कौशल्य विकास विभागातर्फे राज्यस्तरीय ऑनलाईन महारोजगार मेळाव्याचे आयोजन

38

🔸बेरोजगार युवक-युवतींना लाभ घेण्याचे आवाहन

✒️रोशन मदनकर(उप संपादक)

चंद्रपूर(दि.9डिसेंबर):-बेरोजगार युवक-युवतींना विविध क्षेत्रात रोजगाराच्या संधी उपलब्ध व्हाव्यात व रोजगाराच्या या संधीचा लाभ राज्यातील उमेदवारांना उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीने कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन विभागामार्फत दि. 12 ते 17 डिसेंबर 2021 या कालावधीत राज्यस्तरीय महारोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. त्याअनुषंगाने शासनाच्या rojgar.mahaswayam.gov.in या पोर्टलवर महारोजगार मेळाव्याचा कार्यक्रम तयार करण्यात आला आहे.

राज्यस्तरीय महारोजगार मेळावा हा उद्योजक तसेच बेरोजगार उमेदवारांसाठी एक सुवर्णसंधी आहे. जिल्ह्यातील सर्व औद्योगिक आस्थापना, हॉटेल्स, मॉल्स, दवाखाने व वेगवेगळ्या खाजगी आस्थापना यांनी त्यांच्या आस्थापनांमधील रिक्त पदे भरण्याकरिता सदर वेबपोर्टलवर नोंदणी करून मनुष्यबळाची मागणी नोंदवावी.

मेळाव्यामध्ये सहभाग नोंदविण्याकरिता उद्योजकांनी व उमेदवारांनी rojgar.mahaswayam.gov.in या पोर्टलवर भेट द्यावी. तसेच उमेदवार आपल्या मोबाईलमध्ये महास्वयम हे ॲप डाऊनलोड करून सुद्धा या सर्व सुविधांचा लाभ घेऊ शकतात. या मेळाव्यात सहभागी होण्यासाठी कोणतेही नोंदणी शुल्क नसून मोफत सहभागी होता येणार आहे. सर्व आस्थापना व नोकरी इच्छुक उमेदवारांनी या संधीचा लाभ घ्यावा. रोजगार मेळाव्यासंदर्भात काही अडचण, मदत किंवा अधिक माहिती हवी असल्यास 07172-252295 या दूरध्वनी क्रमांकावर संपर्क साधावा. असे आवाहन कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राचे सहायक आयुक्त भैय्याजी येरमे यांनी केले आहे.