कोरोनामुळे आदिवासी भागातील कुपोषणाची समस्या तीव्र

25

राज्यातील संपुर्ण आरोग्य यंत्रणा कोरोना रुग्णांच्या मागे धावत असल्यामुळे आदिवासी भागातील मुलांच्या आरोग्याचा मुद्दा आता पुरता टांगणीला लागला आहे. टाटा समाज संस्थेने आदिवासी भागातील मुलांच्या आरोग्यावर एक अहवाल प्रसिद्ध केला आहे. हा अहवाल महाराष्ट्रासारख्या पुरोगामी राज्याला मान खाली घालायला लावणारा आहे. या अहवालानुसार ठाणे, पुणे, जळगाव व गोंदिया या जिल्ह्यात मागील वर्षापेक्षा यावर्षी अधिक बालमृत्यू झाले आहेत. नंदुरबार, धुळे, नगर, अमरावती, गडचिरोली या जिल्ह्यातील आदिवासी बालकांच्या आरोग्याची समस्या गंभीर बनली आहे. पुढील चार महिन्यात म्हणजे पावसाळ्यात राज्यातील १६ जिल्ह्यातील आदिवासी बालकांच्या आरोग्याचा प्रश्न अधिक गंभीर बनणार असल्याचेही या अहवालात म्हटले आहे.

मेळघाट मध्ये कमी वजनाच्या मुलांची संख्या जास्त असल्याचे या अहवालात सांगण्यात आले आहे. याचा अर्थ तिथे कुपोषणाचे प्रमाण जास्त आहे. राज्यात ९७ हजारांहून अधिक अंगणवाड्या आहेत. या अंगणवाड्यात मुलांना पौष्टिक आहार मिळतो. कोरोनामुळे मागील दीड वर्षांपासून अंगणवाड्या बंद आहेत तरीही अंगणवाडी सेविका मुलांना पौष्टिक आहार पोहचवण्याचा प्रयत्न करतात पण आदिवासी भागातील सर्वच मुलांपर्यंत अंगणवाडी सेविकांना पोहचणे शक्य होत नाही त्यामुळे आदिवासी भागातील अनेक मुले पौष्टिक आहारापासून वंचित राहतात त्याचाच परिणाम म्हणजे या भागातील वाढलेले कुपोषण. कमी वजनाच्या, कुपोषित व तीव्र कुपोषित बालकांची माहिती घेऊन उपचाराची दिशा निश्चित होते परंतु; अंगणवाड्याच बंद असल्याने उपचाराची दिशाच बंद झाली आहे परिणामी कुपोषणाचे प्रमाण वाढले.

कोरोनामुळेच आदिवासी भागातील कुपोषणाची समस्या तीव्र बनली असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही. कुपोषणाची समस्या केवळ आदिवासी, दारिद्य्र असलेल्या भागातच नाही तर निमशहरी भागांतही आहे. पुण्यासारख्या विद्येचे माहेरघर असलेल्या व देशाची शैक्षणिक राजधानी असलेल्या शहरातही बालमृत्यूचे प्रमाण जास्त आहे ही चिंतनीय बाब आहे. मागील वर्षी राष्ट्रीय कुटुंब सर्वेक्षणाचा अहवाल आला होता त्यात तर असे नमूद करण्यात आले होते की पाकिस्तान, बांगलादेश या शेजारी राष्ट्रांपेक्षा भारतात कुपोषणाचे प्रमाण अधिक आहे. देश स्वातंत्र्य होऊन सत्तर वर्ष उलटली तरी कुपोषणाची समस्या मिटली नसल्याचे उलट ती वाढल्याचे भीषण वास्तव समोर येणे हे कुपोषण मुक्तीसाठी आजवर केलेले सर्व प्रयत्न फोल ठरल्याचे निदर्शक आहे. ज्या बालकांच्या जोरावर आपण जागतिक महासत्ता बनण्याचे स्वप्न पाहत आहोत तोच बालक जर अशक्त असेल, त्याला दोन वेळेचे पुरेसे अन्न मिळत नसेल तर आपण जागतिक महासत्ता बनण्यास खरेच पात्र आहोत का? असा प्रश्न पडतो. आजचे बालक हेच देशाचे भविष्य आहे जर तोच सशक्त नसेल तर देश सशक्त नसेल म्हणूनच देशातून कुपोषण कायमचे हद्दपार व्हायला हवे त्यासाठी सरकारने ठोस उपाययोजना करायला हव्यात.

✒️लेखक:-श्याम ठाणेदार(दौंड जिल्हा पुणे)