✒️बीड,विशेष प्रतिनिधी(सौ.सरस्वती लाड)
बीड(दि.7ऑगस्ट):-कोरोनामुळे प्राथमिक शाळा सुरू होऊ शकलेल्या नाहीत,विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे.त्यामुळे विद्यार्थ्यांच्या गुणवत्ता विकासासाठी “ शिक्षक आपल्या दारी” हा उपक्रम राबविणे बाबत निर्देश देण्यात आले असून शिक्षक आता विद्यार्थ्यांच्या घरी जाऊन विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या प्रवाहात ठेवणार आहेत.
शासन परिपत्रकानुसार दि.१५ जुलै २०२१ पासून राज्यातील कोविड मुक्त क्षेत्रात शाळा सुरु करण्यास परवानगी देण्यात आली आहे.पहिल्या टप्यात शाळेतील ८ वी ते १२ वी वर्ग सुरु करण्यास शासन मान्यता देण्यात आली.कोविड साथ रोगाच्या पार्श्वभूमीवर इ.१ ली ते ७ वी चे वर्ग सुरु नसल्यामूळे विद्यार्थ्याचे शैक्षणिक नुकसान होऊ नये म्हणून कोविडचे सर्व नियम पाळून जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये “ शिक्षक आपल्या दारी” हा उपक्रम राबविण्यात येणार आहे.
यामध्ये प्रत्येक वर्गाच्या वर्ग शिक्षकांनी आपापल्या वर्गाचा व्हाॕटसअप ग्रुप तयार करावा,व्हाॕटसअप ग्रुपवर नियमीत अभ्यासक्रम,स्वाध्याय व गृहपाठ द्यावेत,ज्या विद्याथ्र्यांकडे ऍन्ड्रॉईड मोबाईल नाहीत अशा जवळजवळ राहणा-या ३ ते ५ विद्यार्थ्यांचे जिओग्राफीकल गट तयार करावेत.तसेच मुख्याध्यापकांनी शिक्षकांचे नियोजन करुन विषयनिहाय शिक्षकांना जिओग्राफीकल गटास भेट देऊन मार्गदर्शन करण्याच्या सूचना द्याव्यात,या शिक्षकांनी प्रत्येक विद्यार्थ्यांच्या घरी जाऊन अभ्यासाविषयी चौकशी करावी,मार्गदर्शन करावे व स्वाध्याय व गृहपाठ द्यावेत,स्वाध्याय व गृहपाठ तपासणी बाबतचे वेळापत्रक तयार करुन त्यानुसार पालकांना गृहपाठ तपासण्यासाठी शाळेत बोलवावे.
यावेळी कोविड- १९ च्या सर्व नियमांचे पालन करावे.त्याचबरोबर गृहपाठाची बारकाईने तपासणी करुन सूचना द्याव्यात व त्याची पूर्तता झाली किंवा नाही याची गृह भेटीत चौकशी करावी व त्याबाबत मार्गदर्शन करावे.केंद्रप्रमुख यांनी शाळेला भेटी देऊन उपक्रमाचा आढावा घ्यावा व प्रगतीचा अहवाल गटशिक्षणाधिकारी यांना दर सोमवारी सादर करावा.विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये यासाठी मुख्याध्यापक,केंद्रप्रमुख,विस्तार अधिकारी व गटशिक्षणाधिकारी यांनी सामुदायिक प्रयत्न करावेत.यापूर्वी देण्यात आलेल्या संदर्भ क्र.२ च्या पत्राचाही आधार घेण्यात यावा अश्या सूचना बीडचे प्राथमिक शिक्षणाधिकारी श्रीकांत कुलकर्णी यांनी सर्व पंचायत समितीच्या गटशिक्षणाधिकारी यांना पत्रान्वये दिल्या आहेत.