द किंग ऑफ स्टॅण्ड अप कॉमेडी

35

राजू श्रीवास्तव प्रसिद्ध स्टॅण्ड अप कॉमेडियन राजू श्रीवास्तव यांचं बुधवार दिनांक २१ सप्टेंबर रोजी दुःखद निधन झालं. १० ऑगस्ट रोजी सकाळी व्यायाम करताना ते ट्रेंड मिलवर कोसळले. तेंव्हापासून त्यांची मृत्यूशी झुंज सुरू होती. बुधवारी ही झुंज संपली. त्यांच्या अकाली निधनाने मनोरंजन विश्वावर शोककळा पसरली आहे. द किंग ऑफ स्टॅण्ड अप कॉमेडी अशी ओळख असलेल्या राजू श्रीवास्तव यांचा २५ डिसेंबर १९५३ रोजी उत्तरप्रदेश मधील कानपुर येथे जन्म झाला. राजू श्रीवास्तव यांचे वडील कवी होते. बलई काका नावाने त्यांच्या अनेक कविता प्रसिद्ध झाल्या होत्या राजू श्रीवास्तव लहान असताना आपल्या वडिलांच्या कविता म्हणत. शालेय वयातच त्यांना नकला करण्याचा छंद लागला. शाळेतील शिक्षकांच्या व गावातील माणसांच्या ते हुबेहूब नकला करत. पुढे ते अमिताभ बच्चन यांची नक्कल करू लागले. अमिताभ बच्चन यांचा हुबेहूब आवाज काढून त्यांनी केलेली नक्कल लोकांना इतकी आवडली की लोक त्यांना ज्युनिअर अमिताभ म्हणू लागले. अमिताभ बच्चन यांच्याप्रमाणेच त्यांनी चित्रपट सृष्टीतील इतर कलाकारांची देखील नक्कल करण्यास सुरुवात केली. त्यांचा हा नकलाचा कार्यक्रम प्रेक्षकांना आवडू लागला. कानपूरमधील प्रेक्षक त्यांना कॉमेडीसाठी बोलवू लागले.

त्यांचे कार्यक्रम लोकप्रिय होऊ लागले तेंव्हा त्यांच्या एका मित्राने त्यांना त्यांच्या कॉमेडीची सीडी बनवून विकण्याचा सल्ला दिला. मित्राने दिलेला हा सल्ला त्यांच्यासाठी टर्निंग पॉईंट ठरला. राजू श्रीवास्तव यांनी त्यांच्या कॉमेडीची सीडी मार्केटमध्ये आणल्यानंतर त्यांच्या सिडीला प्रेक्षकांचा तुफान प्रतिसाद मिळाला. मुंबईतही त्यांच्या सीडी विकल्या जाऊ लागल्या. मुंबईतही त्यांना खूप प्रसिद्धी मिळाली त्यामुळे ते मुंबईत आले आणि चित्रपटांसाठी ऑडिशन देऊ लागले. तेजाब आणि मैने प्यार किया या चित्रपटात त्यांना छोट्या भूमिका मिळाल्या. त्यांनतर बाजीगर, मिस्टर आझाद या चित्रपटातही त्यांनी भुमीका केल्या मात्र या भूमिकांनी त्यांना समाधान दिले नाही त्यामुळे ते टीव्हीकडे वळले. देख भाई देख या विनोदी मालिकेत त्यांना काम करण्याची संधी मिळाली. त्यानंतर त्यांनी शक्तिमान या मालिकेत काम केले. चित्रपट आणि टीव्हीवर काम करताना त्यांनी त्यांची स्टॅण्ड अप कॉमेडी काही सोडली नव्हती ते स्टॅण्ड अप कॉमेडी करतच होते. २००५ साली टीव्हीवर द ग्रेट इंडियन लाफटर चॅलेंज नावाचा कॉमेडी शो आला होता. या शो मध्ये त्यांनी भाग घेतला.

या शो ने त्यांना स्टार बनवले. या शो मध्ये त्यांनी सादर केलेले गजोधर काका, पिंकी पार्लरवाली ही पात्रे खूप लोकप्रिय झाली. या शो नंतर त्यांचे देशभर नाव झाले. त्यांना अनेक कार्यक्रमांमध्ये बोलावले जायचे. या काळात त्यांची कॉमेडी किंग अशीच इमेज झाली होती. २००९ साली बिग बॉस शो मध्येही भाग घेतला होता. २००५ ते २०१० हा त्यांचा सुवर्णकाळ होता. या काळात त्यांची लोकप्रियता गगनाला भिडली होती त्याचा लाभ घेऊन राजकारणात उतरण्याचा त्यांनी निर्णय घेतला मात्र त्यांना राजकारण मानवले नाही त्यामुळे ते पुन्हा कॉमेडीकडे वळले. त्यांनी आपली स्टॅण्ड अप कॉमेडी पुन्हा सुरू केली. आपल्या स्टॅण्ड अप कॉमेडीने त्यांनी प्रेक्षकांची मने जिंकली. राजू श्रीवास्तव यांच्याप्रमाणे अनेकांनी स्टॅण्ड अप कॉमेडी करण्याचा प्रयत्न केला पण राजू श्रीवास्तव यांच्या सारखी नक्कल आणि स्टँड अप कॉमेडी कोणालाही जमू शकली नाही. चित्रपट, टीव्ही आणि स्टेज शो मधून प्रेक्षकांना खळखळून हसवणारे राजू श्रीवास्तव यांचे असे अकाली जाणे प्रेक्षकांना चटका लावून जाणारे आहे. स्टॅण्ड अप कॉमेडीचे किंग राजू श्रीवास्तव यांना भावपूर्ण श्रद्धांजली!

✒️श्याम ठाणेदार(दौंड जिल्हा पुणे)मो:-९९२२५४६२९५