जिल्हाधिकाऱ्यांनी कार्यवाहीचे आश्वासन दिल्यानंतर महिलेने ट्रॅक्टर घेतले ताब्यात

    37

    ✒️सिध्दार्थ ओमप्रकाश दिवेकर(तालुका प्रतिनिधी,उमरखेड)मो:-9823995466

    उमरखेड(दि.5ऑगस्ट):-तहसिल आवारातील जप्तीच्या ट्रॅक्टर मधील बॅटरी सह इतर साहित्य काढून नेणाऱ्या शासकिय वाहन चालकासह त्यास आदेशित करणाऱ्या तहसिलदारा विरुद्ध पोलीस कार्यवाही करावी अन्यथा दि.१४ ऑगस्टपासून उमरखेड उपविभागिय अधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषण करणार असल्याचे निवेदन जिल्हाधिकार्‍यांना उमरखेड भेटीत प्रत्यक्ष दिल्यानंतर तक्रारदार महिलेची कैफीयत जाणून घेऊन तुम्ही तुमचे ट्रॅक्टर घेऊन जा , योग्य ती कार्यवाही मी करतो अशा शब्दात जिल्हाधिकाऱ्यांनी आश्वासन दिल्या नंतर श्रीमती अन्नपूर्णा बनसोड यांनी तहसिल आवारातून ट्रॅक्टर ताब्यात घेऊन घरी नेले.

    या प्रकरणात संबंधितांविरुद्ध काय कार्यवाही होते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

    अवैध मुरुम वाहतूक करित असतांना ब्राम्हणगांव – चातारी रस्त्यावर शेतकरी श्रीमती अन्नपूर्णा बनसोड यांचे ट्रॅक्टर तहसिलदार आनंद देऊळगावकर यांनी दि. १ जुलै रोजी जप्त करून तहसिल आवारात जमा केले.त्यानंतर दि. १९ जुलै रोजी श्रीमती बनसोड यांनी दंडाची रक्कम १ लाख ७ हजार ७७५ रुपयांचा रितसर भरणा केला . त्यानंतरही तहसिलदारांनी ट्रॅक्टर सोडण्यास चालढकल केली.

    चालक दंड भरल्याची पावती घेऊन ट्रॅक्टर सोडण्याची तहसिलदारांना विनंती करण्यासाठी गेली असता तोंड घेऊन येथे येऊ नकोस असे म्हणून तहसिलदार महाशय महिलेवर खेकसले तेव्हा तालुका दंडाधिकारी आणखी कुठली कार्यवाही करतील या भितीने घाबरलेल्या बनसोड या आपले ट्रॅक्टर कधी सुटेल या विवंचनेत असतांना अचानक दि. २८ जुलै रोजी त्यांना तहसिल आवारातून त्यांच्या मोबाईलवर एका व्यक्तीचा फोन येतो की तुमच्या ट्रॅक्टरचे बायोनट खोलून त्या मधील बॅटरी व काही सामान तहसिलदारांच्या शासकिय वाहनाच्या चालकाने काढून नेल्याची माहिती मिळते व तसे फोटो त्यांच्या मोबाईलवर पाठविले तेव्हा श्रीमती बनसोड यांचा संताप अनावर झाला व त्यांनी यासंदर्भात दि ३० जुलै रोजी जिल्हाधिकारी व जिल्हा पोलीस अधिक्षकांकडे संबंधित वाहन चालक याच्यासह त्यास आदेशित करणाऱ्या तहसिलदारा विरुद्ध पोलीस कार्यवाही करावी अशी मागणी केल्यानंतर ट्रॅक्टरमधील उडालेले साहित्य जाग्यावर आले व त्यानंतर दि. ३ ऑगस्ट रोजी नायब तहसिलदार डांगे यांनी ट्रॅक्टर साहित्य बरोबर असल्याचा पंचनामा केला.

    ही माहिती ही बनसोड यांना अवघ्या काही क्षणांत मिळाली तेव्हा त्यांनी प्रकरणाची सावरा सावर करणाऱ्या प्रशासनातील खोटारड्या अधिकाऱ्या विरुद्ध कठोर कार्यवाही करून त्यांची हकालपट्टी करावी.अन्यथा दि. १४ ऑगस्टपासून उपविभागिय अधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषण करू अश्या इशाऱ्याचे सुचनापत्र दि . ४ ऑगस्ट रोजी जिल्हाधिकारी अमोल येडगे हे उमरखेड उपविभागिय कार्यालयात आढावा बैठकीसाठी आले असता त्यांची प्रत्यक्ष भेट घेऊन अन्नपूर्णा बनसोड यांनी दिले.तेव्हा तुम्ही तुमचे ट्रॅक्टर आता घेऊन जा..! मी योग्य ती कार्यवाही करतो असे आश्वासन दिल्यानंतर तहसिल आवारातून ट्रॅक्टर नेण्यात आले.

    मात्र संबंधिता विरुद्ध कार्यवाही न झाल्यास १४ ऑगस्ट रोजी आपण उपोषणास बसणार असल्याचा निर्धार श्रीमती बनसोड यांनी व्यक्त केला आहे.