ? किती उपोषणे केली ? किती आंदोलने केली ? कॉंग्रेसचा विचार किती गावात जावून लोकांना समजावून सांगितला ? कॉंग्रेसचे नेते राहूल गांधी, सोनिया गांधी यांच्यावर विरोधी पक्ष अतिशय खालच्या पातळीवर जावून हल्ले करत असताना त्याचा प्रतिवाद किती लोकांनी केला ? या प्रश्नावलीचे निकष तयार करून प्रत्येक नेत्याचे प्रगती पुस्तक तयार करावे.

या प्रगती पुस्तकावर त्यांचे कार्य किती महान आहे ? याचा लेखाजोखा मांडावा. या यादीत जेवढे कार्यतत्पर व सक्रीय नेते येतात त्यांनाच पक्षाने तिकीट द्यावे. त्यांनाच पक्षातली पदं द्यावीत. बाकी वाझं खुर्च्या उबवणा-या सरंजामी लोकांना घरी बसवावे. तर आणि तरच कॉंग्रेसला स्वबळावर लढता येईल. जन-माणसात अजून काँग्रेसचा विचार जीवंत आहे. सामान्य कार्यकर्ता अजून काँग्रेसचा विचार आपला विचार मानतो पण ज्यांनी पिढ्यान-पिढ्या पदं, खुर्च्या उबवल्या त्यांना पक्षाशी, पक्ष नेतृत्वाशी काही देणेघेणे नाही. त्यांना लोकांशी, लोकांच्या प्रश्नांशीही काही देणेघेणे नाही. केवळ परंपरेने सत्ता अडवून ठेवायचे काम हे लोक करत आहेत. याच्या पलिकडे या लोकांचे काम काय ?

आज्जा झाला की बाप, बाप झाला की नातू अशा परंपरेने जागा अडवणारे काँग्रेसमध्ये खुप लोक आहेत. त्यांचे पक्षासाठीचे योगदान काँग्रेस पक्ष कधी तपासणार का ? पक्षासाठी जीवाचे रान करणा-या दुस-या व तिस-या फळीतल्या चांगल्या कार्यकर्त्यांना पक्ष कधी मोजणार का ? हा खरा प्रश्न आहे. आज राहूल गांधी एकाकी भाजपाला व राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला टक्कर देत असताना पक्षातले किती लोक त्यांच्यासोबत उभे राहिले ? यातल्या किती सरंजामांनी पक्ष विचार आणि नेतृत्वाबद्दलची विधायक व सकारात्मक माहिती समाजात जावून सांगितली ? कॉंग्रेसमध्ये राज्यभर नव्हे देशभर हेच चित्र आहे. सांगली जिल्ह्यातील शिवाजीराव देशमुख हे पक्षाच्या मेहरबानीने हयातभर आमदार राहिले. विधानसभेचे सभापतीही राहिले पण काँग्रेसची सत्ता जाताच त्यांचा मुलगा सत्यजीत देशमुख भाजपात भुर्र उडून गेला. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री राहिलेल्या वसंत दादांच्या घरात आजतागायत सत्ता राहिली. दादा मुख्यमंत्री, त्यांच्या पत्नी शालिनताई पाटील मंत्री, त्यांचा मुलगा प्रकाश बापू पाटील सतत खासदार, त्यांची पत्नी पक्ष संघटनेत पदावर, त्यांचा मुलगा प्रतिक पाटील दोनवेळा खासदार व केंद्रात मंत्री. वसंतदादाचे भाऊ विष्णू अण्णा पाटील आमदार, त्यांचा मुलगा मदन पाटील आमदार व मंत्री. घरातले बहुतेक सदस्य वेगवेगळ्या पदावर विराजमान होते.

काँग्रेसची सत्ता असेपर्यंत या सगळ्यांना सत्तेचे तुप रग्गड चाखायला मिळाले. केंद्रीय मंत्री राहिलेले प्रतिक पाटील पक्षासाठी काय करतात ? गेल्या सात वर्षात त्यांनी काँग्रेससाठी काय केले ? काँग्रेस विचार तळागाळात रूजवण्यासाठी काय मेहनत घेतली ? पक्ष वाढविण्यासाठी त्यांनी किती योगदान दिले ? हे पक्षाच्या वरिष्ठांनीच त्यांना विचारावे. बाकी सामान्य काँग्रेस कार्यकर्ता ते ओळखून आहेच. एका सांगली जिल्ह्याची जी अवस्था आहे तीच इतर जिल्ह्याचीही आहे. सांगली जिल्ह्यातली ही दोन उदाहरणे प्रतिकात्मक म्हणून दिली आहेत. उडदावरच्या अळीसारखे सत्तेवर बसून केवळ गलेलठ्ठ व्हायचे काम अनेकांनी केले आहे. पक्षांने हे उडदावरचे लोद बाजूला करून नव्या नेतृत्वांना संधी द्यायला हवी. राहूल गांधीच्या खाद्याला खांदा लावून लढणारे, काँग्रेसचा विचार तळागाळात जावून रूजवणारे, लोकांना समजून सांगणारे, विरोधकांना ताकदीने भिडणारे लोक पुढे आणून त्यांना संधी द्यायला हवी. वारसा हक्काने आलेले निष्क्रीय सरंजाम मोडीला घातले तर निश्चितच काँग्रेसला गतवैभव प्राप्त होईल. मग कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले स्वबळाची भाषा करतायत ती योग्य होईल. कॉंग्रेसला आपली ताकद दाखवता येईल. काँग्रेसच्या विचारासोबत आजही लोक आहेत पण काँग्रेसचेच नेते काँग्रेसच्या विचारासोबत नाहीत त्याचे काय ?