मोहता गिरणी कामगारांनी आपल्या मागण्यांसाठी उपविभागीय अधिकारी कार्यालयावर काढला मोर्चा

    38

    ?वंचित बहुजन आघाडीचे नेते डाॅ.उमेश वावरे यांनी केले नेतृत्व

    ✒️इकबाल पैलवान(हिंगणघाट प्रतिनिधी)

    हिंगणघाट(दि.५जुलै):-मोहता गिरणी कामगारांनी आपल्या मागण्यांसाठी आज दि.५ रोजी उपविभागीय अधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला.वंचित बहुजन आघाडीचे नेते तसेच कामगार नेते डाॅ.उमेश वावरे यांच्या नेतृत्वात या धडक मोर्चाचे आयोजन करण्यात आले.यावेळी डॉ.उमेश वावरे तसेच इतर कामगार प्रतिनिधीच्यावतीने राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे नावे निवेदन देवून तहसीलदार श्रीराम मुंदडा यांचेशी चर्चा करण्यात आली.सदर मोहता गिरणी ही १३५ वर्षं जुनी असुन हिंगणघाट शहरातील तसेच ग्रामीण भागातील काम करणाऱ्या कामगारांचा उदरनिर्वाह गिरणीवर अवलंबून आहे.

    कंपनी संचालकानी अचानक मिल बंद केल्यामुळे कामगार व त्यांचे कुटुंबियांवर उपासमारीची वेळ आली आहे. अनेक कामगाराचे वय हे ३० ते ४० च्या दरम्यान असुन रोजगाराच्या पेचप्रसंग निर्माण झाला आहे. मागील अनेक महिण्याचे वेतन कामगारांना अजूनही मिळाले नाही,संचालक मंडळास गिरणी बंद करावयाची असल्यास संपूर्ण कामगाराना कंपनी अक्ट नुसार व्हीआरएस देण्यात यावे. तसेच प्रोत्साहनपर १० लाख रक्कम देण्यात यावी. कामगारांच्या या न्याय्य मागण्या गिरणी व्यवस्थापनाने मंजुर केल्या नाहीतर त्यांचेसमोर आत्महत्येशिवाय दुसरा पर्याय राहणार नाही.जर एखादा कामगाराने आर्थिक विवंचनेपायी आत्महत्या केली याची जबाबदारी कोण घेणार असा प्रश्न यावेळी करण्यात आला.

    सदर मिलाची सोसायटी(पत संस्था) असून त्या सोसायटीची सुमारे ३६ लाख रूपये रक्कम गिरणी व्यवस्थापणाकडे अजूनही जमा आहे,ती रक्कम सोसायटी खात्यात जमा करण्यात यावी, ईएसआयसंबंधी प्रलंबित रक्कमसुद्धा गिरणीमालकाने भरली नसल्यामुळे कामगारांना ईएसआय चे लाभ मिळणे बंद आहे , यावेळी त्वरित गिरणी मालकाकडून ईएसआयची रक्कम भरण्यात यावी,येत्या ८ दिवसात मागण्या मान्य केल्या नाहीतर यापेक्षा तिव्र आन्दोलन करण्याचा ईशारा डॉ.वावरे तसेच कामगारांच्यावतीने प्रशासनास देण्यात आला, निवेदन देताना दिलीप कहूरके, मनिष कांबळे,राजेश खानकूरे, प्रदीप माणिकपुरे,विलास ढोबळे ,देवराव साबळे,अरूण काळे,गुलाबराव पिपळशेंडे, अनिल तादूळकर, रत्नाकर कुंभारे,मधुकर जागडे,नितिन कानकाटे, जिवन उरकुडे यांचेसह अन्य मिल कामगार,महिलावर्ग उपस्थित होता.