खरचं,बापूजी आज असते तर….

    44

    मोहनदास करमचंद गांधी (ऑक्टोबर २, इ.स.१८६९ – जानेवारी ३०,इ.स. १९४८) हे भारताच्या स्वातंत्र्य संग्रामातील प्रमुख नेते आणि तत्त्वज्ञ होते.महात्मा गांधी या नावाने ते ओळखले जातात.अहिंसात्मक असहकार आंदोलनांनी गांधींनी भारताला स्वातंत्र्य मिळवून दिले.अहिंसात्मक मार्गांनी स्वातंत्र्य मिळवण्यासाठी त्यांनी संपूर्ण जगाला प्रेरित केले.रवींद्रनाथ टागोर यांनी सर्वप्रथम त्यांना ‘महात्मा’ (अर्थ: महान आत्मा) ही उपाधी दिली.भारतातील लोक त्यांना प्रेमाने बापू म्हणत आणि त्यांना भारताचे राष्ट्रपिता म्हटले जाते.सुभाषचंद्र बोस यांनी इ.स. १९४४ मध्ये पहिल्यांदा त्यांना ‘राष्ट्रपिता’ असे संबोधले,असे म्हणतात.गांधी सविनय सत्याग्रहाच्या कल्पनेचे जनक होते.त्यांचा जन्मदिवस २ ऑक्टोबर हा भारतात गांधी जयंती म्हणून तर जगभरात आंतरराष्ट्रीय अहिंसा दिन म्हणून साजरा केला जातो.खरचं,बापूजी आज असते तर….आजच्या जगावरील संकटात मार्ग दाखविणाऱ्या नैतिक नेतृत्वाचा जगात अभाव आहे असे मला वाटते.त्यामुळेच तर उत्तर इतरत्र शोधायला हवं.तेंव्हा महात्मा गांधींजी (बापूजी) आज असते तर….!!!

    आजचे जगावरील संकट मोठे आहे.कोविड ची साथ,आर्थिक मंदी आणि धोक्यात टाकणारे पर्यावरणीय बदल.बापूजी समोर आजचं आव्हान उभं असतं तर त्यांनी काय केलं असतं? ते त्यांनी स्वत:च सांगून ठेवलं आहे.‘माझं जीवनच माझा संदेश आहे’! त्यामुळे आपल्याला बापूजींचं उत्तर त्यांच्या जीवनात शोधावं लागेल.त्यांच्या उत्तरात काही वैशिष्टय़ं समान असतील.एक,ते दुसऱ्यांना उपदेश करण्याऐवजी प्रथम स्वत:कृतीत उतरवतील.आपण बोलू शकतो का? बोलून बघा.जीभ रेटत नाही.दुसरं,ते कोणतीही कृती प्रथम स्थानिक पातळीवर सुरू करतील.जग बदलायला त्याच्या मागे जगभर धावणार नाहीत.मातीच्या एका कणामध्ये पृथ्वी बघू शकण्याची दृष्टी त्यांच्याजवळ होती.मी जिथे आहे ती जागा माझा स्वदेश आहे.माझी कृती इथेच सुरू होणार. कारण मी फक्त इथेच कृती करू शकतो.त्यांची कृती सुरुवातीला तरी क्षुल्लक व बालिश वाटेल,उदाहरणार्थ,मूठभर मीठ उचलणे किंवा सूत कातणे.पण थोडं थांबा,त्यामुळे इतिहास बदलेल.तुम्ही आज काय केलं असतं?असा प्रश्न बापूजींना टाकण्याचा विचार करून पाहिला,तेव्हा खालील उत्तरे मिळाली ती अशी……

    आज विषाणूची भीती ही विषाणूपेक्षा फार व्यापक पसरली आहे.बापूजी सर्वात प्रथम आपल्याला सांगतील,निर्भय व्हा.एक तर भीती ही माणसाला बलहीन करणारी घातक भावना आहे.दुसरं,कोरोना विषाणूमुळे मृत्यूची भीती लोकसंख्येमधील प्रत्येकाला अत्यंत अल्प आहे.तिचा बागुलबुवा करू नका.त्यांचा अंतिम तर्क राहील,मृत्यूची भीती कशाला? कुणाला? शरीर मेले तरी आत्मा अमर आहे.तुला मृत्यू नाही.भय हे काल्पनिक,असत्य असल्याने ते आपोआप विरघळून नाहीसं व्हायला लागेल.त्यामुळे प्रत्येकाने भयमुक्त व्हावे.रोग्यांची सेवा ही बापूजींची स्वाभाविक वृत्ती होती.बापू कडून आश्रमातील रोग्यांची शुश्रूषा करण्यात ती वेळोवेळी प्रकट झाली.कुष्ठरोग झालेल्या विकलांग लोकांना आपल्या कुटीशेजारी ठेवून त्यांनी स्वत: केलेली शुश्रूषा हे त्याचंच उदाहरण.आजा बापूजी आसते तर त्यांनी कोरोनाग्रस्त रुग्णांची काळजी घ्यायला स्वत: पासून सुरुवात केली असती.ती करताना स्वच्छता,हात धुणे,मुखपट्टी वापरणे या सर्व वैज्ञानिक सूचनांचे काटेकोर पालन करत त्यांनी प्रत्यक्ष रुग्णसेवा केली असती.म्हणून रुग्णसेवा ही ईश्वर सेवा समजून प्रत्येकाने ती केली पाहिजे.

    कोविडकाळात सेवेचा पुरवठा करण्यास वैद्यकीय व्यवस्था अपुरी ठरत आहे.अशा स्थितीत बापूजींनी निरोगी जीवनशैलीचा आग्रह,स्वत:चे आरोग्य स्वत: सांभाळण्याची क्षमता आणि शक्यतो स्वत:च्या ग्रामसमूहामध्येच उपचाराची सोय अशा आरोग्य व्यवस्थेला सूचना केल्या असत्या.कोविडच्या साथीवर आरोग्य-स्वराज्य हे उत्तम उत्तर आहे.आणि तरी,अतिगंभीर निवडक रोग्यांना बापूजींनी रुग्णालयात पाठवलं असतं.मुख्य म्हणजे,व्यसनांना त्यांचा विरोध जगजाहीर आहे.बापूंची र्निव्यसनी जीवनपद्धती कोरोनाविरुद्ध प्रभावी उपाय आहे,शिवाय ती इतर रोग व मृत्यूही कमी करेल.कर्तव्यासाठी बापूंनी दिलेली जादूची कांडी जगप्रसिद्ध आहे.कोरोनामुळे लादलेल्या सार्वत्रिक बंदीमुळे जे शहरात बेकार व नकोसे झाले आणि परत आपल्या गावाकडे जायला सिद्ध झाले,पण ज्यांची परतीची साधनेदेखील शासनाने बंद केली,त्यामुळे जे माणसांचे लोंढे हजारो किलोमीटर पायी निघाले,ते उपाशी,थकलेले,तहानलेले,चालणारे मजूर.आज बापू असते तर ते दिल्ली सोडून या स्थलांतरितांमध्ये गेले असते.

    त्यांना अन्न,औषध व निवारा देण्याची व्यवस्था केली असती.पण त्याहून महत्त्वाचं,त्यांचा आत्मसन्मान व आशा त्यांनी जिवंत ठेवली असती.या विस्थापित मजुरांसोबत एकता व्यक्त करायला व शासनाच्या निर्दय बेजबाबदारीचा निषेध व्यक्त करायला बापू आज त्या विस्थापितांसोबत चालले असते आणि दुसरी दांडी यात्रा सुरु झाली असती.गांधींच्या जीवनातील हे शेवटचं,पण अपुरं राहिलेलं कार्य आहे.भारतातील हिंदू व मुस्लीम यांच्यातील परस्पर द्वेष व हिंसेमुळे ते मरणप्राय दु:खी झाले होते.आतादेखील कोरोना विषाणू जेव्हा भारताच्या दारावर येऊन ठाकला,तेव्हा भारतातील काही नेते धर्मद्वेष पेटवण्यात मग्न होते.भारतात कोरोनाच्या प्रसाराचे खापर एका विशिष्ट धार्मिक पंथाने केलेल्या चुकीवर फोडण्याचा प्रयत्न केला गेला.चूक तर प्रत्येकाने केली.कोरोना भारतात पोहोचल्यावर जवळपास एक महिन्यानंतर अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या स्वागतासाठी अहमदाबादमध्ये लाखभर माणसांची गर्दी गोळा करण्यात आली होती.

    पण चुकांमध्येदेखील धार्मिक भेदभाव केला गेला.अशा स्थितीत बापुजींनी ही समस्या विषाणूइतक्याच प्राथमिकतेने घेतली असती.आपला सर्वधर्मसमभाव व सर्वत्रच ईश्वर वसलेला आहे ही खरी भारतीय निष्ठा त्यांनी प्रत्यक्ष वर्तनातून प्रकट केली असती.कोणताच भेद न करता लोकांची सेवा केली असती.त्यांना एकमेकांच्या वस्तीत जाऊन सेवा करायला पाठवलं असतं.प्रार्थना करायला एकत्र आणलं असतं.आजच्या या विदारक समाजातून पुन्हा एक समाज निर्माण करण्याचा प्रयत्न केला असता.आज कोरोनाने प्रत्येकालाच एकटं करून टाकलं आहे.सगळेच एकमेकांच्या संपर्काला घाबरत आहेत,टाळत आहेत.संपर्काशिवाय शेजार कसा? आणि शेजार नसेल तर सामूहिकता कशी,समाज कसा?बापूजींनी सध्याचे शासकीय व मानसिक कोंडवाडे मान्य करणं नाकारलं असतं.शेजाऱ्याची काळजी घेणं हा माझा धर्म आहे,असा सत्याग्रह केला असता.घट्ट स्थानिक बंध असल्याखेरीज राष्ट्र बनू शकत नाही,ते असे ठणकावून म्हणाले असते.अशी नैतिक भूमिका घ्यायला एखादा बापूजी लागतो.

    रोगप्रसार टाळण्याची पूर्ण काळजी घेत त्यांनी शेजाऱ्याची काळजी घ्यायला सुरुवात केली असती.आपल्याला स्वच्छ दिसू लागतं की,महामारीची भीती व शासनाची नीती यामुळे माणसाने माणसाला दूर केल्याने कोरोनाचा प्रसार थांबला नाही.पण प्रत्येकाला अस्पृश्य करून टाकलं हे महत्त्वाचे.
    कोरोनाच्या साथीला तोंड देताना आजच्या नेतृत्वाने अनेक चुका केल्या.यामुळे कोरोना भारतात शिरला.या चुंकामुळे १३४ कोटींना टाळेबंदीची शिक्षा मिळाली.कोरोनाविरुद्धच्या या युद्धात जागतिक व राष्ट्रीय नेतृत्वाने आपले घोषित ध्येय वारंवार बदलले – विषाणू प्रवेश नको,मग कंटेन्मेंट,मग रोगीसंख्या दुप्पट होण्याची वेळ लांबवणे,मग मृत्यूची संख्या मर्यादित ठेवणे व आता कोरोनासोबत जगायला शिका,अपयश आले की ध्येयच बदलून यशाचा दावा सुरूच.एका नव्या रोगाविषयी पुरेसं ज्ञान व उपाय नसल्याने निर्णयात चुका होणं स्वाभाविक आहे.पण आमचा उपाय साफ चुकला ही प्रामाणिक कबुली कुठे आहे? बापूजींनी ते सत्य जाहीर केलं असतं.ते जनतेशी खरे बोलले असते.माझी हिमालयाएवढी चूक झाली अशी जबाबदारी घेतली असती.आश्चर्य म्हणजे,त्यामुळे लोकांनी त्यांच्यावर आणखी जास्त विश्वास ठेवला असता.तेंव्हा चुकीची कबुली देणे हे सुद्धा महत्त्वाचे आहे पण हे घडतांना सध्यातरी दिसत आहे.जो तो उठतो आणि जिभेला हाड नसल्यागत माझचं खरे आहे असे सांगत सुटतो.कृती मात्र शुन्यचं.

    वुहानमध्ये एक विषाणू जन्मला आणि जागतिक अर्थव्यवस्था पुन्हा धोक्यात आली.बापुजी यावर स्मरण करून देतील की,स्थानिक उत्पादन,स्थानिक उपयोग व परस्पर संबंधांचे स्थानिक छोटे समूह हे अधिक स्थिर व मानवीय प्रारूप आहे.त्याला ते ग्राम-स्वराज म्हणायचे.परावलंबन आलं की स्वातंत्र्य धोक्यात येतं.त्यामुळे आज बापूजींनी स्थानिक,शक्यतो स्वयंपूर्ण अशी अर्थरचना सुचवली असती.जो दुसऱ्यावर विसंबला त्याचा कार्यभाग उगाच असे म्हणत नाहीत.अर्थरचनेत महाकाय ऐवजी स्थानिक असा बदल आला तर त्यासोबत राजकीय व प्रशासकीय सत्तादेखील विकेंद्रित होईल.जागतिकीकरणामधून सर्वत्र हुकूमशाही प्रवृत्तीचे राजकीय नेते उदयाला आले आहेत.भांडवलशाही व उदारवादाने आश्वासन दिलेल्या स्वातंत्र्याऐवजी या नेत्यांनी नागरी-स्वातंत्र्य व माध्यम-स्वातंत्र्य आक्रसून लोकांना भयग्रस्त केलं आहे.पण कोविडच्या महामारीने ही जागतिक सत्ताव्यवस्था किंवा अर्थव्यवस्था प्रश्नांकित केली आहे.कोणतीच केंद्रित सत्ता आपल्याला वाचवू शकत नाही,ती केवळ खोटे दावे करते हे लोकांनी अनेक देशांमध्ये अनुभवलं आहे.

    बापू आपल्याला अहिंसकपणे,हळुवारपणे या महाकाय,राक्षसी अर्थ-राजकीय व्यवस्थेपासून छोटय़ा-छोटय़ा स्थानिक समूहांच्या मानवीय व्यवस्थेकडे घेऊन गेले असते.खरी नाती व खरी लोकशाही बिनचेहऱ्याच्या वैश्विक व्यवस्थेपेक्षा एकमेकांना ओळखणाऱ्या स्थानिक माणसांच्या समुदायांमध्येच फुलू शकते हे सिद्ध करुन बापूनीं दाखविले असते.मग आमच्या गरजांचे काय झाले असते.तेंव्हा बापूजींनी त्यांनी समजवून सांगितले असते,कधीही तृप्त न होणारी उपभोगाची इच्छा,इंद्रियांना २४ तास उत्तेजित करून सुखाचा आभास भोगण्याची मागणी ही तुमची नैसर्गिक गरज नसून तुमच्यामध्ये कृत्रिमरीत्या रोवलेली अनैसर्गिक सवय आहे.महाकाय उत्पादन व्यवस्था व बाजार यांच्या वाढीसाठी तुम्ही अनिवार उपभोग करणे आवश्यक आहे.वस्तुत: तुम्ही उपभोग करत नाही,तुम्ही उपभोगले जाता.क्षणभर थांबून शांतपणे आत डोकावून बघा.यापैकी किती उपभोग हे तुमच्या शरीर,मन,बुद्धीला निरोगी व सक्रिय ठेवण्यासाठी आवश्यक आहेत? आणि किती कृत्रिम सवयी? लोभ? हा पृथ्वीतल सर्वाच्या आवश्यकतांसाठी पुरेसे आहे,लोभाला पृथ्वी अपुरी पडेल,असं बापूजीं म्हणाले होते.आवश्यकता व लोभ यांत विवेक करण्याची शक्ती,प्रत्येकाच्या गरजा पूर्ण करणारी,पण लोभाला नियंत्रणात ठेवणारी समाज व्यवस्था व नैतिकता या दिशेने बापूजी आपल्याला घेऊन आज गेले असते.

    स्वराज्याची व्याख्याच त्यांनी अशी केली होती की,स्वत:चे राज्य नव्हे,स्वत:वर राज्य.जेव्हा आपण विवेकाने आपल्या गरजा मर्यादित करू,अफाट उत्पादन व अनावश्यक उपभोग कमी करू,तेव्हा आपल्याला अनुभव येईल की,आधुनिक समाजातील अनेक अतिरेकांविना आपण आनंदाने जगू शकतो.कोविडकाळातील टाळेबंदीच्या दरम्यान आपण याची थोडीशी झलक पाहिली आहे आणि एवढेच नव्हे तर त्याबरोबर ग्लोबल वार्मिगदेखील कमी व्हायला लागेल.शेवटची कृती जी गांधीजी स्वत: करतील व आपल्याला करायला सुचवतील,ती असेल प्रार्थना.रोज दिवसाच्या अंती,आपले सर्वोत्तम प्रयत्न करून,सर्व शक्ती व शक्यता वापरून झाल्यावर आता थोडा वेळ शांत बसा.अंतर्मुख व्हा,नम्र व्हा आणि शरण जा.कुणाला शरण जा? ते तुमच्या मर्जीवर आहे.

    ईश्वराला,निसर्गाला,जीवनाला,सत्याला,काळाला,तुम्हाला जे भावेल त्याला शरण जा.जे जे शक्य आहे ते सर्व प्रयत्न तुम्ही केले आहेत.आता यापुढे ते ओझे आपल्या पाठीवर वाहू नका.माणसाला कर्तृत्वाचे व अपेक्षांचे निर्थक व घातक ओझे आपल्या पाठीवरून उतरवून स्वतंत्र होता आलं पाहिजे.यालाच बापूजी शरण जाणे व प्रार्थना म्हणतात.विश्वाच्या अनंत पसाऱ्यात आपल्या अहंकाराची व प्रयत्नांची क्षुद्रता लक्षात घ्या.आता त्याच्या मर्जीने होऊ द्या,म्हणजेच शेवटी जे होईल ते स्वीकार करा.खरचं,आज महात्मा गांधीजी (बापूजी) असते तर….जावू द्या,बापूजी परत येण्याची वाट न बघता,त्यांनी परत येऊन जे केलं असतं ते आपण सुरू केलं पाहिजे.हेच या लेखातून अभिप्रेत आहे.बापूजींच्या स्मृतीस आजच्या दिनी विनम्र अभिवादन.

    ✒️लेखक:-राजेंद्र लाड(शिक्षक)आष्टी,जि.बीड(मो.९४२३१७०८८५)