खगोलीय मंडळातून नवनवीन वैज्ञानिक माहिती विद्यार्थ्यापर्यंत पोहोचावी – श्रीकांत कुलकर्णी

    35

    ✒️आष्टी प्रतिनिधी(सौ.सरस्वती लाड)

    बीड(दि.7ऑगस्ट):- जिल्ह्यातील इयत्ता ७ वी पर्यंत असलेल्या शाळेमध्ये खगोलीय मंडळ (अँस्ट्रानाँमी क्लब) स्थापन करण्यात आलेले असून याच संदर्भान्वये आष्टी तालुक्यातील जवळपास ४७ शाळेमध्ये खगोलीय मंडळ स्थापन करण्यात आलेले आहेत.तालुकास्तरावर खगोलीय मंडळातील अध्यक्ष व सचिव तसेच केंद्रप्रमुख व शिक्षण विस्तार अधिकारी यांचा व्हाॕटसअप ग्रुप तयार करण्यात आलेला असून या व्हाॕटसअप ग्रुपमधून नवनवीन वैज्ञानिक माहितीची देवाण – घेवाण करण्यात येवून ती विद्यार्थ्यापर्यंत पोहोच करण्यात येत आहे.तसेच यासाठी शाळास्तरावर विशेष अद्यावत खगोलीय रुम बनविण्यात येत आहेत.

    याच अनुषंगाने आष्टी तालुक्यातील खगोलीय मंडळातील अध्यक्ष,सचिव व सदस्यांची शनिवार दि.७ आँगस्ट २०२१ रोजी सकाळी १० ते ११ या दरम्यान झूम अँपद्वारे आँनलाईन वेबिनार घेण्यात आले.या वेबिनार मध्ये मार्गदर्शक म्हणून जि.प.बीड चे प्राथमिक शिक्षणाधिकारी श्रीकांत कुलकर्णी बोलतांना म्हणाले की,खगोलीय मंडळातून वैज्ञानिक दृष्टिकोन जोपासण्यात येवून नवनवीन वैज्ञानिक माहिती विद्यार्थ्यांपर्यंत गेली पाहिजे तसेच विद्यार्थ्यांची आकाशाशी मैत्री झाली पाहिजे.अगदी बालवयात विद्यार्थ्यांना अवकाशातील अनेक प्रश्न पडत असतात त्यांची उत्तरे त्यांना मिळाली पाहिजेत तरच ते मोठे झाल्यावर शास्त्रज्ञ बनतील.तसेच बीड जिल्ह्यातील या विषयावरील पहिली वेबिनार आयोजित केल्याबद्दल त्यांनी आष्टी गटशिक्षणाधिकारी कार्यालयाचे विशेष अभिनंदन केले तसेच इ.७ व त्यापुढील वर्ग असलेल्या शाळेने टेलिस्कोप (दुर्बिण) खरेदी करुन अवकाशातील दृष्य पाहण्याची संधी विद्यार्थ्यांना उपलब्ध करुन द्यावी असेही शेवटी ते म्हणाले.

    या वेबिनार चे प्रास्ताविक ज्यांनी आष्टी तालुक्यात पहिले खगोलीय मंडळ स्थापन केले अशा जि.प.मा.शा.दादेगाव शाळेचे आदर्श मुख्याध्यापक योगेश कोंडजकर यांनी करुन खगोलीय मंडळाची स्थापना व त्यातून कसे उपक्रम राबवायचे याचे सखोल मार्गदर्शन केले.या वेबिनारसाठी विशेष मार्गदर्शक म्हणून जिल्ह्यातील आदर्श शाळा जरेवाडी ता.पाटोदा या शाळेवर कार्य केलेले व सध्या वनवेवस्ती ता.जामखेड येथे कार्यरत असलेले आदर्श वैज्ञानिक शिक्षक प्रविण शिंदे उपस्थित होते.त्यांनी आकाशाशी मैत्री करणारा खगोलशास्त्र क्लब असून खगोलशास्त्र हा एक अद्भुत आणि अगम्य असा विषय आहे.खगोलशास्त्राचे विश्व आकर्षक व अनंत कुतूहलाने भरलेले आहे असे सांगून खगोलीय मंडळाची उद्दिष्टे,स्थापना,शालेय स्तरावर करावयाची कामे,मंडळासाठी लागणारे साहित्य,वेगवेगळे दिन विशेष,पुस्तके,वेबसाईट याविषयी पी.पी.टी.द्वारे सखोल माहिती दिली.

    या वेबिनारचे आयोजन गटशिक्षणाधिकारी सुधाकर यादव यांच्या मार्गदर्शनाखाली राज्य पुरस्कार प्राप्त शिक्षक तथा कन्या प्रशाला आष्टी च्या खगोलीय मंडळाचे सचिव राजेंद्र लाड यांनी करुन वेबिनारचे सूत्रसंचलन केले तर आभार जेष्ठ शिक्षण विस्तार अधिकारी अर्जुन गुंड यांनी मानले.या वेबिनारमध्ये शिक्षण विस्तार अधिकारी भगवान सोनवणे,आष्टी चे कर्तव्यदक्ष गटशिक्षणाधिकारी सुधाकर यादव,केंद्रप्रमुख,खगोलीय मंडळाचे अध्यक्ष,सचिव व विद्यार्थी सदस्य मोठ्या प्रमाणात सहभागी झाले होते.