वाढदिवस साजरा झाला अन् दुसऱ्याच दिवशी तिच्यावर काळाचा घाला

30

✒️नागपूर(पुरोगामी संदेश नेटवर्क)

नागपूर(3जुलै):-शेत तळ्यात पोहोताना दोन विद्यार्थिनींचा बुडून मृत्यू झाला. कोंढाळीतील घुबडी येथे गुरुवारी दुपारी ही हदयद्रावक घटना घडली. या घटनेनं गावावर शोककळा पसरली आहे. भाग्यश्री विजय येडमे (वय १२) आणि अर्चिता गोमेश्वर मंगाम (वय ११ रा.घुबडी ),अशी मृतांची नावे आहेत. या दोघी सातव्या वर्गात शिकत होत्या.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, भाग्यश्रीचे आजोबा सेवकराम परतेती यांचे घुबळी येथे शेत आहे. शेतात शेततळे आहे. शाळेला सुटी असल्याने भाग्यश्री आजोबाकडे राहायला आली होती. गुरुवारी दुपारी भाग्यश्री, तिची मैत्रिणी अर्चिता व अन्य दोन मुली शेतात आल्या. दोघीही शेततळ्यात पोहोयला उतरल्या. पोहताना भाग्यश्री व अर्चिताचा बुडून मृत्यू झाला. अन्य दोघींनी आरडा-ओरड केली. सेवकराम यांनी ग्रामस्थांच्या मदतीने दोघींना बाहेर काढले. त्यांना कोंढाळीतील प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल केले. डॉक्टरांनी तपासून दोघींना मृत घोषित केले. याप्रकरणी कोंढाळी पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली आहे. ठाणेदार श्याम गव्हाणे यांच्या मार्गदर्शनाखाली या प्रकरणाचा तपास सुरू आहे.

वाढदिवस झाला अन्
भाग्यश्रीचा बुधवारी वाढदिवस होता. मैत्रिणींसह तिने वाढदिवस साजरा केला. गुरुवारी भाग्यश्री व अर्चिताने शेतात जाण्याचे ठरविले. अन्य दोन मैत्रिणींसह दोघीही शेतात गेल्या. काळही त्यांच्या मागावरच होता. शेततळ्यात पोहोण्याच्या मोहाने भाग्यश्री व अर्चिताचा जीव गेला. भाग्यश्री व अर्चिताच्या मृत्यूने त्यांच्या कुटुंबीयांवर दु:खाचा डोंगर कोसळला आहे.