लोककवी वामनदादा कर्डक यांनी संवैधानिक मुल्यांचा विस्तार करणारी गीतरचना केली – प्रा शरद शेजवळ

    44

    ✒️अनिल साळवे(गंगाखेड प्रतिनिधी)

    गंगाखेड(दि.17ऑगस्ट):-माणसांचा सर्वांगीण विकास हा वामनदादा कर्डक यांच्या गीतांचा केंद्रबिंदू होता. सर्व प्रकारच्या शोषणाविरुद्ध त्यांनी मानव मुक्तीचा आवाज बुलंद केला. आपल्या गीतांतून त्यांनी राष्ट्रवाद पेरला. समस्त भारतीयांना जोडणारा दूवा म्हणजे भारतीय संविधान आहे. संविधानानेच भारतात लोकशाहीचे बिजारोपण केले आहे. इथली व्यवस्था संविधान अनुकूल व्हावी म्हणून दादांनी इथल्या विषमतेवर संवैधानिक मार्गाने सम्यक प्रहार केले. लोककवी वामनदादा कर्डक यांनी संविधान मुल्यांचा विस्तार करणारी गीतरचना केली. असे विचार प्रा शरद शेजवळ यांनी व्यक्त केले. गंगाखेड येथे आयोजित महाकवी वामनदादा कर्डक ऑनलाईन जयंती उत्सव कार्यक्रमात ते प्रमुख वक्ते म्हणून बोलत होते. अध्यक्षस्थानी आयोजक ज्येष्ठ समाज सेवक विलासराव जंगले आण्णा हे होते.

    या कार्यक्रमाच्या सुरुवातीस महाकवी वामनदादा कर्डक यांच्या प्रतिमेस विलासराव जंगले आण्णा यांनी पुष्पहार अर्पण केला. नंतर सामुहीक वंदना घेण्यात आली. प्रथम प्रा भगवानराव गायकवाड यांनी वामनदादा कर्डक यांच्या कार्याचे महत्व सांगणारे जोशपूर्ण गीत सादर केले. तसेच दादांचे – ‘ दीनांच्या चाकरीसाठी तुझे इमान मागावे ‘ हे गीत सादर केले. या दोन्ही गीतांना उपस्थितांनी टाळ्यांचा गजर करून प्रतिसाद दिला.
    ‘ वामनदादा कर्डक यांच्या गीतातील राष्ट्रवाद ‘ या विषयावर प्रा शरद शेजवळ यांनी वामनदादा कर्डक यांचे जन्मगाव देशवंडी ता सिन्नर जि नाशिक येथून विचार मांडले. व्याख्यानात त्यांनी – ‘ वंदन माणसाला , हे भारत भू च्या मूला , तुझ्या हाती तूप आले.

    कुणी मतासाठी विकतो , जहाँ जीत लेंगे , भीमाच्या ग्रंथात पाहिला नवा भारत ‘ इ.अनेक गीतांचे सुरेल गायन करून त्यांचे स्पष्टीकरण केले. अशा अनेक गीतांमधून वामनदादा कर्डक यांनी प्रखर राष्ट्रवाद मांडला. पण इथल्या तथाकथीत समिक्षकांनी मात्र त्यांच्या राष्ट्रीय भावना प्रकट करणाऱ्या गीतांची दखल घेतली नाही असे ते म्हणाले. लोककवी वामनदादा कर्डक यांच्या राष्ट्रवाद व्यक्त करणाऱ्या शाहीरीचा जास्तीत जास्त प्रचार प्रसार या जन्म शताब्दी वर्षात व्हावा असे ते म्हणाले.
    अध्यक्षीय समारोपात कार्यक्रमाचे संयोजक व ज्येष्ठ समाजसेवक विलासराव जंगले आण्णा यांनी महाकवी वामनदादा कर्डक यांच्या सहवासातील अनेक आठवणींना उजाळा दिला. दांदांचा १९९७ ला केलेला अमृत महोत्सवी सत्कार , कलावंतांचा गौरव तसेच दादांच्या उपस्थितीत संपन्न झालेले इतर कार्यक्रम याविषयी त्यांनी आठवणी सांगितल्या.

    महाकवी वामनदादा कर्डक यांच्या जयंती उत्सवाचे संस्थापक व संयोजक तसेच दादांच्या खंडाळी येथील अस्थी स्मारकाचे निर्माते म्हणून केलेल्या कार्याची त्यांनी सविस्तर माहिती दिली. महाकवी वामनदादा कर्डक यांच्या संपर्कात आल्याने माझ्या जीवनाचे सोने झाले असे ते म्हणाले. भविष्यात देखील दादांच्या जयंतीचा कार्यक्रम अखंडीत चालू राहील असे ते म्हणाले. तसेच या ऑनलाईन कार्यक्रमाचे अतिशय सुरेख व्यवस्थापन केल्याबद्दल त्यांनी पंकज भटकर यांचे अभिनंदन केले !
    या कार्यक्रमाचे सुत्रसंचलन ॲड संदीप थोरात यांनी केले. कार्यक्रमाचे तांत्रिक व्यवस्थापन पंकज भटकर यांनी केले.

    प्रास्ताविक गोपीनाथ कांबळे यांनी केले. वक्त्यांचा परिचय प्रा मिलींद गुंजाळ यांनी करून दिला. तर लक्ष्मण व्हावळे यांनी आभार व्यक्त केले. प्रा किर्तीराज लोणारे यांच्या सरणंतय गाथेच्या पठनाने कार्यक्रमाचा शेवट करण्यात आला.
    या ऑनलाईन कार्यक्रमात ॲड शाम तांगडे , डॉ गणेश सुर्यवंशी , संजय हातागळे , डॉ विनोद जोगदंड , संविधान थोरात , डॉ अशोक साबणे , डॉ पाईकराव , डॉ विलास साबणे , प्रा डॉ किर्तीकुमार मोरे , विक्रम कांबळे , माने साहेब , तुकाराम खिल्लारे , दुर्गानंद वाळवंटे , राम सावंत , रावसाहेब मस्के , संतराम गायसमुद्रे , नितिन वाकळे , चंद्रगुप्त घनसावंत , गुणवंत कांबळे , संग्राम गायकवाड , गोपीनाथ भालेराव , बाळासाहेब जंगले , राहुल गायकवाड , सुभाष शिंदे , नरेंद्र मस्के , यशवंत मस्के , सिद्धार्थ कांबळे ,राहूल साबणे आदींसह विविध जिल्ह्यातील बंधु-भगीनींचा मोठ्या प्रमाणात सहभाग होता.