गोदावरी निर्मळ आणि स्वच्छ राखणे ही नाशिककरांची नैतिक जबाबदारी- मंत्री छगन भुजबळ

    47
    Advertisements

    ?नद्यांच्या पुनर्जीवनासाठी सामूहिक आंदोलने उभारण्याची गरज

    ✒️नाशिक,जिल्हा प्रतिनिधी(शांताराम दुनबळे)

    नाशिक(दि.29जुलै):- शहरात गोदावरी नदी प्रदूषित झाल्याने नाशिकच्या जनतेची मान शरमेने खाली जाते. त्यामुळे गोदा साफ करण्याची सामूहिक जबाबदारी ही नाशिककरांची असल्याचे मत जिल्ह्याचे पालकमंत्री आणि राज्याचे अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांनी व्यक्त केले आहे. आज नमामि गोदा फाऊंडेशनच्या वतीने आयोजित नदी राष्ट्रगीताचे प्रकाशन त्यांच्या उपस्थितीत पार पडला यावेळी ते बोलत होते.यावेळी बोलताना मंत्री छगन भुजबळ म्हणाले की गोदावरी, दक्षिण गंगा ही सहा राज्यांची जीवनदायिनी आहे ती अविरल,निर्मल व स्वतंत्र राहावी यासाठी गेल्या १२ वर्षांपासून नाशिकच्या नमामि गोदा फाऊंडेशनच्या वतीने अविरत प्रयत्न केले जात आहे.

    भारताचे जलपुरुष म्हणून ओळख असलेले डॉ. राजेंद्र सिंह यांनी तर गोदावरी काशी स्वच्छ होऊ शकते याच उत्तम संदेश दिला आहे. त्याचबरोबर नाशिकचे नमामि गोदा फाऊंडेशनचे अध्यक्ष राजेश पंडित, उपाध्यक्ष अभिनेते चिन्मय उदगीरकर आणि त्यांचे सहकारी हे देखील सातत्याने यासाठी प्रयत्न करत आहेत.
    दुरदृष्य प्रणालीद्वारे झालेल्या या कार्यक्रमात राज्याचे मंत्री छगन भुजबळ यांच्यासह जलपुरुष डॉ. राजेंद्र सिंह, गायक शंकर महादेवन नाशिकचे महापौर सतीश कुलकर्णी, नाशिकचे जिल्हाधिकारी सूरज मांढरे, मुंबईचे कायदा व सुव्यवस्था सहआयुक्त विश्वास नांगरे पाटील, नाशिकच्या मुख्य कार्यकारी अधिकारी लीना बनसोड,नियंत्रक वैधमापनशास्र रवींद्र सिंघल, नमामि गोदा फाऊंडेशनचे अध्यक्ष राजेश पंडित उपाध्यक्ष अभिनेते चिन्मय उदगीरकर आणि तेलंगणा आणि आंध्रप्रदेश या ठिकाणाहून देखील काही मान्यवर उपस्थित होते.

    यावेळी श्री भुजबळ म्हणाले भारतीय लोक नदीला माता मानतात. गोदावरी ही भारतातील महत्वाची नदी आहे. आणि ज्या नदीला आपण जीवनदायिनी किंवा माता मानतो तिला स्वच्छ ठेवण्याची जबाबदारी आपली आहे. मध्यंतरी श्री श्री रवीशंकर हे नाशिकला आले होते. आणि गोदावरीची परिस्थिती पाहून त्यांनी आपली नाराजी व्यक्त केली होती. नाशिककरांसाठी ही बाब अतिशय शरमेची आहे. ज्या गोदावरी नदीवर इंग्रजांनी गंगापूर हे धरण बांधले ज्या नदीवर जायकवाडी धरण आहे. आणि ज्या नदीवर महाराष्ट्रातील अनेक महत्वाचे प्रकल्प आहेत अश्या नदीचे संवर्धन हे लोकचळवळीतुन झाले पाहिजे.

    महाराष्ट्रालाच नाही तर सबंध भारताला आंदोलनाचा इतिहास आहे.आपण विविध मुद्यांवर आंदोलन करत असतो त्यामुळे आता भारतातील सर्व नद्या स्वछ करण्यासाठी देखील सामूहिक आंदोलन उभारण्याची गरज आहे. डॉ. राजेंद्र सिंह यांच्या कार्य खूप मोठं आहे त्यामुळे त्यांच्यासारखे अनेक कार्यकर्ते जर तयार झाले तर ग्लोबल वॉर्मिंग सारखी मोठी समस्या तयार होणार नसल्याचे मत मंत्री छगन भुजबळ यांनी व्यक्त केले. नमामि गोदा फाऊंडेशनच्या कार्याचे कौतुक केले.