चंद्रपूर जिल्ह्यात बाधितांची संख्या 150–एकाच दिवशी 16 बाधित

38

✒️चंद्रपूर(पुरोगामी संदेश नेटवर्क)

🔺सर्व प्रकारची आस्थापने व दुकाने आता सकाळी 9 ते 7 या वेळेत सुरू

🔺आतापर्यत 80 कोरोनातून बरे

🔺70 बाधितांवर उपचार सुरू

चंद्रपूर(दि.9जुलै): जिल्ह्यात संपर्कातून बाधितांची संख्या वाढत आहे. कमीत कमी नागरिकांच्या संख्येमध्ये लग्न समारंभ व सामुदायिक कार्यक्रम करणे गरजेचे आहे. प्रशासनाने दिलेल्या सूचनांचे पालन न केल्यास संबंधित नागरिकांवर गुन्हा दाखल करण्यात येणार आहे. बाहेरून येणाऱ्या नागरिकांना संस्थात्मक अलगीकरण बंधनकारक असणार आहे. नागरिकांनी माहिती लपविल्यास त्यांच्यावर गुन्हे दाखल केल्या जाईल असे स्पष्ट निर्देश जिल्हाधिकारी डॉ. कुणाल खेमनार यांनी दिले आहे.जिल्ह्यात आज बाधितांची संख्या 16ने वाढल्यामुळे एकूण संक्रमित संख्या 150 झाली आहे.यामध्ये सर्वाधिक ब्रम्हपुरी व भद्रावती येथील प्रत्येकी 5,जानाळा-बेंबाळा 3 व गडचांदूर येथील 3 बाधितांचा आजच्या 16 मध्ये समावेश आहे.

जिल्ह्यामध्ये जीवनावश्यक वस्तू विक्री व वितरण आणि जीवनावश्यक व्यतिरिक्त वस्तू,विक्री व वितरण इत्यादी सर्व प्रकारचे आस्थापने दुकाने सकाळी 9 ते सायंकाळी 7 या वेळेत सुरू राहतील. परंतु,सदर आस्थापनांनी प्रशासनाने दिलेल्या नियमांचे पालन करणे गरजेचे आहे. तसेच निवासाची व्यवस्था असलेले लॉज, हॉटेल, खाजगी विश्रामगृह सुद्धा सुरू झालेले आहेत. यापुर्वी दुकानांना 5 वाजेपर्यंतच परवानगी होती.

जिल्ह्यामध्ये गुरुवार दिनांक 9 जुलै रोजी आरोग्य विभागाकडून आलेल्या प्राथमिक माहितीनुसार एकाच दिवशी 16 बाधित पुढे आले आहेत. कालपर्यंत जिल्ह्यामध्ये 134 पॉझिटीव्ह आढळले होते. आज त्यामध्ये 16 बाधिताची भर पडल्याने एकूण संख्या 150 झाली आहे. आतापर्यंत 80 नागरिक कोरोना मुक्त झाले असून सध्या 70 नागरिक जिल्हयात उपचार घेत आहेत. 150 संख्येमध्ये चंद्रपूर शहरात निदान झालेले अन्य जिल्ह्यातील 4 बाधित आहेत. हे चारही बाधित राज्य राखीव पोलीस दलाचे जवान आहेत.

ब्रम्हपुरी येथील बाधितांची संख्या रोज वाढत आहे. गुरुवारी ब्रह्मपुरी शहरातील भवानी वार्ड येथील एक, तालुक्यातील खेड, बेटाळा, सौंद्री, मुडझा या चार गावातील प्रत्येकी एका पॉझिटिव्हचा समावेश आहे. तालुक्यातील आजची पॉझिटीव्ह संख्या पाच झाली आहे.

तर मूल तालुक्यातील बेंबाळ येथील हैदराबाद येथून आलेला नागरिक पॉझिटिव्ह ठरला आहे. मुल तालुक्यातीलच जानाळा येथूनही संपर्कातून पॉझिटिव्ह झालेल्या दोन नागरिकांचा समावेश आहे. भद्रावती शहरातील पॉझिटिव्ह बाधितांच्या संपर्कातील पाच जणांना कोरोनाची लागण झाली असून शहरात सतत संख्या वाढत आहे.गडचांदूर येथे देखील संपर्कातील 3 पॉझिटिव्ह पुढे आले आहेत.

आतापर्यंतचे कोरोना बाधीतांचे विवरण :

चंद्रपूरमध्ये आतापर्यत 2 मे ( एक बाधित ), 13 मे ( एक बाधित), 20 मे ( एकूण 10 बाधित ), 23 मे ( एकूण 7 बाधित), 24 मे ( एकूण 2 बाधित), 25 मे ( एक बाधित ), 31 मे ( एक बाधित ), 2 जून (एक बाधित), 4 जून (दोन बाधित), 5 जून ( एक बाधित),6 जून ( एक बाधित), 7 जून ( 11 बाधित),9 जून (एकुण 3 बाधित), 10 जून ( एक बाधित), 13 जून ( एक बाधित), 14 जून ( एकुण तीन बाधित),15 जून (एक बाधित), 16 जून ( एकुण 5 बाधित), 17 जून ( एक बाधित), 18 जून ( एक बाधित), 21 जून (एक बाधित), 22 जून (एक बाधित), 23 जून (एकूण बाधित चार ), 24 जून (एक बाधित), 25 जून (एकूण 10 बाधित),26 जून (एकूण दोन बाधित), 27 जून (एकूण 7 बाधित), 28 जून (एकूण 6 बाधित), 29 जून (एकूण 8 बाधित), 30 जून (एक बाधित), 1 जूलै (एकूण दोन बाधित), 2 जुलै ( 4 बाधित ), 3 जुलै ( एकूण 11 बाधित ), 4 जुलै ( एकूण 5 बाधित ), 5 जुलै ( एकूण 3 ‌ बाधित ), 6 जुलै ( एकूण सात बाधित ), 8 जुलै ( एकूण पाच बाधित )आणि 9 जुलै ( एकूण 16 बाधित ) अशा प्रकारे जिल्ह्यातील कोरोना बाधित 150 झाले आहेत. आतापर्यत 80 बाधित बरे झाल्याने सुटी देण्यात आली आहे. त्यामुळे 150 पैकी रूग्णालयात उपचार घेणाऱ्या बाधितांची संख्या आता 70 झाली आहे. सर्व बाधितांची प्रकृती स्थिर असून त्यांच्यावर वैद्यकीय उपचार सुरू आहेत.