काय असते हो ‘संवेदना’…!

35

कारण एक घडले, लेख लिहण्यासाठी मला ते पुरेसे ठरले. काही नाही हो! झाले असे- माझ्या बायकोच्या माहेरी एका गरीब घरच्या बाईने तिच्या छोट्या मुलासाठी परिधान करायला तुमच्याकडे कपडे आहेत का म्हणून विचारणा केली. त्या स्त्रीचा छोटा मुलगा म्हणजे माझ्या छोट्या मुलाएवढाच! म्हणजेच साधारणपणे दीड वर्षांचा असेल. ‘गरीब’ हा शब्द मला सहसा वापरू वाटत नाही; पण दारिद्र्यरेषा गरिबीच सांगत असल्यामुळे नाईलाजाने वापरतो. मुळात आर्थिक हिशोबाने कोणी कमजोर असेल तर त्याला ‘गरीब’ म्हणणे, हे तर मला त्यांना हिनवल्यासारखेच वाटते. असो! जे आहे ते आहे. जात-पात, भेदभाव नको म्हटले तरी कागदोपत्री आहेच; आणि नकळत व्यवहारातही येतेच, नेमके तसेच!

मग मी व माझ्या पत्नीने माझ्या छोट्या मुलाचे जुने कपडे त्या स्त्रीला द्यायचे ठरवले. तसा दीड वर्षांचा माझा मुलगा असल्याकारणाने ते किती जुने झाले असतील? याचा ताळमेळ मला काही जमला नाही; नाही! कळलाच नाही. पण, बायकांना तो बरोबर जमतो. त्यामुळे माझ्या मुलाचे निदान 7- 8 ड्रेस जुन्या संवर्गानुसार बाहेर निघाले. त्यातले 3-4 तर त्याने एकदाही घातले नसतील. फक्त काही दिवस न वापरल्यामुळे ते छोटे झाले,आणि म्हणायला जुने! जे त्या बाळाला येणार होते; आणि म्हणायला नवे.मुळात मला हा प्रयोग करून मोठेपणा अजिबात मिरवायचा नाही बरं! जुने कपडे देण्यात कसला आला मोठेपणा! नवीन असते तर गोष्ट थोडी वेगळी होती. आणि बरेच जण असे करतात, तुम्हीही केले असेलच.

हे करत असताना सोशल मिडियाच्या जमान्यात मला एक कल्पना सुचली, अर्थात ती कल्पना माझी नव्हतीच! असेल कोण्यातरी संवेदनशील माणसाची. आपण असे म्हणू, मला ती आठवली. काय होती ती आठवण? आपण स्वतः सोशल प्लॅटफॉर्मवर विशेषतः व्हाट्सअप्पच्या माध्यमातून आपले वैयक्तीक व्हाट्सएप स्टेटस व वेगवेगळ्या ग्रुपच्या माध्यमातून एक मेसेज व्हायरल करू. त्यात लोकांना त्यांच्या बाळांचे वापरात नसलेले कपडे गरजूंना द्या! म्हणून आवाहन करू, असा विचार मी केला; तसा तो कृतीत उतरविलाही! लोकांचे साधक-बाधक मेसेजस व फोन कॉल्स मला आले. जे ज्यांच्या-त्यांच्या सोयीने बरोबर होते. मी केलेल्या आवाहनावरची त्यांची ती प्रतिक्रिया तथा त्यांचा पूर्वानुभव होता. कोणाला माझे म्हणणे पटत होते, तर कोणाला नाही. मी सर्वांच्या मतांचा आदर केला, व त्यांना सकारात्मक प्रतिसाद दिला. त्यात हा, ‘मदत करण्याचा’ मेसेज मी टाकल्यामुळे माझे एक मित्र मला ”तुम्ही खूपच संवेदनशील आहात!” असे म्हटले. सुरुवातीला मला तो टोला वाटला; पण ज्या व्यक्तीने हा प्रतिसाद दिला त्यांच्याकडे पाहून मला तो प्रतिसाद आपला वाटला. कारण तो व्यक्ती माझ्या विचारांशी जुळणारा माणूस होता. आणि माझ्यासाठी ते आदरणीय आहेत. परंतु, त्यांनी मला असे ‘संवेदनशील’ म्हटल्यामुळे माझी जबाबदारी आणखी वाढली. मी स्वतःशीच प्रश्न केला, की मी खरंच संवेदनशील आहे का? असेल तर कितपत? किती नागरिक संवेदनशील असतील? मुळात किती लोकांना संवेदना म्हणजे नेमके काय हे माहिती तरी आहे की नाही? असे बरेच प्रश्न माझ्या मनात निर्माण होत होते.

आता मी या प्रश्नांचे उत्तर शोधू, आणि जमलं तर ‘संवेदना’ म्हणजे काय? हे लेखाच्या माध्यमातून लोकांना सांगू असे ठरविले.
माझ्या लेखाचे शीर्षकच आहे- ‘काय असते हो संवेदना…!’ यात मी वाचकांना प्रश्न केलेला नाही. एक उद्गारार्थी विधान आहे. ज्यात मी आपल्याशी बोलतोय. याचा अर्थ असा, की तुम्हाला संवेदना माहिती आहे; हे मी अगोदरच अपेक्षिले आहे. आता केवळ मी आपल्याला, मलाही समजून सांगा; असे विचारतोय. म्हणजे संवेदनशील आपण आहोत, हाच त्याचा अर्थ. प्रत्येकाची व्याख्या ही वेगळी असेल. तुम्ही तुमच्या परीने करत असलेले उपयोजनही वेगळे असेल. पण, माणूस संवेदनशील आहे; म्हणून तो ‘माणूस’ आहे. एवढे नक्की!
मला संवेदना कळल्या म्हणून मी शहाणा! असा अर्थ मीही काढणार नाही; आणि तुम्हीही काढू नका. आपण सर्वच संवेदनशील आहोत. केवळ त्याची सुरवात व त्याचा होत असलेला वापर हे बऱ्याच जणांच्या लक्षात येत नाही, एवढेच!

‘संवेदना’, ज्यात मुख्य शब्द आहे, ‘वेदना’. वेदना म्हणजे दुखणे; आणि दुखणे म्हणजे त्रास अर्थात दुःख! एवढे तर आपल्याला माहिती आहेच. मग यातला ‘सं’ काय करतोय? तो सांगतोय, की ‘स्वतः’ म्हणजे स्वतःसारख्या वेदना. संवेदनशील म्हणजे सह्रदयी; दुसऱ्यांचे मन जाणणारा, आपलेच भापट गाऱ्हाने न लावता दुसऱ्यांच्या मताचा आदर करणारा होय. सोपे उदाहरण सांगतो. एखाद्याला विंचू चावला, की तो व्यथित होतो किंबहुना बऱ्याचवेळा रडतो. तो रडत असताना आपण कधी हसतो का? नाही! कारण विंचू चावणे म्हणजे त्रास हे आपल्याला माहिती आहे. माहिती यासाठी, की आपण ते आपल्या पूर्वजांकडून, वाडवडिलांकडून ऐकले आहे की विंचू चावल्याने खूप असहनिय त्रास होतो. बऱ्याच जणांनी तर त्याचा अनूभवही घेतला असेल. म्हणून दुसऱ्याला चावलेला विंचू जणू आपल्याला चावला वाटणे, त्या व्यक्तीच्या दुःखात सहभागी होणे, म्हणजेच ‘संवेदना’. प्रत्येकवेळी इतरांच्या दुःखाचा अनुभव आपल्याला असेल किंवा कोणीतरी ते दुःख सांगितले असेल म्हणूनच संवेदनशील आपण होऊ, असेही नेहमी गरजेचे नाही. गरजेचे असेलही, पण तो अनुभव आपल्याकडे असेलच असे सांगता येत नाही.

संवेदना ही एक भावना आहे. सुखाची, आनंदाची, समाधानाची ती भावना होय. जशा या वेगवेगळ्या भावना तसे यात मुख्यत्वेकरून ‘करूण’ भावनेचा समावेश महत्वाचा आहे. संवेदनेचे अनेक बहुआयामी अर्थ आहेत. एखाद्याची सुखकारक गोष्ट असली तरी त्यात समरस होणे; त्याचे दुःख समजून घेणे; मुळात त्याचे मन जसे काय आपलेच आहे या हिशोबाने एकजीव होऊन त्यास साद घालणे, हे संवेदनशीलतेचेच लक्षण होय. या उत्कट प्रक्रियेत आपले मन समोरच्याच्या मनाशी जोडले जाते. जे सर्व विचारप्रक्रियेचे केंद्रस्थान असते. मेंदू मनाचे ऐकतो व त्यानुसार पुढची कार्यवाही करतो.
संवेदनेला इंग्रजीत शब्द आहे, सेन्सिटिव्हीटी! अर्थात जसे आपण म्हणतो, लोखंड हे विजेचे वाहक आहे किंवा स्टील हे लगेच उष्णता ग्रहण करते. म्हणजे ते अनुक्रमे वीजेशी व उष्णतेशी सेन्सिटिव्ह आहेत. संवेदनशील व्यक्तीही तसाच असतो, जो समोरच्याचे सुख, दुःख पाहून लगेच व्यक्त होतो.

‘संवेदना’ असायला, ती कमवायला गरिबी-श्रीमंती, इतर भेदभाव यांच्या सीमा कधीच आड येत नाहीत. तसे असते तर टाटा ग्रुपने किंवा रिलायन्स सारख्या मोठ्या उद्योगसमूहाने समाजसेवेचे महान कार्य हाती घेतले असते का? मुळात कमजोर लोकांची वेदना कमी करायची असेल तर समाजातील श्रीमंत व्यक्तींनी संवेदनशील व्हायला पाहिजे. कमजोर माणसाकडे वेदनाच इतक्या आहेत, की त्यांना वेगळ्या संवेदनेची गरजच नाही. श्रीमंतीची व्याख्या ही गावात सर्वात श्रीमंत, किंवा जिल्ह्यात सर्वाधिक धनाढ्य व्यक्ती अशी नाही. श्रीमंत म्हणायचेच असेल तर आजच्या घडीला जो जगात सर्वात श्रीमंत आहे, तोच खरा श्रीमंत! त्या तुलनेत आपल्याकडे लाखो- करोडो रुपये असले तरी आपण गरीबच.मग इथे श्रीमंत कोण? तो प्रत्येक व्यक्ती जो त्याच्यापेक्षा दुबळ्या व्यक्तीला मदत करू शकतो! भले त्याची क्षमता लाखाची नसेल पण इतकी असेल, की समोरच्या व्यक्तीच्या चेहऱ्यावर मिनिटभराचे समाधान देऊ शकेल. प्रत्येकवेळी तुमची आर्थिक मदत व्हावी हे गरजेचे नाही. गरजेची असली तरी तुमच्याकडेच नसेल तर तुम्ही कुठून देणार? गरज आहे ती आपण संवेदनशील असण्याची, होण्याची! आपण म्हणतो न, “मी खूप हळहळलो.” ती हळहळ खूप आवश्यक आहे. जी जीवंत मनाची साक्ष देते. तेव्हा तुम्ही संवेदनशील व्हाल,राहाल! जेव्हा तुमच्याकडे आर्थिक ओघ वाढेल तसे तुम्ही ‘फुल न फुलाची पाकळी’ सहकार्य जरूर कराल.

‘जयपूर फूट’चे निर्माते डॉ.पी.के. सेठी ज्यांनी पाय नसल्यामुळे चालता न येणाऱ्या माणसाची वेदना, त्यांना पाय असूनही जाणली. त्यांच्यामध्ये संवेदना होती म्हणूनच न! आमच्या लातूरचे दोन्ही डॉक्टर बंधू, डॉ. तात्याराव लहाने व डॉ. विठ्ठल लहाने हे संवेदनशील असल्यामुळेच कित्येकांना अनुक्रमे डोळ्यांची नजर व त्वचेचे हरवलेले सौंदर्य त्यांच्या निष्णात हातामुळेच देऊ शकले. स्वर्गीय बाबा आमटे व त्यांच्या तीन पिढया हे संवेदनशील असण्याचेच उदाहरण की! ज्या कुष्ठ रोग्यांच्या जवळ जाणेही आपण पसंत करत नाही, तिथे हे राहिले आणि तिथेच आयुष्यभर जगले; सर्व सुखसोयी सोडून! बच्चू कडुजी कैक वर्षांपासून अपंगांना व्हील चेअरची व्यवस्था त्यांची अवस्था पाहूनच करत आहेत. अनाथांची माय सिंधुताई सपकाळ, डॉ.बंग दाम्पत्य, सर्व समाजसेवक, अनेक स्वयंसेवी संस्था हे संवेदनशील आहेत म्हणून समाजात संवेदना टिकून आहे आणि वाढती आहे.
आमच्या स्थानिक परिसरात साईप्रसाद सेवाभावी मंडळ, आशादीप स्वयंसेवी संस्था,माझे मित्र ओंकार अमाणे बंधू, व ज्यांच्या सहवासात मी संवेदनेविषयी बोलतो, आणि जमलं तर दुखीतांची वेदना आपली करण्याचा प्रयत्न करतो, ते माझे परममित्र दिगंबर नागरवाड हे देखील संवेदनशीलतेची छोटी का असेना मनात घर करणारी मोठी उदाहरणे आहेत.मी उपरोक्तांची नावे, उदाहरणे आवर्जून यासाठी सांगितली, की मी त्या संवेदनारुपी गोड्या समुद्रातला एक थेंब आहे; आणि या अथांग महासागराला मला आपलेसे करायचे आहे. यासाठी मी स्वतःला ती आठवण करून दिली आहे.

वर सांगितलेली उदाहरणे मोजकी तथा फार तुरळक आहेत; जी लेखाच्या शब्दमर्यादेनुसार मला लिहिता आली. अशी अनेक उदाहरणे आहेत, जी माझ्या-तुमच्या परिचयाची आहेत. त्यांना पहा! फक्त प्रयत्न हा करा, की त्या संवेदनशील व्यक्तींच्या यादीत माझेही नाव असावे, भले ते शेवटाकडून पहिले का असेना!

माझ्याकडे किती आहे?
याच्या हिशोबात गेली अनेक वर्षे
दुसऱ्याची रिकामी खळगी दिसते न,
ते खरे आयुष्य!!!
धन्यवाद!

✒️लेखक:-अमोल चंद्रशेखर भारती(नांदेड)मो:-8806721206