स्वातंत्र्य दिन

24

नुकतेच पंख फ़ुटलेले ते पाखरू आभाळात विहरतांना स्वत:शीच म्हणाले,स्वातंत्र्य म्हणजे काय बरे?त्याची नजर खाली असलेल्या एका मुलाकडे गेली,त्याने मुलास विचारले, स्वातंत्र्य म्हणजे काय बरे?खपाटीला गेलेल्या पोटावरून हात फ़िरवत मुलगा म्हणाला,दोन वेळचं पोटभर जेवण म्हणजे स्वातंत्र्य,मित्रा.पाखराचं समाधान झालं नाही.ते जवळच्या झाडावर जाऊन बसलं.तोच त्याच्या शेजारी एक पाखरू येवून बसलं.पहिल्या पाखराने या दुसऱ्या पाखराला विचारलं,स्वातंत्र्य म्हणजे काय बरे?दुसरं पाखरू म्हणालं,चल तुला दाखवतो,स्वातंत्र्य म्हणजे काय ते.दोघेही उडाले,पेरूच्या बागेत आले.दुसऱ्या पाखराने एका पेरूवर झेप घेवून,चोचीत मावेल तेवढा तुकडा तोडला,तोच राखणदार त्यांना मारायला धावला.चपळाईने दोघे भुर्रकन उडाले,त्याच झाडावर येऊन बसले.

दुसरं पाखरू गर्वाने हसत पहिल्याला म्हणालं,आपल्याला हवं ते,हवं तेव्हा मिळवता येणं,म्हणजे स्वातंत्र्य.पहिल्या पाखराला हेही उत्तर पटलं नाही.ते पुन्हा उडालं आणि दुसऱ्या झाडावर जाऊन बसलं.त्या झाडाला नुकतच एक फळ आलं होतं.भुकेल्या पाखराने फळावर झेप घेतली,ते आता खाणार इतक्यात खाली उभ्या त्या भुकेल्या मुलाकडे त्याचे लक्ष गेले,क्षणार्धात पाखराने मुलाच्या दिशेने झेप घेतली आणि चोचीतले फळ त्याच्या हातात टाकले.पाखराने आता आभाळात उंच भरारी घेतली.मोकळी हवा छातीत भरून घेतली आणि त्या अथांग निळाईत स्वत:ला झोकून दिले.स्वातंत्र्याचा अर्थ कुणाला विचारायची गरज आता त्याला राहिली नव्हती.वास्तविक पहाता मित्रांनो हेच स्वातंत्र्य हवं आहे.तरच आपण खऱ्याअर्थाने स्वातंत्र्यात आहोत असे म्हणावे लागेल.

” स्वातंत्र्य ” म्हणजे स्वत:चं तंत्र,स्वतः निर्माण केलेली व्यवस्था व स्वतःचं बंधन.” स्वातंत्र्य ” हा केवळ शब्द नाही.परकीय शक्तीपासून मुक्ती मिळालेली स्थिती एवढंच या शब्दाचं वर्णन नाही,तर ” स्वातंत्र्य ” ही एक संकल्पना आहे व या संकल्पनेचा उगम भारतीय तात्त्विक विचारांत आहे.”स्वातंत्र्य ” म्हणजे मुक्ती,हक्क,जबाबदारी या जाणिवांचा संगम होय.हे सूत्र आपल्याला मनात खोलवर रुजवावं लागेल.आपले नेते,प्रशासकीय अधिकारी व नागरिक असं अर्थपूर्ण स्वातंत्र्य देशात सर्वत्र प्रस्थापित करतील,अशी आशा आजच्या ७४ व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त करू या…

माझ्या लेखाचे वाचक सर्व आदरणीय शिक्षक वृंद,सर्व पालकवर्ग आणि माझे प्रिय विदयार्थी बंधू – भगिनींनो माझ्या कडून सर्वांना प्रथमतः ७४ व्या स्वतंत्रता दिवसाच्या शुभेच्छा….!!!

जसे की आपण सर्वच जाणतो की स्वतंत्रता दिवस आपल्यासाठी किती अमुल्य आहे.आपण हे कधीच विसरू शकत नाही की आजच्या दिवशी आपला देश अन्यायकारी ब्रिटीश सरकारच्या गुलामगिरीतून मुक्त होवून स्वतंत्र राष्ट्राचे नागरिक बनलो होतो.पण खंत एकच आहे की,जगावर निर्माण झालेल्या कोरोना विषाणूच्या संकटामुळे आपण एकत्र येवून हा राष्ट्रीय सण दरवर्षीप्रमाणे साजरा करु शकत नाहीत.आजचा दिवस सर्व भारतीयांसाठी फार महत्वाचा आहे.हा दिवस भारताच्या इतिहासात सुवर्णाक्षराने कोरल्या गेला आहे.१४ आँगस्ट १९४७ रोजी पंडीत जवाहर लाल नेहरू यांनी सर्व भारतीयांना संदेश देण्याहेतू भाषण केले.ते म्हणाले सर्व जग झोपत आहे.आज मध्यरात्रीनंतर भारताच्या स्वातंत्र्याची पहाट होणार आहे.ब्रिटिशांशी संघर्ष करतांना आलेले यश त्यांच्या मुखातून मुक्तपणे संचारू लागले होते.आज स्वातंत्र्यतेनंतर भारत सर्वात मोठा लोकतांत्रिक देश आहे.

या देशात विविधतेमधे एकता आहे.सर्व जाती,धर्म,पंथ,भाषा,वेश यांची विविधता असतानाही सर्व भारतीय आम्ही एक आहोत हे मोठया उत्साहाने सांगतात.पारतंत्र्यात सामान्य माणसास सुंदर जिवन जगण्याचा शिक्षणाचा आणि आपल्या स्वातंत्र्यास उपभोगण्यास मनाई होती.ब्रिटीशांची वागणूक अत्यंत अमानुषतेची होती.ज्या वीर देशपुत्रांनी स्वातंत्र्यासाठी आपल्या प्राणाची आहूती दिली त्या विरपूत्रांना मी नमन करतो.त्यांच्या बलीदानासाठी आपण सर्व त्यांचे ऋणी आहोत.त्यांच्या कार्याची आठवण व्हावी यासाठी आपण दरवर्षी स्वतंत्रता दिन साजरा करतो.

सर्व स्वातंत्र्यता सेनानींच्या अथक प्रयत्नांनी आणि सर्व देशवासीयांच्या उत्कट ईच्छेमुळेच आपण हे महान स्वप्न पाहू शकलो.आज आपण मुक्तपणे श्वास घेवू शकतो.आपल्या पूर्वजांच्या बलीदानास आपण कधीच विसरू शकत नाही.त्यांना नमन करून आपण त्यांच्या कार्याचे आभार मानू शकतो.भारताचे स्वातंत्र्यतेचे स्वप्नं साकार झाले ते फक्त सर्व देशवासीयांच्या एक होवून इंग्रजांविरूध्द लढण्यामुळेच.आपण आपला हक्क मिळवू शकलो.त्यामुळे आपणही आपले सर्व हेवेदावे विसरून एकतेच्या सूराने आपल्या देशांस विकासाच्या दिशेने जलद गतीने वाटचाल करावयास समर्थ असावे.

महात्मा गांधीनी देशास अहिंसा आणि शांतीच्या महान मार्गाने आपले स्वातंत्र्य मिळवून दिले.त्यांचे कार्य इतिहासात प्रेरणेचा एक झरा मानला जातो.भारत आपणां सर्वांची मातृभूमी आहे.आपण या विशाल स्वतंत्र भारताचे नागरिक आहोत.आपल्या देशासमोर अनेक बिकट समस्या आहेत त्यामुळे त्या समस्यांना गंभीरपणे आणि एकतेच्या सूत्राने आपणांस समर्थपणे तोंड दयावे लागेल.

आपणां सर्वांना स्वातंत्र्यतेच्या खुप खुप शुभकामना.आशा करतो की,आपला देश प्रत्येक क्षेत्रात आपला विकास साधून जगात आपला एक आदर्श स्थापीत करेल.जयहिन्द!जयभारत !

✒️लेखक:-राजेंद्र लाड(शिक्षक)आष्टी,जि.बीड(मो.९४२३१७०८८५)