अस्वस्थ वर्तमानातील आभासी शिक्षण

23

“शिक्षण हे मुठभर उच्चवर्णीयाची मिरासदारी होऊ नये.सामाजिक न्यायाची प्रस्थापणा करणारे ते सशक्त माध्यम व्हावे.समाजातल्या तळागाळातल्या लोकांच्या सुप्त शक्तीचा विकास होऊन त्यायोगे देशाच्या उभारणीत त्यांचा सहभाग लाभावा असं समानता ,गुणवंता व प्रासंगिकता या मूल्यांचा पाठपुरावा करणारे शिक्षण असावे .विशेषतः असे वर्ग ज्यांना हेतुपरस्पर शिक्षणापासून वंचित ठेवून सन्माननिय जीवन जगण्याच्या संधीपासून डावलण्यात आले त्यांच्याच प्रगतीसाठी अधिक प्रयत्न व्हावे.”
-डॉ.बाबासाहेब आंबेडकर

कोरोना विषाणूच्या महामारीने सारे क्षेत्र क्षतीग्रस्त झाले असून पृथ्वीवरचा बहुसंख्य माणूस भयभीत झाला आहे.त्यांना जगण्याची जी ऊर्जा मिळत होती ती ऊर्जाच काढून टाकण्यात आली आहे.बंदिस्त घरातील चार भिंतीत आपलं आयुष्य घालवतांना मनाची घालमेलं होत आहे.जगण्याचे सारे संदर्भच बदलून गेले आहेत.कामगार,शोषित,पिडीत, बेरोजगार,स्त्री,विद्यार्थी ,व अन्य समाजघटक यापासून प्रभावित झाले आहेत.गणराज्य भारतात हुकूमशाही तंत्राने लोकांचा आर्थिक कणा मोडला आहे.सरकारच्या तुटपुंजी सहाय्यतेने काही फायदा झाला असला तरी ही मदत त्याचे जीवन सावरू शकली नाही.या महामारीत शिक्षण क्षेत्राचे कंबरडेच मोडले आहे.देशातील जवळपास ७० टक्के विद्यार्थी शिक्षणाच्या प्रवाहातून बाहेर फेकले गेले आहेत.

ही अतिशय चिंताजनक गोष्ट आहे. अस्वस्थ वर्तमानीतील आभासी शिक्षणाने फक्त मुठभर विद्यार्थांचा फायदा झाला आहे.शहरी गरीब मुले व खेड्यातील मुलांचे शिक्षण काहीप्रमाणात झाले असले तरी ते पुरेशे नाही.नुकताच युनेस्कोचा अहवाल जाहिर झाला त्यात ते लिहितात की,एप्रिल २०२० मध्ये १८८ देशातील १५४ कोटी विद्यार्थी घरी बसले आहेत.भारतात १५ लाख शाळा बंद आहेत,तर उच्च शिक्षणाच्या ५० हजार शिक्षणसंस्था बंद आहेत व ३.७० कोटी विद्यार्थी आणि १५ लाख महाविद्यालयीन शिक्षक घरी बसले आहेत.३० कोटी विद्यार्थी रिकामेपणाने घरी बसले हा एक टाईमबाम्ब आहे.कोरोनाची समस्या ही केवळ आरोग्याची समस्या आहे असे मानले जात आहे.पण या संकटाला शैक्षणिक समस्येचीही बाजू आहे”हे शिक्षणाचे दाहक वास्तव अधोरेखित झाले आहे.शिक्षणात आलेल्या या व्यत्ययाने मुलांना शिक्षण हक्कापासून वंचित राहावे लागत आहे.

बहुसंख्य विद्यार्थी हे गरीब,कामगार ,वंचित,शोषित , आदिवासी व भटके विमुक्त या घटकातील आहेत.या मुलांचे भविष्य अंधकारमय साखळदंडानी जखडलेले आहे.देशातील व राज्यातील सरकारने या गोष्टींचा गांभीर्यानी विचार करावा . लवकरात लवकर शिक्षणाची दारे मोकळे करावे.

दोन वर्षाच्या खंडतेमुळे ग्रामीण व शहरी विद्यार्थांवर मानसशास्त्रीय बदल झालेले दिसून येत आहेत.घरची शिस्त व वातावरण हे शिक्षणासाठी पुरेशे नसते.शाळेचे वातावरण व शिस्त मुलांना नवे ऊर्जाबल देत असते.पण आभासी शिक्षणाने विद्यार्थांचे शारीरिक व मानसिक दृष्ट्या शोषणच होत आहे.शिक्षणाचे योग्य मूल्यमापन झाले नसल्याने हे विद्यार्थी कच्चे कामगार बनुन राहणार का हा प्रश्न पालकांना व शिक्षकांना पडला आहे.नवीन शैक्षणिक धोरण २०२० मधून जी शिक्षणाची व्यवस्था करण्यात आली आहे ही मुळातच फसवी व भेदाभेद करणारी आहे.पारंपारिक कौशल्याचे ऊदोऊदोगीरीकरण करून पुन्हा नवी गुलाम जनता करण्याचा हा एक डाव तर नाही ना हा प्रश्न अनेक विचारवंताना पडला आहे.

शिक्षण हे अविरत चालणारी प्रक्रिया असून ते समाजपरिवर्तनाचे सशक्त माध्यम आहे. राष्ट्रपिता महात्मा जोतीराव फुले ,क्रांतिज्योती सावित्रीमाई फुले,शाहू महाराज,सयाजीराव गायकवाड,कर्मवीर भाऊराव पाटील ,डॉ.बाबासाहेब आंबेडकर व संत गाडगेबाबा यांनी शिक्षणाला क्रांतीदर्शी गोष्ट मानून समाजोध्दार केला.विषमतामय साऱ्या ग्रंथाची पोलखोल केली.बहुजनात नवा आत्मविश्वास जागृत केला.
आज लोकशाही भारतात अवैज्ञानिक ज्ञानशाखेतील ज्याेतिषला शिक्षणाच्या प्रवाहात सामील करण्याचे सुतोवाचन इग्नू या विद्यापीठाने केले आहे.ज्योतिषाला शास्त्राचा आधार नसतांना राक्षसी मँडडेडने आपला अभ्यासक्रम भारतीय विद्यार्थांच्या मानगूटीवर बसविण्याचा मोठा प्रयत्न सुरू आहे.या प्रयत्नाला परास्थ करून संविधानात्मक विद्यार्थीकेंद्र शिक्षण पध्दतीसाठी जनआंदोलन करावे लागेल तेव्हाच वर्तमान शासकवर्गाचे पाय जमीनीवर येथिल.

ज्योतिष हे प्रमाणसिध्द शास्त्र नसून ब्राम्हणी भटाचा पोटापाण्याचा धंदा आहे.हे सोदाहरण उदाहरणावरून जोतीराव फुले यांनी तृतीय रत्न या ग्रंथात स्पष्ट केले आहे .ते लिहितात की,”प्रथम माळ्या कुणब्याचे मूल ते आपल्या आईच्या उदरात कोठे गर्भी वास करू लागल्याचा आरंभ होत आहे तोच ब्राम्हण जोशीची स्वारी येवून त्या गरीब आईस मोठमोठ्या भूलथापा देऊन तिजला द्रव्यहीन कशीकशी करितो यांविषयी मी येथे लिहीन.” (पृ क्र.५ म.फुले समग्र वाड्मय) हे जळजळीत वास्तव विदूषक पात्रातून समाजासमोर मांडले आहे.तरी आजचे ओबीसी व मागासवर्गीय लोक कोणताच धडा घेत नाही.ही आपली शोकांतिकाच मनावी लागेल.

आज देश व महाराष्ट्र अग्नीच्या आगडोंबावर उभा आहे.या आगीचे रूपांतर कधी विध्वसंक परिस्थितीत होईल हे सांगता येत नाही.ओबीसी ,मराठा , मागासवर्गीय,बेरोजगार ,छोटे कामगार ,लहान उद्याेगधंदे , छोटे व्यवसायी हे सारे बांधव कोरोना विषाणूच्या पादुर्भावाने उद्धवस्त झाले आहेत.देशातील अर्थव्यवस्था ऋणगर्भात गेली आहे.त्यात सरकारने जी भूमिका घेतली ती सर्व भारतीयांना त्रासदायक आहे.आसूरी बहुमताने जे काही चालले आहे ते देशाकरिता गंभीर आहे.आंबेडकरवादी क्रांतीजाणिवा शिवाय देशाला तरणोपाय नाही.ओबीसी व मराठा ,इतर समदुःखी बांधव यांनी सांस्कृतिक व धार्मिक गुलामगिरीतून स्वतःची व देशाची सुटका करावी नाहीतर येणारी पिढी तुम्हाला माफ करणार नाही.डॉ.बाबासाहेब आंबेडकर म्हणतात की,”ज्याच्या हातात सत्ता असते तो सत्तेबाहेरील लोकांची क्वचितच बाजू घेऊन त्यांना सत्तेचा वाटा देतो.म्हणून आता सामाजिक प्रश्न सोडविण्यामुळे ज्यांचे नुकसान होण्याची शक्यता आहे.त्याच्या हातात शासनसत्ता जर तुम्ही सहजगत्या जाऊ दिली तर सामाजिक प्रश्न सुटण्याची तुम्ही आशा करू शकत नाही.व आता तुम्ही शासन सत्तेवर आरूढ करण्यासाठी ज्यांना मदत कराल त्यांनाच गादीवरून खाली खेचण्यासाठी तुम्हास पुढे क्रांती करावी लागेल.”(खंड १८,भाग- १,पृ.क्र.२०१,) ही क्रांती करणे काळाची गरज आहे.आपले सारे हेवेदावे सोडून शिक्षणाच्या प्रवाहाला सुरू करण्यासाठी पेटून उठावे.

अस्वस्थ वर्तमानीतील आभासी शिक्षणाने अनेक समस्या निर्माण केल्या आहेत.खेड्यात इंटरनेटची कनेक्टिव्हिटी राहत नाही.अँड्राईड मोबाईल घेण्यासाठी हाती पैसा नाही.स्वतः पोट भरण्याचं आभाळ आहे.अशातच आभासी शिक्षण हे फक्त कागदोपत्री दाखविण्याचा अठ्ठाहास आहे.यातून जी असमतोलता निर्माण झाली आहे ती अत्यंत भयावह आहे.२०टक्के विद्यार्थांसाठी ८० टक्के विद्यार्थांचे नुकसान होत आहे.शासनाने लवकरात लवकर योग्य निर्णय घेऊन स्थानिक पातळीवर विचार करून.कोरोना महामारीच्या नियमांचे पालन करून शाळा सुरू कराव्या .येणारे भारतीय भविष्य उज्ज्वलमय होण्यासाठी अस्वस्थ वर्तमानीतील आभासी शिक्षण बंद करून शिक्षणाचे विहारे मोकळे करावे.विद्यार्थाला नव्या परिवर्तनवादी आकाशात विहार करू द्यावे हाच योग्य पथ आहे.तूर्ताश थांबतो.

✒️लेखक:-संदीप गायकवाड(नागपूर)मो:-९६३७३५७४००