भारतीय कॅम्युनिस्ट पक्ष व किसान सभा चांदवड तालुका यांचे उपविभागीय अधिकारी यांना निवेदनद्वारे पिक विम्याचा लाभ देण्याची मागणी

67

✒️नाशिक,जिल्हा प्रतिनिधी(शांताराम दुनबळे)

नाशिक(दि.24जुलै):-प्रधानमंत्री पिकविमा योजनेला अनुसरुन सन २०२०-२१ या सालातील चांदवड तालुक्यातील ५३३१ शेतकऱ्यांना त्वरीत पिकविम्याचा लाभ मिळवून देणेबाबत आज चंद्रशेखर देशमुख उपविभागीय अधिकारी चांदवड याना भारतीय कम्युनिस्ट पक्ष व किसान सभेच्या माध्यमातून निवेदनाद्वारे मागणी करण्यात आली . केंद्र सरकारने अतिवृष्टी , अवर्षण , दुष्काळ , कीड रोग इ . कारणांमुळे शेतकऱ्यांच्या पिकांचे नुकसान झाले तर नुकसानभरपाई मिळावी म्हणून प्रधानमंत्री पिक विमा योजना सुरु केली आहे . या योजनेत केंद्र सरकार ४० % , राज्य सरकार ४० % व शेतकरी २० % अशी विम्याची रक्कम संबंधीत कंपनीला देत असतात .

या योजनेला अनुसरुन सन २०२०-२१ या वर्षाकरीता शासनाने नेमून दिलेल्या भारती एक्सा जनरल इन्शुरन्स या कंपनीकडे चांदवड तालुक्यातील १३७४९ शेतकऱ्यांनी बाजरी , मका , ज्वारी , भुईमूग , सोयाबीन , उडीद , मूग , कांदा या पिकांचा विमा खरीप हंगामात संबंधीत कंपनीकडे भरला होता .
साधारणत: ७६६८ हेक्टर क्षेत्राचे संबंधाने हा विमा शेतकऱ्यांनी गेल्या वर्षी कोरोनाची भीषणता असताना आर्थिक परिस्थिती नसतांना देखील भरला होता . असे असतांना गेल्या वर्षी अतिवृष्टी व लष्करी अळीमुळे विमा भरलेल्या पिकांचे ८० ते ९० % नुकसान झाले . शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास हिरावला गेला . अशा परिस्थितीत खरीप पिकांचे पूर्णत: नुकसान झाले होते . शासनाने शेतकऱ्यांच्या नुकसानाची दखल घेत महसूली अधिकाऱ्यांमार्फत पंचनामे करुन तसे अनुदानही थोड्याफार प्रमाणात दिले होते .

असे असतांना शेतकऱ्यांनी भारती एक्सा जनरल इन्शूरंन्स कंपनीकडे विमा भरलेल्या पिकांचे नुकसान झाल्यामुळे तक्रारी केल्या होत्या . त्याचबरोबर कृषी खात्याकडे देखील विमा भरपाई मिळण्यासाठी तक्रारीकेल्या होत्या . तक्रारी केल्यानंतर केवळ ८४१८ शेतकऱ्यांना कंपनीने विम्याची नुकसानभरपाई दिली . व उर्वरीत ५३३१ शेतकऱ्यांना पिक विमा कंपनीने संबंधीत पिकाचे नुकसान होऊनही विम्याला अनुसरुन संबंधीत पिकाची नुकसानभरपाई देणे नाकारले . वास्तविक तालुक्यातील प्रत्येक गावातील विमाधारक शेतकऱ्याचे नुकसान झालेले होते . संबंधीत कंपनीने फक्त हेतुपुरस्करपणे ठराविक शेतकऱ्यांनाच प्रत्येक गावात नुकसानभरपाई दिली . वास्तविक एकाच बांधालगतच्या एका शेतकऱ्याला नुकसानभरपाई मिळते व दुसरा लगतचा शेतमालक विमा भरुनही त्याला नुकसानभरपाई कंपनीने नाकारली हे कंपनीचे वागणे दुटप्पीपणाचे व ते विमा भरलेल्या शेतकऱ्यांव अन्यायकारक आहे .

मुळात शेतकऱ्यांना शेतमालाची अनिश्चीत उत्पन्नाची नुकसानभरपाई सामुहिक स्वरुपात मिळावी या उद्देशाने ही योजना सुरु केलेली आहे . असे असतांना संबंधीत कंपनीने लोकलाइव , वैयक्तीक पूर्व कल्पना , ७२ तासात तक्रारी , प्राणीहल्ला लागू नाही इ . कारणे दाखवत अटी व शर्ती व नियमांचे चुकीचे निकष लावून ५३३१ शेतकऱ्यांना विमा देण्याचे नाकारले . वास्तविक पाहता शेतकऱ्यांनी विमा कंपनीच्या नंबरवर तात्काळ फोनही केले , कृषी अधिकाऱ्यांनाही कळविलेले होते .

मुळात खेड्यांमध्ये वीज व इंटरनेटचा प्रॉब्लेम असताना व कोरोनाची परिस्थिती असतांना तालुक्यातील संबंधीत शेतकऱ्यांनी तक्रार केल्यानंतरही विमा कंपनीचा प्रतिनिधी मुळात वेळेत आलाच नाही . वेळेनंतर जो कोणी आला त्याने ठराविक लोकांचे सातबारा उतारे व पावत्या जमा केल्या व इतर शेतकऱ्यांना विमा मिळू नये म्हणून इतर शेतकऱ्यांकडे जाण्याची देखील तसदी संबंधीत प्रतिनिधीने घेतली नाही . वास्तविक हे सर्व रेकॉर्ड प्रत्येक शेतकऱ्याचे संबंधीत कंपनीकडे ऑनलाइन होतेच त्याबरोबर कृषी विभागाकडे देखील होते . पण हेतुपुरस्करपणे संबंधीत कंपनीने जास्त शेतकऱ्यांना लाभ मिळू नये , म्हणून शेतकऱ्यांची एकप्रकारे फसवणूक केली आहे व संबंधीत कंपनीने नियमांची पायमल्ली केलेली आहे . किसान सभेने कृषी अधिकारी व विमा कंपनीकडे वेळोवेळी संबंधीत उर्वरीत लोकांना तात्काळ विम्याचा लाभ द्यावा म्हणून चौकशी केली होती मात्र उडवाउडवीची उत्तरे देण्यात आली .
या सर्वांच्या माध्यमातून यांनी आपल्या निवेदनाद्वारे असे सांगतिले. महसूल विभागाने नुकसानीनंतर केलेल्या पाहणीला अनुसरुन व कंपनीने विमा देण्याच्या संबंधाने चुकीचे निकष लावले . विमा कंपनीने त्यांना दिलेल्या मार्गदर्शक तत्व सूचना , आदेश , संबंधीत शासन निर्णय इ.चे उल्लंघन केलेले आहे .

म्हणून संबंधीत विमा कंपनीची महाराष्ट्र शासनानेसखोल चौकशी करुन त्यांच्या रेकॉर्डची पाहणी करुन कंपनीने नाकारलेल्या कारणांची कारणमिमांसा याची पडताळणी करुन चांदवड तालुक्यातील उर्वरीत शेतकऱ्यांना पिकविम्याचा लाभ द्यावा व संबंधीत शेतकऱ्यांना न्याय द्यावा , अन्यथा भारतीय कम्युनिस्ट तीव्र आंदोलन छेडेल असे निवेदनात म्हटले आहे .
यावेळी अॅड . दत्तात्रय गांगुर्डे(जिल्हा सेक्रेटरी ,भारतीय कम्युनिस्ट पक्ष,भास्करराव शिंदे(जिल्हाध्यक्ष,किसान सभा),सुकदेव केदारे(जिल्हा उपाध्यक्ष,किसान सभा), रंगनाथ जिरे,अण्णा जिरे,नामा मोरे आदी नागरिक उपस्थित होते.