संत गाडगेबाबांचे व्यक्तिमत्व जीवनकला पुस्तकाचे विमोचन

    40

    ?आदर्श राजगड निर्मितीसाठी संत गाडगेबाबांचे विचार प्रेरक ठरले – चंदू पा.मारकवार

    ✒️रोशन मदनकर(उप संपादक)

    चंद्रपूर(दि.10ऑगस्ट):-ज्येष्ठ लेखक प्रा.रघुनाथ कडवे आणि ग्रामगीताचार्य बंडोपंत बोढेकर लिखित संत गाडगेबाबांचे व्यक्तिमत्व जीवनकला या पुस्तकाचे प्रकाशन महाकाली नगरीत असलेल्या डेबू सावली वृध्दाश्रमात संत गाडगेबाबांचे निकटवर्तीय तथा वाहनचालक भाऊराव काळे ( मुंबई ) यांच्या हस्ते झाले. छोटेखानी स्वरूपात झालेल्या ह्या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ विचारवंत माजी आ. वामनराव चटप होते.आदर्श राजगड चे शिल्पकार चंदू पाटील मारकवार , डेबू सावली वृध्दाश्रमाचे संचालक सुभाष शिंदे, ग्रामगीताचार्य बंडोपंत बोढेकर याप्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते.

    पुस्तक निर्मिती, त्यासंबंधी मिळालेली प्रेरणा आणि गाडगेबाबांचा कार्य सिध्दांत यावर ग्रामगीताचार्य बोढेकर यांनी सविस्तर प्रकाश टाकला. उदघाटक गाडगेबाबांचे ९१ वर्षीय वाहनचालक भाऊरावजी काळे म्हणाले ,संत गाडगेबाबांना मी अगदी जवळून पाहिलेआहे. तसा संत आता कदापि होणे नाही.गाडगेबाबांच्या जीवनकार्यातून लक्षावधी लोकांना प्रेरणा मिळत आहे. त्यांचे परिवर्तनवादी कार्य जनसामान्यांना विवेकी दृष्टी देत चिरकाल दिशादर्शन करणारे आहे.राजगडचे चंदू पाटील मारकवार म्हणाले , हे नवनिर्मित पुस्तक संत गाडगेबाबांच्या व्यक्तिमत्त्वाच्या विलक्षण गुणवत्तेच्या रंगछटा अधोरेखित करते.

    गाडगेबाबा म्हणजे अष्टौप्रहर ग्रामकल्याणाचाच विचार करणारे खरे दिपस्तंभ आहेत.आदर्श राजगड च्या निर्मितीत गाडगेबाबांच्या विचारांचा मोठा वाटा आहे,असे ते म्हणाले .
    माजी आ. चटप म्हणाले, गाडगेबाबांच्या कार्यातून सेवेची प्रेरणा मिळते.त्यांची सहज जीवनशैली ,आचार विचार आणि कर्तव्यबोध यातून मानवतावादी विचारांचे दर्शन घडते.त्यांनी लोकांना शिक्षणाचा मार्ग सांगीतला.माणसांच शोषण अज्ञानातून अंधश्रध्देच्या आहारी गेल्याने होत असते ,हे त्यांंनी ओळखले होते.एकंदरीत शोषणमुक्त व्यवस्था निर्मितीसाठी गाडगेबाबांचे मोठे योगदान होते, असे ते म्हणाले .सुभाष शिंदे म्हणाले , गाडगेबाबा आपण बनू शकत नसलो तरी त्यांंनी दिलेला दशसूत्री कार्यक्रम आपल्यापरिने राबवू शकतो.

    म्हणूनच नव्या पिढीपर्यंत हा विचार प्रयत्नपूर्वक पोहचवला पाहिजे.याप्रसंगी पुस्तक निर्मितीच्या कार्यात सहयोग देणारे देवराव कोंडेकर , नारायण चव्हाण ,शंकर दरेकर , नामदेव गेडकर , संजय कामडे, चित्रकार सुदर्शन बारापात्रे ,प्रकाश चांभारे आदींचा सन्मानचिन्ह देऊन गौरव करण्यात आला. सूत्रसंचालन धनराज तावाडे यांनी केले तर आभार सौ. रजनी बोढेकर यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सौ. भारती शिंदे, ॲड. राजेंद्र जेनेकर , विलास उगे, प्रा. श्रावण बानासुरे ,विजय चिताडे , राकेश बोबडे , हरिश्चंद्र बोढे, अनिल दहागावकर , संजिव पोडे, प्रदीप अडकिणे , प्रभाकर आवारी आदींचे सहकार्य लाभले.