‘मंगेश’ एकच आहे….!!

34

विचित्र आहे न हे! ‘मंगेश एकच आहे!’; हे काही विधान झाले का! आमच्या पुतण्याचे नाव, मंगेश!, माझा भाचा मंगेश, माझा जावई पण मंगेश, अरे! माझे नाव पण ‘मंगेश’च की! मग जगात एकच मंगेश म्हणणे, हे बरोबर होणार नाही. असे बरेच प्रश्न वाचक म्हणून मनात आलेच असतील. थोर साहित्यिक शेक्सपिअरने म्हटले होतेच; ‘नावात काय आहे!’ त्यावर उलटसुलट बरीच चर्चा करता येईल. राहू द्या ते. पण, नावात काही ताकत असेल तेव्हाच आई-बाप आपल्या लाडक्या लेकराचे नाव थोर व्यक्तींच्या नावावर ठेवतात. (मी मुद्दाम थोर व्यक्ती म्हटलं; कारण महापुरुष म्हटले की, स्त्रिया झाकल्या जातात. सोबत त्यांचे कर्तृत्वही झाकोळल्या जाते. असो!) मग, कोणाचे नाव छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावावर असेल, तर कोणाचे सुभाषचंद्र, चंद्रशेखर, संभाजी, तानाजी, ज्योतिबा, सावित्री, लक्ष्मी अशी कित्येक नावे सांगता येतील. ही नावे ठेवण्याचा उद्देश एकच असतो, की आपला पाल्ये निदान त्यांच्या सावलीपर्यंत तरी पोहचावा. पण एक नाव असणारे सर्वचजण एकसारखे असतात का? मग ते चांगले असो की वाईट. यावरून एकच सिद्ध होते, की नाव हे केवळ हाक मारण्यापुरते मर्यादित आहे. नावामुळे त्या विशिष्ट नावाची शक्ती आपोआप अंगात घुसत नाही. त्यासाठी स्वतःचे कर्तृत्व निर्माण करावे लागते. जे उपरोक्त महान व्यक्तींनी केले.

आता मंगेश नावाचेच घ्या! मी निदान माझ्या ओळखीतल्या वीस जणांचे तरी मंगेश हे नाव ऐकले. अनोळखी व जगात फिरणारे लाखो असतील. पण, मी ओळखीचे यासाठी म्हटले की, प्रत्येक ‘मंगेश’, ‘मंगेश’ असूनही इतर ‘मंगेश’पेक्षा वेगळा आहे. मग, तो चांगला असेल नाहीतर वाईट! तो कर्तुत्ववान असेल नाहीतर उनाड! पण तो आहे वेगळाच!

आज मी माझा जो चौदावा व्यतिविशेष लेख लिहित आहे, त्यातला ‘मंगेश’ जगात एकच आहे. तसा तो जगातील सर्व ‘मंगेश’मध्ये अव्वल नसेलही. पण त्यासारखा तोच! मग, तुम्ही साहित्यिक मंगेश पाडगावकर, किंवा अभिनेता मंगेश देसाई नाहीतर चित्रपट दिग्दर्शक मंगेश कदमशी तुलना करून आमच्या मंगेशला लहान करसाल. ते त्यांच्या ठिकाणी मोठे, पण यासम हाच! त्यामुळे तुलना नकोच. मी मंगेश अलग यासाठी म्हटला की त्याचे गुण इतर कोणत्याच मंगेशमध्ये नाहीत; आणि जे इतर सर्वसामान्य मंगेश किंवा इतरही मुले आहेत त्यांच्यात ते असावेत म्हणून अपेक्षु शकतो.

आता जास्त न बोलता, विषयावर येतो. मंगेश म्हणजे माझा मित्र श्री- मंगेश पंजाबराव मुधोळ, वय- 32 वर्षे, राहणार- नांदेड शिक्षण- बी. एस. स्सी. एम.एम.एल.टी! मित्र म्हटले की तुम्ही ‘जिगरी’ लावून त्याच्या कर्तुत्वाची धार बोथट कराल. आणि लेखकाच्या लेखणीतून धार नाही तर सहानुभूती झळकत आहे. असेही म्हणाल! तो मित्र आहेच, आणि तो जिगरी असावा असे प्रत्येकालाच वाटेल. आणि माझा पूर्ण लेख वाचल्यावर त्याचे जे मित्र आहेत, त्यांना मंगेशचा मित्र असल्याचा अभिमानही होईल. कोणाबद्धल लिहावे आणि ते भव्य वाटावे असे सारखेच गुण सर्वात सारखेच नाही सापडणार. कारण, सचिन तेंडुलकर क्रिकेट खेळून देव होत असेल, किंवा मुकेश अंबानी उद्योग विश्वात भव्य असतील नाहीतर रतन टाटा उद्योगासोबत समाजसेवेतही भव्य असतील तर एक नेहमी सत्य बोलणारा व्यक्तीही भव्य, व्यवहार चोख बजावणाराही भव्य, लोकांची नेहमी मदत करणाराही भव्य आणि ‘स्वतःच्या पायावर स्वतः उभा राहून घरट्याचे घर करणाराही भव्य!’ त्यामुळे मोठा माणूस हा आमदार, खासदार, आय.ए.एस., आय.पी.एस. झाल्यानेच मोठा होत असेल, तर ‘मूल्ये’ ही कधीच मोठी होणार नाहीत. त्यामुळे माणसाला मोठे म्हणायचेच असेल तर त्याच्यामधल्या गुणांना मोठे म्हणा, मग माणूस आपोआपच मोठा होतो.

मी मंगेशवर का लिहितोय? तो ज्यांना माहिती आहे त्यांना तो कळावा आणि माहिती नसऱ्यांना माहिती व्हावा म्हणून! ‘मंगेश’ हे नाव आपल्या अनेक हिंदू देवातील एक. तसे ते ‘महादेवा’चे नाव आहे. महादेवामधील काही गुण मंगेशमध्ये पण आहेत. सर्वच काही नाहीत; कारण सर्वच हो म्हणून, मला त्याला देव नाही करायचे. तो व्यवसायाने ह्युमन पॅथालॉजीत ‘टेक्निशियन’ आहे. खूप वर्षांचा अनुभव म्हणून त्या क्षेत्रातला तो बराच काही आहे. माझी आणि त्याची ओळख तशी 8-9 वर्षांची असेल. पण मला तो जास्त या मागच्या चार वर्षात कळला. त्याची ओळख माझा दुसरा मित्र प्रभाकरने करून दिली होती. ओळख म्हणजे हस्तांदोलन नाही तर त्याच्याबद्दल बऱ्याच गोष्टी सांगून, मंगेशला मी न भेटताही तो मला ओळख येईल, इतके आतले-बाहेरचे बारकावे प्रभाकरने सांगितले होते.

मंगेशची प्रथम भेट मला काही आठवत नाही. कारण त्याची प्रत्येक भेट ही प्रथमच वाटावी अशीच असते. तीच नम्रता, तीच सहजता, आणि तोच आपलेपणा प्रत्येक वेळी त्याच्या भेटीतून दिसतोच! तसा तो माझ्याहून दोन वर्षांनी लहान,पण त्याच्यातल्या गुणांनी खूप मोठा! आपल्याकडे चार पैसा आला की लोकांत ऍटीट्युड चेहऱ्यासहित कपड्यांवरही उतरतो. रोज रामराम करणारा आज थेट गेला की समजायचे, त्याच्याकडे खुर्दा जास्त झाला, म्हणून तो आपल्याला चिल्लर समजत आहे. तसे मंगेशने माझ्याशी आदबीने बोलावे इतका मी नम्र नाही किंवा तो माझ्या कामी येत असेल, इतका मी त्याच्या कामी येणारा पण नाही. सामान्यपणे माझ्यासोबत एखाद्या व्यक्तीचे वागणे पाहून किंवा त्याचा स्वभाव पाहून, मी त्याच्यावरती लिहायला लागतो. परंतु, मंगेशच्या बाबतीत मी निदान दहा लोकांच्या मुलाखती घेऊन त्यांच्याकडून मंगेश विषयी जाणून घेतले. तेव्हाच मंगेशवर लिहायला लागलो. त्यामुळे हे लिखाण खऱ्याच्या खूप जवळ असेल.

गोरापान, झरझर डोळे, पोपटासारखे नाक, पोपटासारखेच मधुर बोलणे, मध्यम शरीर,मध्यम बांधा, मध्यम उंची, नेहमी शर्ट इन, टाप-टीप राहणे, हसरा चेहरा आणि सतत व्यस्त. इतका सरळ दिसणारा मंगेश स्वतःच्या कामात खूप गुंतलेला आहे. तो ज्या ‘भगवती लॅबम’ध्ये काम करतो, तिथे तो सतत व्यग्रच दिसणार. त्याला मिळणारी पगार आणि त्याच्यापरीने उभे केलेले साम्राज्य मिळकतीहुन खूप मोठे आहे. त्याच्या वयाची मुले वडिलांनी माझ्यासाठी काहीच केले नाही, म्हणून लग्नासाठी मुलगी शोधत असतील एवढेच काय कर्तुत्व त्यांचे! गरिबी मोठे होवू देत नाही, यांच्यासाठी मोठे व्हायचे मंगेश मोठे उदाहरण! पैसा नशेकडे वळवतो, त्याचा यु टर्न सांगणारे, मंगेश एक उदाहरण! नम्रपणा, चिकाटी, काटकसरी, व्यवहारचातुर्य काय असते? ते त्याला पाहून कळणारच! त्याने किती कमावले हे सांगून त्याला लुटायला बसलेल्यांना मी आयता खुराक नाही देणार. पण, एवढं नक्की की आम्ही बापजाद्याचे कमवून ठेवलेले गमावतो; आणि स्वतः कमावलेले गर्वाने उधळतो. त्यातला मंगेश निश्चितच नाही.

आपण जे म्हणतो न लोकांच्या घरी, नातेवाईकांकडे काम करून हालअपेष्टा सोसून इथपर्यंत आलो. त्यातले तर बरेचजण नुसते आलेच! काहीजण काहीतरी बनले. असे जीवन मंगेशच्या वाट्यालाही आले. गरिबी, घरच्यांचे अज्ञान, कोणी गॉडफादर नसणे, नेमकेच शिक्षण असणे. हे सर्व त्यानेही पाहिले, व मार्गही शोधला. 2009 पासून नांदेडमध्ये कामासाठी काहीही माहिती नसताना 5-5 कि.मी.पायी फिरणारा मंगेश, 20 ते 25 किलोमीटर 2015 ते 2017च्या काळात नांदेडच्या रहदारीत बाईकने फिरून दिवसातले पंधरा ते सोळा तास अशी दोन-दोन कामे एकाच वेळी करणारा माणूस तो, गेली दहा वर्षे रोज आठ तास काम कमीत कमी आजही करतो. तीच दगदग आहे. पण या दगदगीत तो थकलेला व घायाळ कधीच दिसत नाही. दोन वर्षांची चिमुकली पोरगी बापासारखीच तिच्या वयाला न झेपणारे अवघड ज्ञान प्राप्त करत आहे. ‘प्रपंच करावा नेटका’ या उक्तीप्रमाणे तो राहतो,वागतो. बायकोही त्याच्यात दुधात साखर मिसळावी अशीच!

दहा एकर बापाची इस्टेट असणारा पोरगा आणि मंगेश इतक्याच पगाराची नोकरी असणारा सरकारी नोकर, कमाई म्हणा की चिकाटी यात मंगेशच्या पाशंगातही बसत नाही. पडत-झडत-अडखळत शिकणे म्हणतात न, ते तो शिकून इथपर्यंत आला आहे. त्याची धडपड आजही चालू आहे. स्वावलंबी जगण्यासाठी त्याने स्वयंकष्टाने व मेहनतीतील इमानदारीने स्वबळावर त्याचे जे काही स्वतःपुरते साम्राज्य आहे ते उभे केले. त्याला बऱ्याच वेळा मदतीचा हात म्हणून त्याच्याच गावातील बांधकाम व्यावसायिक श्री- गजाननराव मुधोळ व गावातील प्रगतिशील शेतकरी विठ्ठलराव मुधोळ ह्यांनी संकटकाळी सहकार्य केले. ज्यांचे नाव तो नेहमीच आदराने घेतो. आई-वडील-भाऊ यांचा सहभाग पालक म्हणून होताच; त्यांच्या ऋणात तर तो आहेच.

लोकं आपल्या मुलांची नावे महापुरुषांची, देवांची नावे पाहून ठेवतात. मंगेशच्या घरच्यांनी त्याचे नाव काय पाहून ठेवले? हे मला माहिती नाही. पण त्याने त्याच्या नावाचे, त्याच्या व्यक्तिमत्त्वासारखे सुधारित आणि सुंदर स्वतःचे एक वेगळे नवरूप बनवले. तू इतका आदर्श आहेस, की आजही लोकांनी एक आदर्श म्हणून ‘मंगेश’ हे नाव ठेवावे आणि ते मंगेश कडे पाहून ठेवावे, यातच मला तर वैयक्तिक आनन्द आहे. म्हणून तर उपरोक्त शीर्षक ठेवण्याचे मी धाडस केले. ‘मंगेश’ नावाचे अनेक असतील, पण,कर्माने,कर्तुत्वाने,स्वभावाने ‘मंगेश बापूराव मुधोळ’ हा एकच आहे. तो त्याच्यासारखा आहे; त्याच्यासारखे कोणी नाही. हे मी ठामपणे सांगू शकतो. केवळ नाव एक असल्याने माणसे एकसारखी होत नाहीत. त्यासाठी कर्म एक असावे लागते आणि प्रत्येकाचे कर्म आदर्श असू शकेल पण एक होऊ शकत नाही. माणसातले अलग कर्म हे त्या व्यक्तीला अलग बनवतात. त्याचे नाव त्याला वेगळे करत नाही तर त्याचे कर्म नावाला वेगळी ओळख देतात. कर्म नावाला घडवते, नाव कर्म घडवायला अजून ते निर्माण झालेले नाही.

मंगेशवर लिखाण करावे का? तर मंगेश खूप मोठा झाला; आणि त्याने खूप कमावले एवढ्यापुरते नाही. त्याच्यावरती लिखाण यासाठी आहे, की आपल्या तरुण मुलांचा समुदाय जो आज म्हणतो की, माझ्या आई-वडिलांनी माझ्यासाठी काहीच केले नाही; आम्ही गरीब होतो; आम्हाला मार्ग दाखवणारे कोणीच नव्हते; आम्ही शिकलो नाही,वैगरे. त्यांच्यासाठी, आमच्या स्थानिक परिसरापुरता किंवा ग्रामीण भागातल्या मुलांसाठी तो मोठा आदर्श होऊ शकतो. भले त्याने खूप मोठे साम्राज निर्माण केले नसेलही पण जेवढे काही साम्राज्य त्याने स्वतःच्या जीवावर स्वतःसाठी कोणावरही अवलंबून न राहता निर्माण केले ते खरंच आपल्या सर्वांसाठी, येऊ घातलेल्या पुढच्या पिढीसाठी आदर्शवत आहे.

बोलता- बोलता त्याने कमावलेली काही रक्कम एका व्यक्तीने उधार घेऊन परत न केल्याची खंत बोलून दाखवली. त्याने हसत दुःख सांगितले. पण वेदनेचा केंद्रबिंदू काळजातला काही हालत नव्हता. पैसा दिसायला सारखाच आहे, पण तो ते मिळवणारा सारखा नाही, एवढे तरी ध्यान ठेवावे.

विना-पे, नन्तर 300 रुपये प्रतिमहिना ते आज काही हजारात प्रतिमहा कमावणारा मंगेश कुठल्याच कामाला कमी न लेखता, रोज आठ तास काम करून, आळस न करता इथपर्यंत आला आहे. तो इथेच न थांबता आणखी पुढे जाईल आणि मला त्याच्यावरती पुन्हा लिहायला भाग पाडेल, एवढे नक्की!

माणसे खूप पाहिली

अनेक नावाची, अनेक तऱ्हांची

नेक तर तू आहेसच मंगेश दादा

झळकतो राहो तुझी कीर्ती

हिमालयापरी,

करशील का हा एकच वादा?

✒️लेखक:-अमोल चंद्रशेखर भारती(लेखक/ कवी/ व्याख्याते,नांदेड)