माण बाजार समिती निवडणूक रासप स्वबळावर लढवणार

29

✒️सचिन सरतापे(प्रतिनिधी,म्हसवड)मोबा.9075686100

म्हसवड(दि.11जुलै):-माण पंचायत समितीचे सभापतिपद मिळाल्यानंतर हत्तीचे बळ संचारलेल्या राष्ट्रीय समाज पक्षाने माण तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीची निवडणूक स्वबळावर लढण्याचा निर्णय घेतला आहे. दहिवडी येथे राष्ट्रीय समाज पक्षाच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांची बैठक झाली. या बैठकीला राज्य कार्यकारिणी सदस्य बबनराव विरकर, रासप तालुकाध्यक्ष दादासाहेब दोरगे, अॅड. विलास चव्हाण, आप्पासाहेब पुकळे, आकाश विरकर, दादासाहेब माळवदे, शिवाजी बरकडे, चंद्रकांत दडस आदी उपस्थित होते.

या बैठकीला रासपचे कार्यकर्ते, बाजार समितीच्या ग्रामपंचायत, सोसायटी आणि व्यापारी गटातील मतदारांची उपस्थिती होती. बैठकीत बाजार समितीच्या निवडणुकीच्या अनुषंगाने सर्वांनी मते मांडावीत, असे आवाहन बबनराव विरकर यांनी केले. त्यानुसार रासपने बाजार समितीची निवडणूक स्वबळावर लढावावी, असा सूर सर्वांनी आळवला.

या सुरात सूर मिसळत बबनराव विरकर यांनी कार्यकर्त्यांचा भावनांचा आदर करता पक्षाच्या वरिष्ठांशी चर्चा करून बाजार समितीची निवडणूक स्वबळावर लढण्याचा निर्णय घेण्यात येईल, असा निर्णय जाहीर केला. दादासाहेब दोरगे यांनी इच्छुक उमेदवारांनी आपापली नावे पक्षाकडे द्यावीत, अशी सूचना केली.