नव्या दमाचं वादळःरिपब्लिकन चळवळीतील बुलंद आवाज; दादासाहेब ओव्हाळ

26

✒️सचिन सरतापे(प्रतिनिधी,म्हसवड)मोबा.9075686100

▪️शब्दांकन-अ रु ण वि श्वं भ र
९८ २२ ४१ ५४ ७२

भीमाईभूमीतील अर्थात साताऱ्यातील रिपब्लिकन चळवळीतील स्वतंत्र विचाराचे व्यक्तिमत्त्व. अन्याय अत्याचाराच्या विरोधात हाक देणारा प्रखर योध्दा. समाजाबद्दल कळवळा असणारा रिपब्लिकन नेता. बिकट, अवघड, संवेदनशील परिस्थितीत अचूक निर्णय घेणारं नेतृत्व. केवळ बोलणारा नव्हे तर जे बोलतो ते कृतीत उतरवणारा आणि आपल्या कार्यप्रलाणीने रिपब्लिकन चळवळीत तळपत राहणारा नव्या दमाचा, नव्या पिढीचा बुलंद आवाज, दमदार प्रणेता म्हणजे दादासाहेब ओव्हाळ !

भीमाईभूमीतील चळवळीच्या क्षितिजावर साधारणपणे दोन दशकांपूर्वी हे नेतृत्व उदयास आले. तेव्हाचा काळ हा चळवळीसाठी भारलेला होता. ‘हर जोर जुल्म की टक्कर मे संघर्ष हमारा नारा है !’ ही उदघोषणा बुलंद करण्यासाठी अनुकूल होता. सच्चा आणि प्रामाणिक कार्यकर्त्याला आदराने तळहातावर जपलं जात होतं. सामाजिक चळवळीत चढउतार आले तर ते कसे पार करायला हवेत याचा एक धडा येथे प्रत्येकाला अभ्यासायला मिळत होता. ही सर्व परिस्थिती पहात, अनुभवत दादासाहेब ओव्हाळ यांचा सामाजिक, राजकीय प्रवास सुरु होता. भीमाईभूमीतील चळवळ अनेकअंगाने, चहूबाजूने विस्तारत होती.

बहुजन समाज पक्षाची साताऱ्यात बांंधणी, आरक्षण रद्द करण्याचा मुद्दा, भीमाई स्मारकाचा प्रश्न, डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या निवासस्थानाचा विषय असे एकना अनेक मुद्दे चव्हाट्यावर येत होते. अशातच प्रतापसिंह नगरात दंगल आणि बरंच काही घडत होते. मुंबईतील धारावी झोपडपट्टी जशी मोठी आणि निरनिराळ्या कारणाने सतत धगधगत राहते, चर्चेत राहते तशीच या सातारच्या प्रतापसिह नगराची ओळख. येथे दररोज हाणामाऱ्या, तू तू मैं मै असं होत होते. थरकाप उडवणारे सायरनचा आवाज करतच पोलिसांच्या गाड्या या नगरात घूसत होत्या अन् पोलिसांवर बेधडक दगडफेकही होत होती. या आणि अशा धुमसणा-या वातावरणात दादासाहेब ओव्हाळ हे व्यक्तिमत्त्व काळाची पाऊले ओळखत हळूहळू पुढे पुढे सरकत होते.

या दरम्यान भीमाईभूमीच्या अर्थात सातारच्या चळवळीत विशेषतः पहिल्या फळीत जे काही नेते प्रामाणिकपणे राबत होते त्यांना दादासाहेब ओव्हाळ हे व्यक्तिमत्त्व खूणावू लागले. या व्यक्तिमत्वाबद्दल त्यांना बरंच काही वाटू लागले. अनेकांनी दादासाहेबांना एकत्रित काम करण्याची निमंत्रणे धाडली. अर्थात दादासाहेब ओव्हाळ यानी त्यावेळी त्या निमंत्रणाचा आदरही केला. परंतु म्हणतात ना स्वयंप्रेरणेनं कार्यरत असणारं कोणतंच नेतृत्व हे जसं फार काळ कोणाच्या अधिपत्याखाली रहात नाही, तर ते स्वतःचे विश्व स्वतःच स्वतंत्रपणे उभा करते. अगदी तसंच दादासाहेब ओव्हाळ यांनी इतरांच्या वर्तुळात राहण्याऐवजी स्वतःचे असे एक भक्कम वलय तयार केले. तरण्याबांड युवकांची फौज साता-यासह जिल्हाभर उभारण्याचा त्यांनी प्रयत्न केला. यथावकाश मा. रामदास आठवले, मा. उदयनराजे भोसले, मा. अविनाश महातेकर, मा. राज ठाकरे, मा.अजित पवार अशा राज्यकरण्यांचे कॉल त्यांना येऊ लागले.

दादासाहेब यांची ताकद पौर्णिमेच्या चंद्रासारखी कलेकलेने वाढू लागली. यामुळे एकमात्र झाले. सातारा शहर आणि जिल्ह्यात जे जे चळवळीत पोहत होते ते ते दादासाहेबांच्या या लाटेमुळे हडबडले. प्रतापसिंह नगर या वसाहतीतील एका उपऱ्या कार्यकर्त्याला नेता म्हणून कसे स्वीकारायचे किंवा मान्य करायचे या प्रश्नाने नाखूषवाल्यांना घेरले. परंतु कालौघातात त्यांना दादासाहेब यांच्यातील धमक आणि चमक पहायला मिळाली. सातारा शहरातील पुतळा विटंबन प्रकरणं, बहुजन क्रांती मोर्चा, ॲट्रोसिटी विषय, रिपब्लिकन नेत्यावरील तडीपारीचे मुद्दे, एमआयडीसीतील कामगारांचे प्रश्न, भाजी विक्रेत्यांच्या अडचणी, शहरातील झोपडपट्याची आंदोलने या माद्यमातून दादासाहेब यांनी घेतलेली भूमिका आणि त्यासाठी केलेले जीवाचे रान हे अनेकांनी अनुभवले.

कोणत्याही गोष्टीत उतरायचे तर तिथे प्रामाणिकपणेच उतरायचे हा त्यांचा आजवरचा शिरस्ता. गरिबांना कोणी त्रास देत असेल तर त्यांच्या बाजूने उभे राहायचे म्हणजे राहायचे. मग समोरचा कितीही बलाढ्य असुदेत. तिथे हटायचे नाही आणि महत्वाचे म्हणजे आर्थिक तडजोडही करायची नाही. गरिबाला न्याय मिळेपर्यत झटतच राहायचे या त्यांच्या स्वभाव वैशिष्ट्यामुळे भलेभले त्यांना काळजीपूर्वकच हाताळतात. हे मी स्वतः अनुभवलेला एक किस्सा असा. निवडणूक काळात दादासाहेब आणि मी एका हॉटेलात ब्रेकफास्ट करत असताना काही पोलिटिकल लिडर तिथे आले. आम्हाला पाहिले आणि गेले. त्यानंतर काही वेळाने माझ्या मोबाईलवर एका ‘बड्या’ उमेदवाराचा फोन आला. आमच्यासोबत रहा वगैरेवगैरे असं बरंच बोलू लागले. तो फोन संपल्यानंतर दादासाहेब आणि माझ्यात चर्चा झाली. तेव्हा दादासाहेब यानी जी भूमिका घेतली ती मला फारच भावली. माझ्या मनात जे होते अगदी तेच ते बोलले. ते म्हणाले पाच दहा लाखांसाठी बाबासाहेब विकणारी आपली औलाद नाही. दादासाहेबांच्या या वाक्याने मला फारच आश्वासक वाटले. स्वतःच्या झोळ्या भरण्यासाठी चळवळ विकून राजकारण करणारे कुठे आणि चळवळीसाठी राबणारे कुठे याची एक जीवंत अनुभूती यावेळी मला येथे येऊन गेली.

खरतंर आजवरचा दादासाहेबांचा प्रवास हा कायम चर्चेचा राहिलेला आहे. प्रतापसिंह नगरातील कार्यकर्ते कधी पोलिसांनी उचलले तर त्यांना बाहेर काढणं, अन्याय, आत्याचार जेव्हा कुठे घडतो, पुतळा विटंबना कुठे होते, मागासवर्गीय समाजावर हल्ले होतात तेव्हा पिसाळलेला जाळ बनून रस्त्यावर उतरणं, प्रशासनाच्या जाचहाटातून गरीब माणसाला सोडवणं यामध्ये दादासाहेब ओव्हाळ यांचा हातखंडा आहे. त्यांनी आपल्या कार्यकर्तृत्वातून रिपब्लिकन चळवळीला एका अर्थाने चांगला वस्तुपाठच घालून दिला आहे असे म्हटले तर ते चुकीचे ठरणार नाही. कारण उपेक्षित, वंचित, फाटक्या, भटक्या अशा सर्वहारा समुहाची निर्भयता हा लोकशाहीचा खराखुरा गाभा आहे असे ठणकावून सांगत निर्भय राहणे आणि हृदयात परिवर्तनाच्या ज्वाला बाळगत कार्यकर्त्यांला संघर्षास सज्ज करणं हे अवघड कार्य ओव्हाळ प्रत्यक्षपणाने पाऊलापावलाला जगताहेत.

दिमतीला बक्कळ पैसा आणि फोर्च्यूनर, रेंजरेव्हर अशा गाड्या नसतानासुध्दा रात्री अपरात्री कोणत्याही कोप-यातून आवाज आला तर दादासाहेब ओव्हाळ तिथे हजर आहेतच. पक्ष, संघटना, गट या पलिकडे जाऊन माणसांच्या प्रसंगाला धावून जाण्याची जबरदस्त माणूसकी त्यांच्या ठायी आहे. कार्यकर्त्यांबद्दल असणारा हा अफाट जिव्हाळा आणि अचाट कळवळा फारच कमी नेतृत्वात असतो. ओव्हाळ यांच्या नेतृत्वाचे हे बलस्थान असले तरी ‘धाडस आणि प्रामाणिकपणा’ हे खरे त्यांचे सामर्थ्य आहे. आज इतर पक्षातील जेव्हा कार्यकर्ते स्वतःचे विविध प्रश्न घेऊन ओव्हाळ यांच्याकडे येतात तेव्हा तो सच्चा नेतृत्वाला सलाम असतो. एखाद्या राजकीय पक्षाचे नेतृत्व करणं हा भाग वेगळा. तसे तर अनेकजण करत असतात तथापि, सामान्य माणसांना वाटत राहने की हेच आपलं ‘नेतृत्व’ आणि ‘हाच आपला अस्सल नेता’ तेव्हा ख-या अर्थाने तो नेतृत्व गुणांचा विजय असतो !

महामानवांच्या विचारांचा आदर्श जपत स्वतःचं जगणं निष्ठापूर्वक चळवळीसाठी देणारं नेतृत्व कसं असावं याचं जीवंत आणि ज्वलंत उदाहरण म्हणजे दादासाहेब ओव्हाळ होय. आज ते झंझावाती वादळ होऊन घोंघावतंय. एकटाच आलो नाही युगाचीही साथ आहे सावध असा आता तुफानाची ही सूरूवात आहे कदाचित असंच त्यांना म्हणावयाचे असेल. अर्थात त्यांना काहीही म्हणावयाचे जरी असले तरी, त्यांच्यासारख्या अशा दमदार तुफानाला सर्वांनी साथ द्यायलाच हवी. कारण हे तुफान आहे म्हणून जातीयवादी, मनुवादी वटवागळं शांत आहेत. सामाजिक आणि राजकीय क्षेत्रातील दादासाहेब ओव्हाळ यांची ही वाटचाल यापुढे अधिक दमदार व्हावी. माणसाला माणुसकीचे भान देण्याबरोबरच सामाजिक न्यायाचे कार्य त्यांच्या हातून निरंतर घडत रहावे. यासाठी नवी प्रेरणा, नवी हिम्मत, नवा उत्साह, नवे धैर्य, नवे साहस, नवा बुलंद निर्धार, नवी जिद्द सतत त्यांच्या रक्ताच्या थेंबाथेंबात संचारत जावी अशा मनःपूर्वक भावनांसह त्याना जन्मदिनाच्या आभाळभर हार्दिक सदिच्छा