ऐकावं ते नवलंच : अर्धे रेल्वे स्टेशन महाराष्ट्रात, अर्धे गुजरातमध्ये; हे स्टेशन कोणतं माहितीये का?

27

🔺अजब रेल्वे स्थानक

एका देशातून दुसऱ्या देशात जाणारी नदी किंवा पर्वत रांगावगैरे सारख्या गोष्टींबद्दल तुम्ही अनेकदा वाचले असणार. अनेक देशांच्या सीमा या नदी किंवा जंगलांनी ओळखल्या जातात. परदेशात अनेक ठिकाणी काही घरे किंवा हॉटेलसारख्या गोष्टी अर्धी या देशात तर अर्धी त्या देशात असा अजब प्रकार दिसून येतो. मात्र आपल्या महाराष्ट्रात असे एक रेल्वे स्थानक आहे जे दोन राज्यांमध्ये वाटले गेले आहे. म्हणजे या स्थानकाचा अर्धा भाग महाराष्ट्रात येतो तर अर्धा गुजरातमध्ये.

महाराष्ट्रातील नंदूरबार जिल्ह्यामध्ये नवापूर हे छोटे शहर आहे. नवापूर पंचायत या शहराचा कारभार पाहते. या शहरातून जाणारा रेल्वे मार्ग गुजरातमध्ये जातो. नवापूर रेल्वे स्थानक अगदी महाराष्ट्र गुजरात सिमेवर असल्याने त्याचा अर्धा भाग महाराष्ट्राच्या सिमेत आहे तर अर्धा गुजरातच्या. मागील वर्षी महाराष्ट्र आणि गुजरात स्थापना दिनाच्या दुसऱ्याच दिवशी म्हणजेच २ मे २०१८ रोजी रेल्वे मंत्री पियुष गोयल यांनी या स्थानकाचा फोटो ट्विट केला होता. आपल्या ट्विटमध्ये ते म्हणाले होते, ‘राज्यांच्या सिमांमुळे वेगळे झालेले पण रेल्वेमुळे एकत्र असलेले स्थानक. नावपूर रेल्वे स्थानक हे दोन राज्यांमध्ये असलेले स्थानक आहे. या स्थानकाचा अर्धा भाग महाराष्ट्रात तर अर्धा गुजरातमध्ये आहे. नवापूर हे नंदुरबार जिल्ह्यातील तालुक्याचे शहर आहे.’

जरी नवापूर स्थानक हे दोन राज्यांत असणारे स्थानक असले तरी भारतातील ते असे एकमेव स्थानक नाहीय. राजस्थान आणि मध्य प्रदेशच्या सिमेवरही भवानी मंडी नावाचे स्थानक आहे. या स्थानकाचा अर्धाभाग राजस्थानमध्ये आहे तर अर्धा मध्य प्रदेशमध्ये.