एसडीओंच्या लेखीआश्वासनाने शेतकरी महिलेचे उपोषण मागे

23

✒️सिध्दार्थ ओमप्रकाश दिवेकर(तालुका प्रतिनिधी,उमरखेड)मो:-9823995466

उमरखेड(दि.16ऑगस्ट):- तहसिल आवारातील जप्तीच्या ट्रॅक्टरमधील बॅटरीसह साहित्य काढल्या बदल तसेच अपमानास्पद वागणूक दिल्या बद्दल तहसिलदार व त्यांच्या शासकिय वाहनाच्या चालकाविरुद्ध पोलीस कार्यवाही करावी या मागणीसाठी ब्राम्हणगांव येथील महिला शेतकरी अन्नपूर्णा बनसोड यांनी दि. १४ ऑगस्ट रोजी उपविभागिय अधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषण सुरु करताच अप्पर जिल्हाधिकाऱ्यांनी चौकशी करून अहवाल सादर करण्याच्या दिलेल्या निर्देशावरून उपविभागिय अधिकारी डॉ. व्यंकट राठोड यांनी नियमानुसार योग्य कार्यवाही करण्याचे लेखी आश्वासन दिल्याने अन्नपूर्णा बनसोड यांनी आपले उपोषण मागे घेतले आहे.

घरा समोरील खड्डे बुजविण्यासाठी स्वत:च्या मालकीच्या ट्रॅक्टरने मुरूम आणित असतांना १ जुलै रोजी तहसिलदारांनी ट्रॅक्टर जप्त करून तहसिल आवारात लावले असे तक्रारीत नमुद करून त्यानंतर झालेल्या दंडात्मक कार्यवाही पोटी दि १९ जुलै रोजी श्रीमती बनसोड यांनी १लाख ७ हजार ७७५ रुपये दंडाची रक्कम शासन खजिन्यात जमा केल्यावर ट्रॅक्टर सोडण्याबाबत गेली असता तहसिलदारांनी अपमानास्पद वागणूक देऊन धुडकावून लावले व त्यानंतर दि . २८ जूलै रोजी तहसिलदार आनंद देऊळगावकर यांच्या शासकिय वाहनाच्या चालकाने त्यांच्या म्हणण्यानुसार ट्रॅक्टरची बॅटरी व इतर साहित्य काढले त्यावरून त्यावेळचे सीसीटीव्ही फूटेज तपासून त्या दोघांविरुद्ध पोलीस कार्यवाही करावी अशी तक्रार जिल्हाधिकारी व जिल्हा पोलीस अधिक्षकांकडे दि. ३० जुलै रोजी पाठवताच बॅटरी व साहित्य ट्रॅक्टर मध्ये टाकल्यानंतर नायब तहसिलदार डांगे यांनी पंचनामा केला.
हा प्रकार केवळ सावरासावर करण्यासाठी व माझी तक्रार खोटी ठरविण्यासाठी केला असल्याने खोटारड्या तहसिलदाराविरुद्ध योग्य कार्यवाही करून त्यांची हकालपट्टी करावी अशी मागणी उमरखेड भेटीत जिल्हाधिकारी अमोल येडगे यांना प्रत्यक्ष भेटीत करून योग्य कार्यवाही न झाल्यास १४ ऑगष्ट रोजी उपोषणास बसण्याचा इशाराही दिला होता. या उपोषणाला भीम आर्मी तथा आझाद संघटनेने पाठींबा दिला होता.अन्यायग्रस्त महिलेला न्याय मिळावा यासाठी निळकंठ धोबे, डॉ. आयूबखाँ पठाण प्रयत्नरत होते.

उपोषणास बसलेल्या महिलेच्या तक्रारीची चौकशी करून अहवाल सादर करावा असे निर्देश जिल्हाधिकारी यवतमाळ यांनी दिल्यावरून सदर प्रकरणात नियमानुसार योग्य ती कार्यवाही करण्यात येईल असे लेखी आश्वासन उपविभागिय अधिकारी डॉ .व्यंकट राठोड यांनी दिल्यामुळे त्यांचे उपोषण मंडपात प्रतिनीधी म्हणून आलेले नायब तहसिलदार वैभव पवार , बिराजदार यांच्या हस्ते सरबत घेऊन अन्नपूर्णा बनसोड यांच्या उपोषणाची यशस्वी सांगता झाली . तत्पूर्वी उपविभागिय अधिकाऱ्यांनी उपोषण मंडपात येण्यास नकार देत अन्यायग्रस्त महिलेच्या वतीने चर्चेसाठी पाचारण केल्यानंतर पत्रकार विलासराव चव्हाण , संतोष मुडे, वसंतराव देशमुख , यांच्या सोबत चर्चा करून राष्ट्रीय सणाच्या पूर्वसंध्येला उपोषण सोडविण्यास सहकार्य करावे असे म्हटले असता विलासराव चव्हाण यांनी देशाच्या सीमेवर कर्तव्यावर असलेल्या सैनिकाच्या अन्यायग्रस्त आईला न्याय मिळावा यासाठी प्रशासनाला चांगलेच धारेवर धरले होते . उमरखेडखंड २ चे तलाठी दत्तात्रय दुर्केवार यांनी उपोषण सोडविण्यासाठी महत्वाची भूमिका बजावली.

यावेळी पत्रकार राजू गायकवाड, दत्तात्रय काळे, अजहरउल्ला , खान , प्रबोधन चे संपादक शिवाजीराव माने , सुधाकर लोमटे, चातरीचे माजी सरपंच चेतन पतिंगराव ,शेख निसार , शेख जमिर सतिश कोल्हे , दिगंबर मनवर , आदिंची उपस्थिती होते.