जगतिक आदिवासी दिनानिमित्त कृषी विभाग व आत्मा यांच्या मार्फत रानभाजी महोत्सव

45

✒️विशेष प्रतिनिधी(अमोल उत्तम जोगदंडे)

उमरखेड(दि.13ऑगस्ट):- जागतिक आदिवासी दिनाचे औचित्य साधून रानभाजी महोत्सव चे आयोजन 12 ऑगस्ट 2021 रोजी कृषी उत्पन्न बाजार समिती उमरखेड येथे आयोजित करण्यात आले होते. या रानभाजी महोत्सव कार्यक्रमाचे उद्घाटन प्रसंगी मा श्री नामदेवराव ससाणे आमदार उमरखेड -महागाव विधानसभा मतदार संघाचे प्रतिनिधि महेश काळेश्वरकर, शंकर जाधव उपसभापती, पंचायत समिती; संगीता वानखेडे, पंचायत समिती सदस्या,; सुकळी येथील उद्यान पंडित पुरस्कार प्राप्त शेतकरी अशोक वानखेडे यांच्या हस्ते करण्यात आले.

रानभाजी महोत्सव मध्ये सुरनकंद, कुंजर, कपाळ फोडी, निरगुडी, कर्डू, बांबूचे कोंब, चमकुरा, चिवळ, करटुले, पांढरा माठ, आवळा, गुळवेल, अंबाडी,अक्कलकाढा, नाय, वावडिंग, राजगिरा, तरोटा, पाथरी, पारशी दोडका, चेंडूळे, शेवगा, हडसन, उंबर, तांदुळजा, बिब्बा, फांजची भाजी, आघाडा, इत्यादी विविध प्रकारच्या रानभाज्या महोत्सवामध्ये प्रदर्शनासाठी व विक्रीसाठी आणल्या होत्या. प्रास्ताविकपर भाषणामध्ये श्रीरंग लिंबाळकर, तालुका कृषी अधिकारी यांनी रानभाज्यांची ओळख, सदरील रानभाज्यां जंगलात तसेच धू-या बंधाऱ्यावर पडीत ठिकाणी नैसर्गिक रित्या उगवत असल्यामुळे व त्यांना कुठल्याही प्रकारचे रासायनिक खत दिले जात नसल्यामुळे व कीटकनाशके फवारणी न केल्यामुळे विषमुक्त व आरोग्यास लाभदायक असलेल्या रानभाज्यां आहारामध्ये किती महत्त्वाच्या आहेत त्याबाबत सविस्तर मार्गदर्शन केले.

त्यानंतर बी टी एम रत्नदीप धुळे यांनी रानभाज्या चे औषधी गुणधर्म बाबत मार्गदर्शन केले. पंचायत समिती उपसभापती शंकर जाधव यांनी रानभाज्या आहारामध्ये सेवन केल्यामुळे त्याचे किती महत्त्व आहे याबाबत व त्यांनी रानभाज्यांचा यापूर्वी आस्वाद घेतलेला असल्यामुळे त्यांनी त्यांच्या भाषणांमधून अनुभव व्यक्त केले. ज्याप्रमाणे पूर्वीची वडीलधारी मंडळी रानभाज्या सेवन करत होती त्याच प्रमाणे नवीन पिढीने सुद्धा रानभाज्या चे सेवन आरोग्याच्या दृष्टीने किती महत्त्वाचे आहेत याबाबत माहिती सांगितली.उद्यान पंडित पुरस्कार प्राप्त अशोक वानखेडे यांनी दैनंदिन आहारामध्ये आपण नेहमी प्रचलित पालेभाज्या फळभाज्या सेवन करतो त्याच प्रमाणे किमान आठवड्यातून एक ते दोन दिवस रान भाज्या सुद्धा सेवन कराव्यात त्यामुळे आपले आरोग्य निरोगी राहण्यास मदत होऊ शकते.

त्यानंतर माननीय आमदार नामदेवराव ससाने यांचे स्वीय सहाय्यक महेश काळेश्वर कर यांनी रानभाजी विक्री करणाऱ्या शेतकऱ्यास गांधी चौक तसेच भाजी मंडई नगर परिषद येथे विक्रीसाठी जागा उपलब्ध करून देण्यात येईल अशा प्रकारचे आश्वासन दिले. तसेच रानभाजी महोत्सव हा एक आगळा वेगळा स्तुत्य कार्यक्रम आहे अशाच प्रकारचे जर आपण कार्यक्रम- महोत्सव आयोजित केले तर सर्व सामान्य ग्राहकांना तसेच नागरिकांना रानभाज्या बाबत ओळख होऊन शहरातील व सर्वसामान्य नागरिक दैनंदिन आहारामध्ये रानभाज्यांचे सेवन करतील. खेड्यापाड्या मधून जंगल दऱ्याखोऱ्यातून डोंगरांमधून जे आदिवासी बांधव व इतर शेतकरी बांधव भाज्या विक्रीकरीता आणतील त्यांच्याकडून ग्राहकांनी सुद्धा खरेदी करून दैनंदिन आहारामध्ये सेवन कराव्यात जेणेकरून त्यांना आर्थिक उत्पन्नाची संधी निर्माण होईल असे आव्हान याप्रसंगी केले.

सुनील देशपांडे, मंडळ कृषी अधिकारी यांनी कीटकनाशके फवारताना घ्यावयाची काळजी यामध्ये फवारणी करणारे मजूर किंवा शेतकरी यांनी फवारणी किट घालूनच फवारणी करावी त्यामुळे मजुरास किंवा शेतकऱ्यास विषबाधा होऊ शकत नाही. जर फवारणी किट न घालता फवारणी केली तर कीटकनाशकाचे दुष्परिणाम कशा प्रकारे होतात याबाबत प्रात्यक्षिकाद्वारे सविस्तर मार्गदर्शन केले. विदर्भ फार्मर्स प्रोडूसर कंपनी, सुकळी अमानपूर चे संचालक वानखेडे हेही याप्रसंगी उपस्थित राहुन त्यांनी रानभाजी महोत्सवामध्ये जिरेनियम तसेच भाजीपाल्याचे रोपे विक्री करता उपलब्ध असणारे भाजीपाल्यांचे ट्रे प्रदर्शनामध्ये ठेवण्यात आले होते. याप्रसंगी व्यासपीठावर गजानन सोळंके पंचायत समिती सदस्य, सुधीर शिंदे कृषी उत्पन्न बाजार समिती सचिव, श्री शिवाजी रावते, गंगाधर पेंटेवाड, मंडळ कृषी अधिकारी व इतर मान्यवर उपस्थित होते.

या प्रसंगी तालुक्यातील दर्‍या-खोर्‍यातून डोंगरद-यातुन माळरानातून रानभाज्या आणलेले आदिवासी शेतकरी बांधव तालुक्यातील कृषी मित्र विकास मुटकुळे, संजय राठोड, मनोज सुर्यवंशी, राहुल कांबळे, काशिनाथ डाखोरे,तयब अली,अमोल जोगदंडे कृषिमित्र धनज,कृषी विभागाचे कृषी पर्यवेक्षक सचिन चव्हाण, रामकिसन शिंदे, प्रकाश गुंडारे, विजय हामंद,सर्व कृषी सहाय्यक व क्षेत्रिय कर्मचारी महिला भगिनी व इतर मोठ्या संख्येने उपस्थित होते. रानभाज्या महोत्सव हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी POCRA चे समुह सहाय्यक, कृषी विभागाचे सर्व कर्मचारी व कृषी मित्र यांनी विशेष परिश्रम उघेऊन कार्यक्रम यशस्वी केला. कार्यक्रमाचे शेवटी कृषी विभाग व सिंजेंटा कंपनी यांच्या संयुक्त उपक्रमातून फवारणी करताना घ्यावयाची काळजी या बाबतचा प्रचार-प्रसार रथाचा सर्व मान्यवरांच्या हस्ते हिरवी झेंडी दाखवून शुभारंभ करण्यात आला. सदरील प्रचाराचा रथ हा सर्व तालुक्यामध्ये फिरून फवारणी करताना शेतकऱ्यांनी व शेतमजुरांनी कशा प्रकारची काळजी घ्यावी याबाबत प्रचार प्रसिद्धी करणार आहे. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रकाश पवार कृषी सहाय्यक यांनी केले व कार्यक्रमाच्या शेवटी सोमनाथ जाधव कृषी सहाय्यक यांनी सर्व उपस्थितांचे आभार मानले.