मानवी संघर्ष मांडणारा कवितासंग्रह- प्रदिप पाटील

40
✒️कोल्हापूर(पुरोगामी संदेश नेटवर्क)

कोल्हापूर(दि.11जुलै):-अश्रू या कविता संग्रहातील कविता आयुष्याला अडचणीतही सकारात्मकपणे सामोरे जाण्याला मदत करतात. कारण मानवी संघर्ष प्रखरपणे या कवितांमधून वाचकाला पानोपानी वाचायला, अनुभवायला मिळतो. असे प्रतिपादन प्रसिद्ध कवी, लेखक प्रदिप पाटील यांनी केले. ते अश्रू या कविता संग्रहाच्या प्रकाशन समारंभावेळी आदित्य सभागृह येथे बोलत होते.

प्रसिद्ध कवी व लेखक चंद्रकांत सावंत यांचा अश्रू हा कविता संग्रह प्रयास प्रकाशनने प्रकाशित केला. याचा प्रकाशन सोहळा रविवार दि.11 जुलै रोजी उमा टाॅकिज येथील अदित्य सभागृहात तळमावले येथील प्रसिद्ध कवी व लेखक प्रदिप पाटील यांच्या हस्ते पार पडला. यावेळी बोलताना पाटील म्हणाले, आयुष्यात सुख- दुःखं येतच राहतात. याचा विचार न करता माणुस नेहमी नश्वर गोष्टींच्या मागे धावतो. स्वतःच्या स्वार्थासाठी माणसाने निसर्गाची वाताहत केली आहे. याचे परिणाम त्याला येत्या काळात भोगायला लागतील.

कोल्हापूर येथील सामाजिक कार्यकर्ते डाॅ. दयानंद ठाणेकर अध्यक्षस्थानावरुन बोलताना म्हणाले, समाज बदलात कवी, लेखक यांचा महत्वाचा वाटा असतो. त्यामुळे आज लिहणाऱ्या लोकांनी साहित्य निर्माण करताना ते जागृती कशी करेल याचा विचार करावा. यावेळी बोलताना कायदेतज्ञ ऍड. अकबर मकानदार म्हणाले, निसर्ग आणि माणूस केंद्रस्थानी ठेवून कवीने डोळ्यात अंजन घालणाऱ्या कविता या संग्रहात समाविष्ट केल्या आहेत. प्रा.शोभा चाळके म्हणाल्या, अश्रू हे डोळ्यात येतात तेव्हा त्याच्यामागच्या भाव भावना वेगवेगळ्या असतात. त्या भावना कवीने चपखलपणे शब्दबद्ध केल्या आहेत. यावेळी कवी चंद्रकांत सावंत यांनी कवितासंग्रहाची पार्श्वभूमी स्पष्ट केली.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक व आभार प्रयास प्रकाशनचे प्रकाशक ऍड. अधिक चाळके यांनी मानले. यावेळी मंदार पाटील, भार्गव सावंत, विजय कोरे, रेश्मा गायकवाड यांच्यासह अन्य मान्यवर उपस्थित होते.