जन्माला येणाऱ्या प्रत्येक बाळाचे संगोपन करून सुदृढ व निरोगी बालक तयार करा – जि.प.सदस्य संजय गजपुरे

24

🔸नवजात बालकांसाठी बेबी केअर कीट बँग चे वाटप

✒️रोशन मदनकर(उप संपादक)

नागभीड(दि.4जुलै):- महिला व बालकल्याण विभाग जि.प.चंद्रपूर च्या माध्यमातून एकात्मिक बाल विकास सेवा योजना , नागभीड च्या नवेगाव बीट अंतर्गत नवजात बालकांसाठी बेबी केअर कीट बँग चे वाटप जि.प.सदस्य संजय गजपुरे यांच्या हस्ते करण्यात आले. या कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी म्हणून तालुका बाल विकास प्रकल्प अधिकारी राजेंद्र ठोंबरे , पर्यवेक्षिका विभावरी तितरे , सरस्वती ज्ञान मंदिर चे सहा.शिक्षक किरण गजपुरे व पराग भानारकर यांची उपस्थिती होती.

एकात्मिक बालविकास सेवा योजना ही केंद्रपुरस्कत योजना असुन ० ते ६ वयोगटातील मुलांच्या विकासाकडे लक्ष देण्यासाठी राज्यात लागु आहे. बालमृत्युचे प्रमाण रोखण्यासाठी विविध योजना उपाययोजना करीत असतात. महाराष्ट्र राज्यात शासकीय प्राथमिक आरोग्य केंद्र / शासकीय रुग्णालयात गरोदरपणी नाव नोंदणी केलेल्या व त्याठिकाणी प्रसुती होणाऱ्या नवजात बालकांना पहिल्या प्रसुतीच्यावेळी २००० रु. च्या रकमेपर्यंत बेबी केअर कीट बँग मोफत उपलब्ध करून दिल्या जाते.यात लहान मुलांचे कपडे , प्लास्टिक लंगोट , झोपण्याची लहान गादी , टाँवेल , ताप मापन यंत्र इलेक्ट्रॉनिक थर्मामीटर , अंगाला लावायचे तेल , मच्छरदाणी, गरम ब्लाँकेट , लहान प्लास्टिक चटई , शाम्पु , लहान मुलांची खेळणी खुळखुळा , नखे कापण्यासाठी नेलकटर , हातमोजे व पायमोजे , आईसाठी हात धुण्याचे लिक्विड , लहान मुलांसाठी बाँडी वाँश लिक्वीड , लहान मुलाला बांधून ठेवण्यासाठी कापड/ आईसाठी लोकरीचे कापड व सर्व साहित्य ठेवण्यासाठी लहान बँग यांचा समावेश असतो.
राज्याचे आरोग्य आणि सामाजिक स्थितीचे मोजमाप हे बालमृत्यू दर आहे .

त्यामुळे जन्माला येणाऱ्या प्रत्येक बाळाचे संगोपन करून सुदृढ व निरोगी बालक तयार करा आणि चांगले संस्कार देऊन उत्तम नागरिक निर्माण करण्याचे आवाहन याप्रसंगी जि.प.सदस्य संजय गजपुरे यांनी केले व सोबतच कोरोना काळात फ्रंटलाईन वर्कर म्हणून सातत्याने कार्य करणाऱ्या आंगणवाडी शिक्षिका व सेविकांचे अभिनंदन केले . बालविकास प्रकल्प अधिकारी ठोंबरे यांनी या योजनेची माहिती दिली . पराग भानारकर यांनी नवजात बालकांवर योग्य संस्कार करण्यासाठी ” शामच्या आईच्या ४० रात्री ” हे पुस्तक वाचण्याची सुचना केली .यावेळी किरण गजपुरे यांनीही मनोगत व्यक्त केले .उपस्थित लाभार्थ्यांना अतिथींच्या हस्ते बेबी केअर कीट बँग चे वाटप करण्यात आले .

क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पुजन करुन सुरु झालेल्या या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आंगणवाडी सेविका सौ.पल्लवी ठाकरे यांनी केले तर आभार आंगणवाडी सेविका सौ.राजश्री साखरकर यांनी मानले. यशस्वितेसाठी प्रकल्प कार्यालयाचे अतुल मेशकर , आंगणवाडी सेविका ज्योत्स्ना वाकडे , किरण भालेराव , संगिता रामटेके , सितारा शेख , आंगणवाडी मदतनीस सौ.यशोधरा सहारे यांनी सहकार्य केले .