शिधापत्रिकाधारकांनी आधार व मोबाईल सिडींग 31 जुलैपर्यंत करावी- जिल्हा पुरवठा अधिकारी

    40

    ✒️अनिल साळवे(गंगाखेड प्रतिनिधी)

    गंगाखेड(दि.6जुलै):-ईकेवायसी पडताळणी व आधार सिडींग सुविधा वापरण्याची कार्यप्रणाली स्वस्त धान्य दुकानदारांना कळविली असून आवश्यक तेथे ही सुविधा वापरण्याबाबतचे प्रशिक्षण ही दुकानदारांना देण्यात आलेले आहे. दि.31 जुलै 2021 पर्यंतच्या शिधापत्रिकामधील लाभार्थ्यांचे आधार सिडींग न झाल्यास त्यांना अनुज्ञेय धान्य पुढील महिन्यापासून निलंबित होण्याची शक्यता आहे. अन्नधान्यापासून पात्र लाभार्थी वंचित राहू नये यासाठी दि.31 जुलैपुर्वी आधार क्रमांक आणि मोबाईल क्रमांक सिडींग 100 टक्के पुर्ण करावयाचे आहे. तरी जिल्ह्यातील अत्योंदय अन्न योजना, प्राधान्य कुटुंब योजना व एपीएल शेतकरी योजनेच्या लाभार्थ्यांनी त्यांचा आधार क्रमांक व मोबाईल क्रमांक स्वस्त धान्य दुकानदारांकडे जमा करुन आधार सिडींग व मोबाईल सिडींग 31 जुलै 2021 पर्यंत करावी. असे आवाहन जिल्हा पुरवठा अधिकारी श्रीमती मंजूषा मुथा यांनी केले आहे.

    ज्या शिधापत्रिकावर मागील सलग तीन महिन्यात धान्य उचलण्यात आले नाही अशा सर्व शिधापत्रिका तपासणीअंती तात्पुरती निलंबित करण्यात येईल किंवा धान्य अनुदान नसलेल्या योजनेत वर्ग करण्यात येणार आहे. तरी अन्नधान्य लाभासाठी अशा शिधापत्रिका धारकांच्या कुटुंबप्रमुखाच्या लेखी निवेदन तहसिलदार यांना प्राप्त झाल्यानंतरच कुटुंबातील सर्व सदस्यांचे आधार सिडींग करुन या शिधापत्रिका पात्र योजनेखाली समाविष्ट करण्यात येणार आहेत. सलग 3 महिने धान्य उचलण्यात न आलेल्या सर्व शिधापत्रिका 31 जुलैनंतर चौकशीअंती कायमस्वरुपी निलंबित करण्यात येईल. माहे जुलै 2021 चे धान्याचे वाटप करतेवेळी ई-पॉस उपकरणाद्वारे स्वस्त धान्य दुकानदारामार्फत कुटुंबातील सदस्यांचा आधार सिडींग झाले नाही, अशा सदस्यांचा आधार व मोबाईल क्रमांकाचे लाभार्थ्यांनी आपल्या नजीकच्या स्वस्त धान्य दुकानदारांच्या ठिकाणी जावून सिडींग पुर्ण करुन घ्यावी.

    राष्ट्रीय अन्नसुरक्षा योजना व एपीएल (केशरी) शेतकरी योजनेतील शिधापत्रिकेतील सर्व लाभार्थ्यांचे मोबाईल क्रमांक व आधार सिडींग 100 टक्के पुर्ण करण्याच्या केंद्र शासनाच्या सुचना आहेत. जिल्ह्यात राष्ट्रीय अन्नसुरक्षा योजना व एपीएल (केशरी) शेतकरी योजनेच्या सुमारे 14.31 लाख लाभार्थ्यांपैकी 88.56 टक्के लाभार्थ्यांचे आधार सिडींग झाले आहे. शासन निर्देशानूसार सार्वजनिक वितरण व्यवस्थेत अधिक पारदर्शकता येण्यासाठी जिल्ह्यात मोहीम राबवून लाभार्थ्यांचे आधार व मोबाईल सिडींग सुधारणे आवश्यक आहे. त्यासाठी स्वस्त धान्य दुकानातील ई-पॉस उपकरणामधील शपथपत्राद्वारे आधार सिडींग व मोबाईल सिडींग सुविधेचा अधिकतम वापर करुन आधार व मोबाईल क्रमांक सिडींगाचे प्रमाण वाढविण्यात येत आहे. दि.31 जुलै पुर्वी प्रत्येक शिधापत्रिकेमध्ये लाभार्थ्यांचे 100 टक्के आधार सिडींग आणि किमान एक वैध मोबाईल क्रमांक सिडींग करण्याच्या उद्देशाने जिल्ह्यात मोहीम राबविण्यात येत आहे. असेही कळविण्यात आले आहे.