भारतीय ३१ सैनिकांना विक्टोरिया क्रॉस शौर्य पदक!

24

(द्वितीय विश्वयुद्ध समाप्ती दिन)

दुसरे महायुद्ध हे सन १९३९ ते १९४५ दरम्यान झालेले जागतिक युद्ध होते. हे युद्ध मुख्यतः युरोप व आशियामध्ये मित्रराष्ट्रे व अक्षराष्ट्रे यांच्यामध्ये झाले. जर्मनीने पोलंडवर केलेल्या हल्ल्याने हे युद्ध १ सप्टेंबर १९३९ रोजी अधिकृतपणे सुरू झाले. यानंतर फ्रान्स, युनायटेड किंग्डम आणि इतर राष्ट्रांनी जर्मनी विरुद्ध युद्ध पुकारले. जपानने व इटलीने जर्मनीच्या बाजूने युद्धात पदार्पण केले. सन १९४१च्या डिसेंबरमध्ये जपानने अमेरिकेच्या पर्ल हार्बर बंदरावर आक्रमण केल्यामुळे अमेरिकेला युद्धात उतरणे भाग पडले. त्याने युद्धात सक्रिय भाग घेतला व तेथून युद्ध जगभर पसरले. मित्र राष्ट्रांमध्ये चीन, रशिया, इंग्लंड, अमेरिका व इतर राष्ट्रांचा समावेश होता, तर अक्ष राष्ट्रांमध्ये जर्मनी, इटली व जपान हे देश होते. जवळ जवळ ७० देशांचे सैन्य यात सहभागी झाले होते. या युद्धात सहा कोटींच्यावर माणसे मेली. मानवी इतिहासातील ही सर्वांत मोठी जीवितहानी आहे. या युद्धामध्ये मित्रराष्ट्रे विजयाचे दावेदार ठरली.

युरोपमध्ये चाललेल्या या धुमश्चक्री दरम्यान जर्मन राष्ट्राकडून चालविण्यात आलेल्या वंश हत्येत साठ लाख ज्यू व्यक्तींचा बळी गेला. याला ज्यूंचे शिरकाण अथवा होलोकॉस्ट म्हणण्यात येते. युरोपमध्ये युद्धाला तोंड फुटण्यापूर्वी जपानने ७ जुलै १९३७ रोजी चीनवर आक्रमण केले. जपानचा रोख चीनमधून पूर्व आणि आग्नेय आशियावर स्वारी करत एकेक देश जिंकायचे होते. यात मिळालेल्या यशानंतर जपानने ७ डिसेंबर १९४१ या दिवशी अनेक राष्ट्रांवर एकाच वेळी हल्ला केला. याच दिवशी पर्ल हार्बर येथे अमेरिकेच्या नौदलावरही हल्ला चढवला गेला. याला प्रत्युत्तर म्हणून अमेरिकेने युद्धात उतरण्याचे निश्चित केले.दि.१ सप्टेंबर १९३९ रोजी जर्मनीने पोलंडवर आक्रमण केले.

जर्मनीचा नेता ॲडॉल्फ हिटलर व त्याच्या नाझी पक्षाने सोव्हियेत संघाशी त्यापूर्वी मैत्री-करार केला होता. त्यानुसार सोव्हियेत संघाने १७ सप्टेंबर रोजी पूर्वेकडून पोलंडवर चाल केली. याला प्रत्युत्तर म्हणून युनायटेड किंग्डम व फ्रान्सने जर्मनीविरुद्ध युद्ध जाहीर केले. सुरुवातीला हे युद्ध मुख्यत्त्वे सागरी युद्ध होते. काही महिन्यातच जर्मनीने पोलंड काबीज केले. त्यानंतर सन १९४०मध्ये जर्मन सैन्याने नॉर्वे, नेदरलँड्स, बेल्जियम व फ्रान्स पादाक्रांत केले. सन १९४१मध्ये युगोस्लाव्हिया आणि ग्रीसचा पाडाव केला. इटलीने उत्तर आफ्रिकेतील ब्रिटिश वसाहतींवर हल्ला केला. काही महिन्यांनी त्यांना जर्मन सैन्याची कुमक मिळाली. वर्षाच्या मध्यापर्यंत जर्मनीने बहुतांश पश्चिम युरोप आपल्या टाचेखाली आणले होते. परंतु युनायटेड किंग्डम जिंकणे त्यांना जमले नाही. याचे मुख्य कारण होते रॉयल एअर फोर्स व रॉयल नेव्हीने दिलेली कडवी झुंज! आता हिटलर सोव्हियेत संघावर उलटला व २२ जून १९४१ रोजी त्याने अचानक सोव्हियेत संघावर चाल केली. ऑपरेशन बार्बारोसा या सांकेतिक नावाने योजलेल्या या मोहिमेत जर्मनीला सुरुवातीला भरभरुन यश मिळाले.

वर्षाच्या शेवटी शेवटी जर्मन सैन्याने मॉस्कोपर्यंत धडक मारली. परंतु येथे ही मोहीम अडकून पडली. सोव्हियेत सैन्याने कडवा प्रतिकार करीत जर्मनीचा रेटा मोडून काढला. पुढे सोव्हियेत सैन्याने स्टालिनग्राडला वेढा घातला. त्यात बसलेल्या जर्मनीच्या सहाव्या सैन्यालाच प्रतिवेढा घालून पूर्ण सैन्याला युद्धबंदी बनवले. कुर्स्कच्या युद्धात सोव्हियेत सैन्याने जर्मनीचा प्रतिकार मोडून काढला व लेनिनग्राडचा वेढा उठवला. जर्मन सैन्याने अखेर माघार घेतली. लाल सैन्याने त्यांचा बर्लिनपर्यंत पाठलाग केला. बर्लिनमध्ये जर्मन सैन्याने व सामान्य नागरिकांनी घराघरातून सोव्हियेत सैन्याला झुंज दिली. मात्र प्रचंड प्रमाणात मिळत असलेल्या कुमकेच्या जोरावर सोव्हियेत सैन्याने बर्लिन जिंकले. याच सुमारास हिटलरने आपल्या भूमिगत बंकरमध्ये आत्महत्त्या केली होती, हे विशेष!

इकडे पाश्चिमात्य दोस्त राष्ट्रांनी सन १९४३मध्ये इटलीवर चाल केली. त्यापुढील वर्षी त्यांनी नॉर्मंडीच्या किनाऱ्यावर हल्ला केला व फ्रान्सला जर्मन आधिपत्यातून मुक्त केले. जर्मनीने चढवलेल्या प्रतिहल्ल्याला ऱ्हाईन नदीच्या किनाऱ्यावर बॅटल ऑफ दी बल्ज नावाच्या प्रसिद्ध लढाईत मित्रराष्ट्रांनी जबरदस्त उत्तर दिले. येथून आगेकूच करित त्यांनी जर्मनी गाठले आणि एल्ब नदीच्या किनाऱ्यावर पूर्वेकडून चालून आलेल्या सोव्हियेत सैन्याशी संधान बांधले. यावेळी जर्मनीच्या उरल्यासुरल्या सैन्याने शरणागती पत्करली व हार मान्य केली. पुढील सहा महिने जपानला घवघवीत यश मिळाले पण कॉरल समुद्राच्या लढाईत अमेरिकन नौसैन्याने त्यांचा प्रतिकार केला व मिडवेच्या लढाईत जपानने हार पत्करली. यात जपानच्या चार विमानवाहू नौका बुडवून अमेरिकेने जपानी नौसैन्याचा कणाच मोडला. येथून दोस्त राष्ट्रांनी जपानवर प्रतिहल्ला चढवला व मिल्ने बे व ग्वादालकॅनालच्या लढाईत त्यांनी विजय मिळवला. नैर्ऋत्य प्रशांत महासागरात विजयी ठरलेल्या मित्रराष्ट्रांनी मग प्रशांत महासागराच्या मध्यभागावर रोख धरून मोहीम काढली. यात जपानी सैन्याने त्यांचा कडवा प्रतिकार केला.

या मोहीमेदरम्यान फिलिपाईन समुद्राची लढाई, लेयटे गल्फची लढाई, इवो जिमा व ओकिनावाची लढाई, इ.अनेक भयानक सागरी युद्धे लढली गेली. या दरम्यान अमेरिकन पाणबुड्यांनी जपानकडे जाणारी रसद तोडण्यात यश मिळवले. याने जपानची आर्थिकदृष्ट्या कुचंबणा होऊ लागली. १९४५मध्ये दोस्त राष्ट्रांच्या वायुदलाने जपानवर अनेक वादळी हल्ले चढवले. मुख्यत्वे नागरी वस्त्या व कारखान्यांवर झालेल्या या हल्ल्यांनी जपानची युद्धप्रवण राहण्याची शक्ती कमी झाली. अखेर ६ ऑगस्ट १९४५ रोजी अमेरिकेने जपानच्या हिरोशिमा शहरावर परमाणु बॉम्ब टाकला. ९ ऑगस्टला अमेरिकेने नागासाकी शहरावर असाच हल्ला केला. जोवर जपान शरण येत नाही तोवर एकेक करत जपानी शहरे बेचिराख करण्याची धमकी दिली. जपानने दि.१५ ऑगस्ट १९४५ रोजी बिनशर्त शरणागती पत्करली व दुसऱ्या महायुद्धाचा अधिकृतरीत्या अंत झाला.मित्र राष्ट्रांच्या विजयात भारतीय सैनिकांचा मोठा वाटा आहे. या सैनिकांनी युरोप, आफ्रिका आणि पूर्व आशियात अनेक मोहिमांमध्ये भाग घेतला आणि ब्रिटिशांना विजय मिळवून दिला.

ब्रिटीश भारताच्या सुमारे ४,००० सैनिकांना त्यांच्या पराक्रमासाठी शौर्य पदके मिळाली. त्यातील ३१ सैनिकांना विक्टोरिया क्रॉस हे सर्वोच्च शौर्य पदक मिळाले. भारत स्वतंत्र झाल्यावर या पदकाचे रुपांतर परम वीर चक्रामध्ये करण्यात आले.

!! पुरोगामी संदेश परिवारातर्फे यानिमित्त समस्त बंधुभगिनींना विश्वशांतीस्तव हार्दिक शुभेच्छा !!

 ✒️संकलन:-निकोडे कृष्णकुमार गोविंदा. (जागतिक व भारतीय इतिहासाचे गाढे अभ्यासक.)मु. पो. ता. जि. गडचिरोली. मधुभाष- ७७७५०४१०८६.