बालकांच्या सर्वांगीण विकासा साठी मातृभाषेतून प्राथमिक शिक्षण काळाची गरज…!

    40

    मूल जेव्हा बोलायला शिकते किंवा भाषा शिकते तेव्हा ते त्याच्या मातृभाषेचे मोठ्या प्रमाणात श्रवण करत असते. आणि भाषा शिक्षणातील श्रवण ही सर्वात महत्त्वाची आणि पहिली पायरी आहे. मातृभाषा ही मुलासाठी आई सारखी असते. जसे आई बालकाच्या सर्व गरजा ओळखते. व गरजेनुसार त्याला हवं ते पुरवते. तसेच मातृभाषेचे आहे. मातृभाषा ऐकताना मूल कळत नकळत आपल्या सामाजिक रूढी, परंपरा, रितीरिवाज ही शिकत असते.

    पण आज शिक्षणासंबंधी पालकांमध्ये निर्माण झालेली संभ्रमावस्था ही विचार करण्यासारखी आहे. आज अनेक पालकांना असा समज झालेला आहे की, इंग्रजी माध्यमाच्या शाळांमध्ये आपले मूल शिकले म्हणजे त्याचे भविष्य उज्ज्वल होईल. हा भ्रम आता शहरातून गाव खेड्यावर, तांडा, वस्ती पर्यंत पोहोचलेला आहे. शहरातील मध्यमवर्गीयांपासून ते खेड्यापाड्यातील मजूर वर्गापर्यंत इंग्रजी माध्यमांच्या शाळांचे आकर्षण वाढत चालले आहे. इंग्रजी माध्यमांच्या इतर सोयी सुविधांना बळी पडून पालक आपल्या बालकांचे बालपणच नाही तर भविष्य सुद्धा धोक्यात घालताना दिसत आहेत.

    मुळात मूल शिकत असताना ज्या माध्यमातून शिकते ती भाषा त्याला कितपत समजते याचा विचार कोणी केला आहे का ?केवळ नीटनेटकेपणा, रंगीबेरंगी गणवेश, जाण्या-येण्यासाठी असलेली स्कूल बस या गोष्टींची पूर्तता केली म्हणजे आपले मूल शकतेच असे नाही. केवळ पोपटपंची करणे म्हणजे शिक्षण आहे का?

    ” तुकाराम महाराज आपल्या अभंगात म्हणतात, “अर्थेविण पाठांतर कासया करावे?| व्यर्थ ची मरावे घोकूनिया ||” म्हणजे अर्थ समजून न घेता पाठांतर कशाला करावं? शब्द नुसते उगाचच घोकून व्यर्थ कशाला मरावं ? केवळ पोपटासारखे बोलणे म्हणजे शिक्षण आहे का? मुलांना एखाद्या अमूर्त संकल्पनेचे आकलन मातृभाषेतून लवकर होत असते.

    मूल आई, बाबा, कुटूंब, शेजारी,परिसर याठिकाणी सतत मातृभाषेचे श्रवण करते. त्यामुळे ते वयाच्या दुसऱ्या तिसऱ्या वर्षीच बोलायला लागते. त्याची जिज्ञासा वाढीस लागून ते विविध प्रश्न विचारायला सुरुवात करते. यातून त्याच्या ज्ञानात भर पडत असते. पण पालक खोट्या प्रतिष्ठेसाठी म्हणा किंवा आमचे मुलांच्या शिक्षणाकडे खूप लक्ष आहे हे दाखवण्यासाठी म्हणा आपल्या पाल्याला इंग्रजी माध्यमाच्या शाळेत दाखल करतात त्यामुळे मुले गोंधळतात. एका वेगळ्याच तणावाखाली वावरत असतात. त्यांना पडणारे प्रश्न ते इंग्रजीतून विचारू शकत नाहीत. परिणामी त्यांची जिज्ञासा कमी होते. मुलांना वयाच्या नवव्या दहाव्या वर्षापर्यंत अनेक प्रश्न पडत असतात पण ते शाळेतील शिक्षकांना इंग्रजीतून विचारू शकत नाहीत आणि जर शिक्षकांनी एखाद्या प्रश्नाचे उत्तर सांगितले तर ते समजून घेऊ शकत नाहीत.

    काही वर्षांच्या इंग्रजी माध्यमातील शिक्षणानंतर पालकांच्या असे लक्षात येते की आपला पाल्य इंग्रजी बऱ्यापैकी वाचू, लिहू शकतो पण मातृभाषा म्हणजेच मराठीची मुळाक्षरे हे वाचू शकत नाही. तेव्हा पालकांची झोप उडते. आणि मग आठवतात मराठी माध्यमांच्या शाळा.

    माझ्या आज पर्यंतच्या अनुभवानुसार खेड्यातील बरेच पालक इंग्रजी माध्यमातून विद्यार्थी काढून जिल्हा परिषदेच्या मराठी शाळेत टाकतात. त्यांना विचारले तर असे लक्षात येते की,मराठीचे बच्चे मराठीतच कच्चे. तसेच इंग्रजी शाळेत चार ते पाच वर्ष शिक्षण घेऊनही समाधानकारक प्रगती नाही आणि आर्थिक नुकसानही मोठे झालेले असते.

    जगातील अनेक मानसोपचार तज्ञ व शिक्षण तज्ञांच्या प्रदीर्घ संशोधनानंतर हे निष्कर्ष निघालेले आहेत की बालकांचा सर्वांगीण विकास होण्यासाठी त्याचे प्राथमिक शिक्षण हे मातृभाषेतूनच व्हायला हवे.

    संपूर्ण शिक्षण इंग्रजी माध्यमातून देण्यापेक्षा इंग्रजी विषयाचे चांगले आकलन झाले तरी पुरेशे असते. मूल जेव्हा त्याला व्यक्त व्हायचे असते तेव्हा ते मातृभाषेतून उत्तम प्रकारे व्यक्त होऊ शकते. पण इंग्रजी माध्यमातून क्वचितच त्याला व्यक्त होता येते. पालकांनी इंग्रजी माध्यमातून मुलांना शिकविण्यापेक्षा इंग्रजी या एका विषयाची चांगली तयारी होईल याकडे लक्ष देण्याची गरज आहे.

    मुले जेव्हा इंग्रजी भाषेच्या शाळेत असतात तेव्हा त्यांच्या घरातील वातावरण इंग्रजी साठी पूरक आहे का? याचाही प्रकर्षाने विचार व्हायला हवा. शाळेची भाषा आणि समाजाची प्रकर्षाने व्यवहाराची भाषा भिन्न असल्याने इंग्रजी शाळेतील बालकांना ताण-तणाव, चिडचिडेपणा, एकलकोंडेपणा, न्यून्यगंड या समस्यांना सामोरे जावे लागते. परिणामी त्याच्या अनेक अमूर्त संकल्पना अस्पष्टच राहतात. मराठी माध्यमात मूल स्वतःहून जरी प्रकट होऊ शकले नाही तरी त्याला बर्‍याच गोष्टींचे आकलन सहजरित्या होऊ शकते. त्याच्या सुप्तगुणांना वाव मिळण्यास मदत होते.

    म्हणूनच पालकांना नम्र विनंती आपल्या पाल्याच्या उज्वल भविष्यासाठी त्याचे प्राथमिक शिक्षण हे मातृभाषेतूनच पूर्ण करा. जेणेकरून तो भावी जीवनात एक सुज्ञ, जागरूक नागरिक बनेल.

    म्हणूनच म्हणतो, “मातृभाषेतून शिक्षण, प्रगतीचे लक्षण.”

    ✒️लेखक:-जगदिश सुभाषाराव जाधव(प्र.मुख्याध्यापक
    जि. प.उच्च प्राथमिक शाळा जगापूर, ता.पुसद जि. यवतमाळ)