एक महान साहित्यिक – अण्णा भाऊ साठे

31

अण्णा भाऊ साठे यांचे शालेय शिक्षण झाले नसतानाही त्यांनी प्रयत्नपूर्वक अक्षरज्ञान मिळविले.ज्यामुळे ते आपल्या प्रतिभासंपन्न लेखनशैलीला न्याय देऊ शकले.कथा,कादंबरी,लोकनाट्य,नाटक,पटकथा,लावणी,पोवाडे,प्रवास वर्णन अशा सर्व साहित्य प्रकारांमध्ये त्यांनी लेखन केलेले आहे.अण्णा भाऊ साठे हे कुण्या व्यक्तीचं नाव नाही,तर ते साहित्यातलं एक विद्यापीठ आहे.विद्यापीठ जसं सर्व शाखांचं असतं तसंच वाङ्‌मयातल्या सर्वच प्रकारांत आपलं नाव कोरून गेलेला कर्तृत्वसंपन्न असा हा एक कोहिनूर हिरा आहे.अण्णा भाऊ म्हणजे शाहीर,त्याच्यापुढे जाऊन लोकशाहीर,अण्णा भाऊ म्हणजे साहित्यिक,साहित्यरत्न अशी अण्णा भाऊंची ओळख रुजली आहे.वयाची पुरती पन्नास वर्षंही न जगलेले अण्णा भाऊ,शाळेचं फक्त तोंड पाहिलेले अण्णा भाऊ,केवळ दीड दिवस शाळा शिकलेला माणूस,पण त्यांच्या साहित्यावर पी.एच.डी.होणं,त्यांच्या नावे विद्यापीठांतर्गत असणाऱ्या अध्यासनप्रमुख पदासाठी पदव्युत्तर किंवा पी.एच.डी धारक ही पात्रता असणं हे कितवं आश्‍चर्य म्हणावं होय,हे आश्‍चर्यच आहे!

त्यांच्या साहित्यवाचनातून अनेक लेखकांना लेखनाची योग्य दिशा मिळाल्याचं आजचे अनेक मान्यवर लेखक मान्य करतात.
शाहीर आत्माराम पाटील हे शाहीर चा अर्थ सांगताना म्हणतात,शाहीर हा समाजाशी आणि राष्ट्रीय जीवनाशी समरस होऊन लोकभावनांना समजून-उमजून घेत असतो.लोकांच्या शब्दांतून आणि भाषेतून तो लोकजीवनाचा इतिहास सांगत असतो.जोश आणि त्वेषपूर्ण शब्दांच्या गुंफणीतून हा लोककवी क्रांती घडवून आणण्याचं सामर्थ्य बाळगतो.हे भाष्य अण्णा भाऊंच्या संदर्भात तंतोतंत जुळतं.

तुकाराम भाऊराव ऊर्फ शिवशाहीर अण्णा भाऊ साठे ह्यांचा जन्म १ ऑगष्ट १९२० रोजी सांगली जिल्ह्यातील वाळवा तालुक्यातील वाटेगाव या लहानश्या गावात झाला.अण्णा भाऊ साठे हे महाराष्ट्राला एक शाहीर म्हणून परिचित असले तरी कथा आणि कादंबरी हे साहित्यप्रकारही त्यांनी ताकदीने हाताळले.तांत्रिक दृष्ट्या पूर्ण निरक्षर, अशिक्षित व्यक्ती,अश्या अण्णाभाऊंनी मराठी साहित्यातील लोकवाङमय, कथा,नाट्य,लोकनात्य,कादंबऱ्या,चित्रपट,पोवाडे,लावण्या,वग,गवळण प्रवास वर्णन असे सर्वच प्रकार सशक्त व समृद्ध केले.तमाशा या कलेला लोकनाट्याची प्रतिष्ठा मिळवून देण्याचं श्रेय अण्णा भाऊंना दिले जाते.पोवाडे, लावण्या,गीतं,पदं या काव्यप्रकारांचा त्यांनी सामान्य कष्टकरी जनतेत विचारांच्या प्रचारासाठी वापर केला. स्वातंत्र्यपूर्व आणि स्वातंत्र्यानंतरच्या काळात राजकीय प्रश्नांविषयी महाराष्ट्रात त्यांनी मोठी जागृती केली. त्यात संयुक्त महाराष्ट्र चळवळ,गोवा मुक्ती संग्राम या चळवळींमध्ये त्यांनी शाहिरीतून दिलेले योगदान महत्त्वाचे आहे.

१९४४ ला त्यांनी `लाल बावटा` पथक स्थापन केले आणि बघता बघता ते शाहीर झाले.`माझी मैना गावाकडं राहिली,माझ्या जीवाची होतीया काह्यली ` ही त्यांची गाजलेली लावणी होती.अण्णा भाऊंनी छत्रपती शिवरायांचे चरित्र रशिया पर्यंत पोवाड्यातून सांगितले पुढे त्याचे रशियन भाषेमध्ये भाषांतर झाले आणि राष्ट्रध्यक्षांकडून त्यांचा सन्मान देखील झाला.१६ ऑगष्ट १९४७ साली “ ये आझादी जुठी हे देश कि जनता भुकी हे ” असा नारा शिवाजी पार्क वर दिला त्या दिवशी पावसाने रौद्र रूप धारण केले होते.मात्र,तरीही अण्णा भाऊ मागे हटले नाहीत.अण्णा भाऊंनी आपल्या लेखनकाळातील अल्पायुष्यात २१ कथासंग्रह आणि ३० पेक्षा अधिक कादंबऱ्याही लिहिल्या. त्यापैकी सात कादंबऱ्यांवर मराठी चित्रपटही नामवंत दिग्दर्शकांनी काढले.‘ फकिरा ’ या कादंबरीला १९६१ साली राज्य शासनाच्या उत्कृष्ट कादंबरीचा पुरस्कारही मिळाला आणि तत्कालीन ज्येष्ठ साहित्यिक वि.स.खांडेकर यांनीही कादंबरीचे कौतुक केले.डॉ.बाबासाहेब आंबेडकरांच्या झुंजार लेखणीला अर्पण केलेल्या ‘ फकिरा ’ मध्ये भीषण दुष्काळाच्या काळात ब्रिटिशांचे खजिने,धान्य लुटून गरिबांना,दलितांना वाटप करणाऱ्या फकिरा या मांग समाजातील लढाऊ तरुणाचे चित्रण आहे.‘ वैजयंता ’ कादंबरीत प्रथमच तमाशात काम करणाऱ्या कलावंत स्त्रियांच्या शोषणाचे चित्रण केले आहे.

” माकडीचा माळ ” ही भटक्या-विमुक्त समाजाच्या जीवनपद्धतीचे अतिशय सूक्ष्म चित्रण करणारी भारतीय साहित्यातील पहिली कादंबरी आहे. कोळसेवाला,घरगडी,खाण कामगार, डोअर किपर,हमाल,रंग कामगार, मजूर,तमाशातला सोंगाड्या अशा विविध भूमिका अण्णांनी वठविल्या. अण्णांनी आपले उभे आयुष्य चिरागनगर झोपडपट्टीत काढले.याच झोपडपट्टीत अण्णाभाऊंच्या एकापेक्षा एक श्रेष्ठ कलाकृतींची निर्मिती झालेली आहे.काव्य या वाङ्‌मयप्रकारात अण्णा भाऊंनी लावणी,पोवाडा,गण,कटाव, निसर्गगीतं,स्फूर्तिगीतं,शेतकरीगीतं, गौरवगीतं,प्रहार घावगीतं,व्यथा-शल्यगीतं,भावगीतं,व्यक्तिगत गीतं,गौळण,कामगारगीतं असे असंख्य प्रकार हाताळले.त्यातून त्यांनी हिंसाचार,अत्याचार यांचा धिक्कार करत पोवाडे रचले.त्यात बंगालची हाक,पंजाब-दिल्ली दंगा,नानकिंग नगरापुढे,स्टालिनग्राडचा पोवाडा, बर्लिनचा पोवाडा,तेलंगणाचा संग्राम, महाराष्ट्राची परंपरा,मुंबईचा गिरणी कामगार’,काळ्या बाजाराचा पोवाडा, अंमळनेरचे हुतात्मे अशा राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय पोवाड्यांतून वास्तव चित्रण मांडलं.

कामगारांबद्दल ते लिहितात,इतिहास कामगारांचा। वळून जरा वाचा। नसे तो कच्चा। अन्यायाची चीड ज्याला भारी। सदा तो देऊनी ललकारी उठवी देशात जनता सारी।तर मुंबईच्या कामगारांबद्दल ते लिहितात,बा कामगारा तुज ठायी अपार शक्ती। ही नांदे मुंबई तव तळहातावरली। ते हात पोलादी सर्व सुखे निर्मिती परि तुला जगण्याची भ्रांती। बेकारी येत तुजवरती। म्हणे अण्णा भाऊ साठे शाहीर। उठूनी सत्वर उज्ज्वल राख आपली कीर्ती। काळा बाजार या पोवाड्यात ते म्हणतात,काळ्या बाजाराचा रोग आला। मागं लागला गोरगरिबाला!सुखाचा घास मिळंना झाला।हे सत्य चित्रण मांडून गोरगरिबाची नस त्यांनी पकडली आहे.महाराष्ट्राची परंपरा यातून महाराष्ट्राचं केलेलं वर्णन,अगदी महाराष्ट्राचा इतिहास,भूगोल असं सारंच त्यांनी मांडलं आहे.महाराष्ट्र मायभू आमुची। मराठी भाषिकांची। संत-महंतांची!तमाशा या कलाप्रकारात स्त्री नाचवणं,गणात गणपतीचं गुणगान असणं या दोन्ही प्रकारांना छेद देऊन गणात महापुरुष,राष्ट्र,कामगार व सामान्य माणूस यांना ते नमन करतात.

उदाहरणार्थ,प्रारंभी मी आजला। कर त्याचा येथे पूजला। जो व्यापूनी संसाराला। हलवी या भूगोला।।अशा या क्रांतिकारी शाहिरानं लोकनाट्यात स्त्री आणली,पण ती कामगाराची शेतकऱ्याची बायको म्हणून.अण्णा भाऊंची लोकनाट्ये ही समाजाची कथा-व्यथा मांडणारी होती.सांगली जिल्ह्यातील छोट्याशा वाटेगावपासून मुंबई मार्गे रशियापर्यंत झालेला त्यांचा प्रवास संघर्षशील तर होताच मात्र,यामध्ये हजारो वर्षांपासून अत्याचार आणि जुलूम करणाऱ्या तत्कालीन व्यवस्थेला प्रतिउत्तर देणाराही होता.मिळेल ते काम करीत, विज्ञानवादाची कास धरीत,वास्तव जीवनातील अनुभवांना आपल्या लेखणीच्या माध्यमातून वाट करून देणारे अण्णा भाऊ साठे हे स्वकर्तृत्वाने घडले.त्यांचे घडणे हे शेकडो वर्षांच्या गुलामगिरीत खितपत पडलेल्या समाजाला नवसंजीवनी देणारे होते.अशा या साहित्यसम्राट महामानवाचे निधन १८ जुलै १९६९ रोजी झाले.समतेवर आधारित समाजनिर्मितीचा ध्यास घेणाऱ्या अण्णा भाऊ साठे यांच्या स्मृतीस विनम्र अभिवादन…!!!

✒️लेखक:-राजेंद्र लाड (शिक्षक)आष्टी,जि.बीड(मो.९४२३१७०८८५)