दिव्यांगांसाठी आनंदाची बातमी-धनंजय मुंडे यांनी घेतला महत्त्वाचा निर्णय

24

✒️नवनाथ आडे(गेवराई प्रतिनिधी)

गेवराई(दि.9जुलै):-राज्यातील लसीकरणासाठी पात्र असलेल्या सर्व दिव्यांग व्यक्तींचे प्राधान्याने लसीकरण करण्यात यावे विशेष मोहीम राज्यभरात राबविण्याचे आदेश आज दिव्यांग कल्याण आयुक्तालयामार्फत जारी करण्यात आले. सामाजिक न्याय विभाग व सार्वजनिक आरोग्य विभाग मिळून ही मोहीम कार्यान्वित करणार असल्याची माहिती सामाजिक न्याय व विशेष सहाय्य मंत्री ना. धनंजय मुंडे यांनी दिली आहे. खा. सौ. सुप्रियाताई सुळे यांनी याबाबत पत्राद्वारे ना. मुंडेंना सूचना केली होती.

सामाजिक न्याय विभाग व आरोग्य विभागाने याबाबतचा शासन निर्णय जारी केला होता. त्यानंतर आरोग्यमंत्री ना. राजेश भैय्या टोपे यांनी देखील तातडीने सकारात्मक पाऊले उचलत आवश्यक निर्णय घेऊन आरोग्य विभागामार्फत परिपत्रक व मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत.ही लसीकरण मोहीम व्यापक रूपात संपूर्ण राज्यात राबवता यावी, याद्वारे प्रत्येक पात्र दिव्यांग व्यक्तीपर्यंत त्याची माहिती प्रसारित व्हावी तसेच विनाव्यत्यय व कोविड विषयक संसर्गाचा धोका टाळून ही मोहीम यशस्वीरित्या राबविण्यात यावी, याबाबतचा कृती आराखडा व मार्गदर्शक सूचना आज संबंधित दोनही विभागांकडून सर्व जिल्ह्यांना पाठविण्यात आला आहे. सदर मोहीम यशस्वी करण्यासाठी स्थानिक प्रशासन, समाज कल्याण विभाग, आरोग्य विभाग यांनी समन्वयन करावयाचे आहे.

असा असेल कृती कार्यक्रम

प्रत्त्येक महानगरपालिका/जिल्हा परिषद यांच्या माध्यमातून आठवड्यातील एक दिवस दिव्यांग व्यक्तींच्या लसीकरणासाठी राखीव ठरवण्यात येईल किंवा शक्य असेल तिथे स्वतंत्र लसीकरण केंद्र/मोबाईल व्हॅन उपलब्ध करून देण्यात येईल.

लसीकरण करण्याची तारीख व वार महानगर पालिका/जिल्हा परिषद, समाज कल्याण विभाग तसेच दिव्यांग व्यक्तींच्या कल्याणासाठी काम करणाऱ्या स्वयंसेवी संस्था यांच्यामार्फत व्यापक प्रसिद्धी देऊन त्याची माहिती दिव्यांग व्यक्तींपर्यंत पोचविण्यात यावी.

कर्णबधिर दिव्यांग व्यक्तींसाठी सांकेतिक भाषेत व्हीडिओ तयार करण्यात यावेत, तसेच अंध दिव्यांग व्यक्तींसाठी माहिती देणाऱ्या ऑडिओ क्लिप्स तयार करण्यात याव्यात. गावोगावी दिव्यांग व्यक्तींची संख्या निश्चित करण्यात यावी, यासाठी समाज कल्याण विभागाच्या शाळांमधील शिक्षक, आशाताई, अंगणवाडी सेविका यांची मदत घेण्यात यावी. दर्शनी भागात याबाबतचे पोस्टर्स/फ्लेक्स लावण्यात यावेत.

या मोहिमेला यशस्वी करण्यासाठी शालेय शिक्षण विभागाअंतर्गत समग्र शिक्षा अंतर्गत असलेले विशेष शिक्षक, सामाजिक न्याय विभागाअंतर्गत दिव्यांगांच्या विशेष शाळेतील विशेष शिक्षक आणि कर्मचारी (प्रत्येक केंद्रावर अगोदरच लसीकरण झालेले ३ शिक्षक प्रत्येक दिव्यांग प्रकारातील एक शिक्षक, रोटेशन पद्धतीने नियुक्त करणे), दिव्यांगांचे समेकित क्षेत्रीय केंद्र (सी.आर.सी.) तसेच दिव्यांगांचे विभागीय केंद्र (आर.सी.), दिव्यांग व्यक्तींच्या सक्षमीकरणासाठी कार्यरत राष्ट्रीय संस्था (महाराष्ट्रातील अलि यावर जंग नॅशनल इन्स्टीट्यूट ऑफ स्पीच अँड हियरिंग, मुंबई), दिव्यांग व्यक्तींच्या व्यवसाय तथा रोजगारासाठी कार्यरत राष्ट्रीय संस्था (व्ही.आर.सी.), जिल्हा दिव्यांग पुनर्वसन केंद्र, दिव्यांग व्यक्तींच्या कर्मशाळा, आरोग्य विभागाअंतर्गत जिल्हा जलद हस्तक्षेप केंद्र, (डी.ई.आय.सी.), आरोग्य विभागाअंतर्गत असलेल्या आशाताई, महिला व बालकल्याण अंतर्गत असलेल्या अंगनवाडी सेविका, पालक संघटना, दिव्यांग व्यक्तींच्या संघटना, पोलिस या यंत्रणा उपलब्ध करून देण्याचे नियोजन करण्यात आले आहे.

आरोग्य विभागाने काढले परिपत्रक..

दरम्यान सामाजिक न्याय विभागाच्या कृती आराखड्यास व मार्गदर्शक सुचनांना अनुसरून सार्वजनिक आरोग्य विभागाने दिव्यांग व्यक्तींचे प्राधान्याने लसीकरण करण्यासंबंधीचे परिपत्रक जारी केले असून, सदर लसीकरण मोहिमेच्या कृती आराखड्यानुसार दिव्यांग व्यक्तींचे प्राधान्याने लसीकरण करण्याबाबतचे आदेश जारी केले आहेत.

सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांच्या निर्देशानुसार काही दिवसांपूर्वीच दिव्यांग व्यक्तींच्या विशेष लसीकरण मोहिमेबाबतचा शासन निर्णय जारी करण्यात आला होता, त्यानुसार विभागाने अवघ्या काही दिवसातच कृती कार्यक्रम तयार केला असुन, दिव्यांग व्यक्तींना राज्यभरात आता प्राधान्याने लस मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. प्रत्येक जिल्हा प्रशासन, समाज कल्याण विभाग, आरोग्य विभाग तसेच अन्य सर्व संबंधित यंत्रणांनी मिळून या मिहिमेला यशस्वी करण्यासाठी योगदान द्यावे असे आवाहन ना. धनंजय मुंडे यांनी केले आहे.