संस्कारक्षम शिक्षण क्षेत्रातील उत्तुंग व्यक्तिमत्व – प्रो. डॉ.रामकृष्ण बदने

    37

    ✒️आष्टी प्रतिनिधी(सौ.सरस्वती लाड)

    आष्टी(दि.4ऑगस्ट):- डॉ.रामकृष्ण बदने यांचा वाढदिवस.त्या निमित्त त्यांच्या कार्यकर्तुत्वाचा घेतलेला हा संक्षिप्त आढावा.)‘विठ्ठलाच्या नामस्मरणात मानवी देहाचे सुख असते!’असे अध्यात्मात म्हटले आहे.विठोबाचे दास होण्यात मोठे भाग्य असल्याचेही सर्व संत सांगतात.किंबहुना दुर्लभ मानवी देह मिळाला त्याचा वापर योग्य कार्यासाठी करावा,असा संदेश परमार्थाचा आहे.तद्वत रंजल्या-गांजल्या,दीनदलित,दुबळ्या अनाथ वंचित घटकांमध्ये शिक्षण क्षेत्राच्या माध्यमातून संस्काराची सदैव पेरणी करून युवकांना नवी दिशा आणि नवी चेतना देण्याचे अमूल्य कार्य उच्च शिक्षण क्षेत्रातील अनेक शिक्षक,प्राध्यापक करत असतात.

    त्यात नांदेड जिल्ह्याच्या मुखेड येथील महाविद्यालयातील वरिष्ठ प्रो.डॉ.रामकृष्ण बदने यांच्या प्रमाणिक कार्याचा उल्लेख सन्मानाने करण्याजोगा आहे…लातूर जिल्ह्याच्या अहमदपूर तालुक्यातील देवकरा या एका छोट्या गावात जन्मलेल्या बदने सरांना लहानपणापासूनच आध्यात्मिक क्षेत्राची आवड.कारण घरात वारकरी सांप्रदायाचे वातावरण.घरची आर्थिक परिस्थिती हलाखीची पण शिक्षणाबद्दल आस्था असणारी.म्हणूनच वडील दत्तात्रय बदने यांनी आपल्या मुलाला शाळेत घातले.

    मुलगा शाळेत जाताना नकार देऊ लागला तर त्याचे फाजील लाड न करता अनेक वेळा शिक्षाही केली.समजूनही सांगितले.घरात खाणारी सहा तोंड आणि अत्यल्प कोरडवाहू शेती.त्यातून संसाराचा गाडा ओढताना आई-वडिलांना लोकांकडे वेळोवेळी मोलमजुरी करावी लागली.रोजगार हमीच्या कामावर जावे लागले.खरिपाची पिक काढणी झाली की रब्बीसाठी गंगेच्या काठावरील गंगाखेड भागात कामासाठी जावे लागले.पण मुले शिकली पाहिजेत ही जिद्द मात्र सोडली नाही.त्यामुळेच त्यांचे दोन्ही बंधु भागवत हा एम.ए.मराठी तर योगीराज एम.ए.समाजशास्र करून प्राध्यापक झाला.दहावीनंतर वडिलांनी त्यांना अकरावीसाठी राजर्षी शाहू महाविद्यालय,लातूर येथे ठेवले.नंतर बी.ए.त्यांनी महात्मा गांधी महाविद्यालय अहमदपुर जि.लातूर येथून केले तर बी.एड.शासकीय अध्यापक महाविद्यालय परभणी येथून केले.

    दयानंद कला महाविद्यालय लातूर येथून हिंदी या विषयात एम.ए.केले.एम.ए.ला ते तत्कालीन मराठवाडा विद्यापीठ औरंगाबाद येथून सर्वप्रथम आले.शिक्षण घेत असताना त्यांना अनेक वेळा रोजगार हमीची कामे करावी लागली तसेच रोजंदारीने जावे लागले.त्या काळात त्यांना कळून चुकले की शिक्षणाशिवाय आपला उध्दार नाही.याच काळात त्यांचे मामा डॉ.मनोहरराव घुले वैद्यकीय पदवी घेत होते.त्यांचा गावातील मानसन्मान पाहून व आजोबांचे योग्य मार्गदर्शन घेऊन शिक्षणाबद्दलची आस्था आणखीनच बळावली.
    एम.ए.नंतर त्यांनी ग्रामीण (कला,वाणिज्य व विज्ञान)महाविद्यालय,वसंतनगर ता.मुखेड जि.नांदेड येथे विनाअनुदानित वरिष्ठ महाविद्यालयात प्राध्यापकाची नौकरी स्वीकारली.

    त्याच काळात वरिष्ठ प्राध्यापकांसाठी सेट/ नेट परीक्षा आली होती.त्याशिवाय नौकरीचे काही खरे नव्हते.तेवढ्यात १९९४ ला विवाह झाला होता.परिवाराची जबाबदारी वाढलेली होती.त्यात एका वर्षानंतर एका मुलीचे आगमन ही संसारात झालेले होते.अश्या सर्व विशेषतः आर्थिक चक्रव्यूहात अडकले असताना सासरे डॉ.गोपीनाथ केंद्रे व पत्नी दैवशालाने बळ दिले व त्यामुळेच ते सेट परीक्षा उत्तीर्ण झाले.तेवढ्यावरच न थांबता पुढे पीएच.डी.ही पदवी प्राप्त केली.नंतर गाईडशीप मिळवली व आजपर्यंत सात संशोधक विद्यार्थी त्यांच्या मार्गदर्शनाने पीएच.डी.झाले आहेत.

    कीर्तन प्रवचनातून प्रबोधन –
    महाविद्यालयात अध्यापनाचे काम चालू असतानाच केवळ चार भिंतीच्या आतचे शिक्षण देऊन ते थांबले नाहीत.तर त्यांनी महाविद्यालय वेळे शिवाय व सुट्ट्यांच्या काळात वारकरी कीर्तन व प्रवचनातून समाज प्रबोधन सुरू ठेवले.एवढेच नाही तर विद्यार्थिदशेपासूनच त्यांना वक्तृत्वाची आवड असल्यामुळे अनेक कार्यक्रमांमधून प्रबोधन कार्य आरंभिले.याच काळात त्यांनी अनेक संशोधनपर लेख संशोधन पत्रिकां मधून लिहिलेत.अनेक आंतरराष्ट्रीय, राष्ट्रीय,राज्यस्तरीय परिषदांमधून पेपर वाचन केले.

    प्रोफेसर पदवी अन् सहा पुस्तके –
    बदने सरांच्या कार्याचा आवाका पाहून संस्थेने राज्यातील भटक्या विमुक्तांसाठी आश्रम शाळेतील विद्यार्थ्यांसाठी समाजकल्याण विभागाकडून पहिले विद्यानिकेतन (पब्लिक स्कूल)कमळेवाडी ता.मुखेड येथे सुरू केले होते.तेथे प्राचार्य म्हणून अतिरिक्त पदभार देऊन नियुक्त केले.इथे कार्य करताना संस्थेच्या सहकार्याने त्यांनी अल्पावधीतच या शाळेला नावारूपाला आणले व एक उपक्रमशील शाळा म्हणून तिचा सर्वत्र नावलौकिक केला.हे काम करताना त्यांनी तन,मन,व प्रसंगी धन ही अर्पण केले.अनेक उपक्रम राबविले.नुकतीच त्यांना पदोन्नतीने प्रोफेसरची पदवी ही प्राप्त झाली आहे.नांदेड जिल्ह्यातच नव्हे तर मराठवाड्यातील क्रियाशील व्यक्तिमत्त्व म्हणून त्यांचा नावलौकिक आहे.विविध विषयावर ते व्याख्याने देतात तसेच विविध विषयांवरती प्रासंगिक विपुल लेखनही करतात.त्यांच्या नावे सहा पुस्तके असून अनेक ग्रंथांसाठी व वृत्तपत्रांसाठी त्यांनी लेखन केले आहे.

    मातृत्वाचा जागर :१००० व्याख्याने –
    समाजातील ज्वलंत समस्यावर चिंतन करून विषय निवडण्याचे ठरविले व त्यांच्या लक्षात आले की आज समाजात आई-वडिलांची सर्वाधिक हेटाळणी त्यांच्या मुलांकडून होते आहे.त्यामुळे या विषयावर प्रबोधन करणे ही काळाची गरज आहे.म्हणुन त्यांनी मातृत्वाचा जागर घालायचे ठरवले.या एका विषयावर महाराष्ट्रभर जवळजवळ एक हजार पेक्षा जास्तीची व्याख्याने दिली.आकाशवाणीवर,अनेक व्याख्यानमालांमधुन,अनेक किर्तन,प्रवचन,स्नेहसंम्मेलने,पालक मेळावे,गणेशोत्सव,दुर्गा महोत्सव व अन्य कार्यक्रमातून सातत्याने हा विषय ते मांडत राहीले.या विषयावरही विपुल लेखन केले.म्हणुन आज महाराष्ट्रात त्यांची आईकार म्हणुन वेगळी ओळख आहे.यातून अनेक आई-वडिलांपासून दूर गेलेल्या मुलां मुलींना एकत्र आणण्याचे काम केले.

    राज्य व राष्ट्रीय पुरस्कारांनी सन्मान –
    त्यांच्या कामाचे कौतुक समाजाने वेळोवेळी केले.त्यांना आजपर्यंत २९ पेक्षा अधिक राष्ट्रीय व राज्य पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले आहे.नुकताच महात्मा कबीर समता परिषद महाराष्ट्र राज्य यांच्याकडून त्यांना महाराष्ट्र भूषण पुरस्कार प्राप्त झाला आहे.

    प्रोत्साहन देणाऱ्या मार्गदर्शकांविषयी नम्रता –
    सरांकडून शिक्षण क्षेत्राकडे येण्यासाठीआई वत्सलाबाई बदने,वडील दत्तात्रय बदने,आजोबा केशवराव घुले,मामा मनोहरराव घुले,मामी सौ.मंगलताई घुले,सासरे डॉ.गोपीनाथराव केंद्रे,पत्नी सौ.दैवशाला बदने,त्याच बरोबर लाभलेले गुरु ज्यात कै.प्रा.श्याम आगळे,प्रा.डॉ.सूर्यनारायण रणसूभे,प्रा.डॉ.भुषणकुमार जोरगुलवार,प्राचार्य डॉ.नागोराव कुंभार,प्रा.डॉ.नरसिंहप्रसाद दुबे हे आपले आदर्श असल्याचेही ते बोलतात.तर नौकरीनंतर आपणास काम करण्याची ऊर्जा ही सतत खऱ्या अर्थाने संस्थेचे संस्थापक अध्यक्ष माजी आमदार कर्मवीर किशनराव राठोड,तत्कालीन सचिव कै.आ.गोविंदराव राठोड,मराठवाडा भूषण डॉ.दिलीप पुंडे यांच्याकडून मिळाली हे ही ते नमूद करतात.असाच आदर्श आपलाही समाजाने घ्यावा यासाठी आपण सर्वांनी समाजोपयोगी कामे करावीत असा सल्ला ते देतात.त्यासाठी त्यांनी महाविद्यालयात राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्यक्रम अधिकारी म्हणूनही उत्कृष्टपणे कार्य केले आहे.त्यांचा आज वाढदिवस.त्या निमित्त त्यांना दीर्घायुरारोग्य लाभो व त्यांच्याकडून अशीच समाजाची सेवा घडत राहो.या अपेक्षेसह प्रो.डॉ.रामकृष्ण बदने सरांना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा…!!!
    प्रा.बिभिषण चाटे,बीड