स्वप्नातील या प्रेमाला, या नात्याला काय नाव देऊ…

38

आठवणींच्या प्रवाहात वाहत्या भावनांची मालिका

माझ्या काळजात तिच्या आठवणीचे प्रतिबिंब साकारलेले आणि माझ्या ह्रदयावार राज्य करणारी ती स्वप्नातली राजकुमारी…आमची ओळख होऊन कित्येक वर्ष लोटलेले…आज ‘अब के बरस’ फिल्म नजरेत उतरली आणि असं वाटलं या फिल्मपेक्षा आमची लव्ह स्टोरी काही वेगळी नाही. पण वेगळेपण मात्र नक्कीच आहे. पण माझ्या आर्टिकलच्या पात्रात ही वास्तविकतेची छटा प्रत्येकात तिच्या प्रेमाचं निरागस रुप साकारलेलं असेल…

तिला माहित आहे. मी नेहमी माझ्या विचारावर ठाम असायचा, की मी कधीच प्रेमात पडणार नाही. पण तिच्यासोबत बोलताना मी तिच्यात हरवून जायचा…प्रेम या अडीच अक्षरी शब्दापासून नेहमी दूर पळत असलेला मी या प्रेमाच्या जाळ्यात मात्र नकळत गुंतल्या गेलो. या प्रेमाच्या जाळ्यातून सुटका करायची म्हटलं तर तारेवरची कसरत असावी बहुतेक…’प्रेम’ या शब्दात केवढं मोठं सामर्थ्य दडलेलं आहे. हे आज कळतंय…या प्रेमाचा आस्वाद घेतलाय; पण फक्त स्वप्नात…मधाळ रात्री, स्वप्नांच्या कुशीत एक जगण्याची आस देऊन गेली ती…तो केवळ भास होता की एक विचार; पण तिचा पाठलाग मी अक्षरश: स्वप्नातच केला…ती चाहूल न जाणता माझ्या मनाला हवीहवीशी वाटली…ती वेगळी दुनिया आपलीशी वाटायला लागली. समुद्राच्या लाटा नि त्या दोन किना-यासोबत, चांदण्याच्या प्रकाशझोत किरणांखाली वेड्यासारखा तिला शोधत सुटलेला मी…

खूप वेगळी वाटते प्रेमाची दुनिया. तिने मला प्रेम करायला शिकवलं. कुणी एकमेकांना भेटल्यावर आपल्या मनातली गोष्ट सांगत असेल. मी तर तिला कधी बघितलंही नव्हतं आणि तिही मला बघितलेलं नाही. मी फक्त तिचं मन ओळखलेलं होतं. एवढं कसं बरं मन जुळतं! न बघताच ती मला ‘आय लव्ह यू’ म्हटलं. मी तिच्यावर प्रेम तर करायचा; पण तिला तेव्हा हो म्हटलं नाही. जेव्हा प्रेम म्हटलं तर भीती वाटायची आणि तिच्या ‘आय लव्ह यू’ या एका वाक्यातल्या तीन शब्दाने माझी रात्रभराची झोप उडाली. मनाला ते वाक्य सतावत होते. अजून कितीतरी रात्रीने माझी झोप उडाली असती. जास्त दिवस नाही, फक्त एका रात्रीचा आढावा घेतला आणि दुस-या दिवशी बारा वाजता तिला हो म्हटलं. तिचं मन एवढं पवित्र आणि हळवं आहे की मी तिचा चेहराही इमेज नाही करायचा…कॉलवर जेव्हा तिच्यासोबत बोलायचा, तेव्हा वाटायचं असंच बोलत राहावं. आजही मन तिचा आवाज ऐकायला माझे कान आतुरलेले असतात.

प्रेम ही गोष्टच किती आल्हाददायक आहे ना, बघितलं तर किनारा…ज्या किना-यावर रोज भेटावं आणि प्रेमाच्या तुडूंब सागरात पोहावं…फार नशिबवान असतात ती लोकं ज्याचं या आयुष्यात त्याच्यावर कुणी तरी प्रेम करणारं असतं. माझ्या नशिबाचे रेशमीबंध तिच्यासोबतच बांधलेले…ती खरंच खूप गोड आहे. माझी खूप जवळची जिवलग मैत्रीण आणि त्याहीपेक्षा जास्त माझं प्रेम आहे ती…आठवत असेल तिला मी एकदा म्हटलं होतं की, मी तुझ्यावर खूप प्रेम करतो गं! तर ती म्हणाली, ” हो! डोळे लावून तुमच्यावर माझा विश्वास आहे.” तिला माहित आहे. जेव्हा ती माझ्या आयुष्यात आली, तेव्हा मला जगण्याला नवी दिशा मिळाली.

आयुष्यात किती दु:ख असताना पण माझ्या प्रत्येक सुख-दु:खात ती सहभागी असायची…मला माझं आयुष्य माझ्या आवडत्या व्यक्तीच्या संगतीमध्ये घालवायला खूप आवडतं. तिचं एज्युकेशन छान झालं आणि तिला तिचं स्वप्न साकार करायचं होतं. ते पूर्ण होईपर्यंत असंच दूर राहावं लागेल. कदाचित स्वप्न पूर्ण झाल्यानंतरही प्रत्यक्षात एकमेकांसमोर येवून भेट होईल की नाही माहित नाही. पण मनाने मात्र नक्कीच जवळ आहोत.

मनात प्रेम खूप आहे, पण व्यक्त करता येत नाही. तिची काळजी खूप आहे, पण दाखविता येत नाही. लिहिण्याची फार आवड आहे. ती जे जे माझ्यासाठी केलं ते, तिचे रूप, तिच्यासोबतचे क्षण…यांची शिदोरी सोबत आहे. ती ह्रदयाच्या कप्प्यात नेहमीसाठी जपलेले…तरीही तिचा विचार करता शब्दही का अबोल होतात, यावर प्रश्नचिन्ह आहे. कल्पना करून काल्पनिक कथा करताना त्यांना त्या कथेत वेगळे करताना मनाला कसलेही घाव होत नाही; पण ती दूर जाण्याची कल्पनाही सहन होत नाही…या नात्याला, या प्रेमाला काय नाव द्यायचं? हेही कळत नाही. एकमेकांशी भांडल्याशिवाय रुसवा, फुगवा येत नाही. रुसव्या, फुगव्याशिवाय दुरावाही येत नाही…

दुराव्याशिवाय जीवनात एकमेकांची गरजही कळत नाही. पाहिलं तर वाटतं जीवन खूप छान आहे; पण जीवनाच्या रस्त्यावरील काटे गळल्याशिवाय अश्रूही येत नाही. हातात हात घेऊन क्षितिजापल्याड जावंसं वाटतं; पण सत्य हेच की, क्षितिजापलिकडं कुणालाही जाता येत नाही. मोठमोठ्या गोष्टी कराव्याशा वाटत नाही. पण वचनाशिवाय प्रेमात विश्वासाची पोकळी भरूनही निघत नाही. कळतच नाही काय विचार करावं..? हे विचार विचारात पाडतात…विचारांवर विचारांचा मारा होतो. शेवटी मन अस्वस्थ होतं. वाईट बोलायला आवडत नाही; पण मन अस्वस्थ असताना वाईट केव्हा बोलून टाकतो हे स्वत:लाही कळत नाही. सगळेच म्हणतात, हे प्रेम नसते…वयाचं आकर्षण असतं. जर सगळंच आकर्षण असतं तर प्रेम कसं मरत नाही? मग प्रेमाचं अस्तित्वच दिसत नाही. मन सांगतं ही ओढ म्हणजे प्रेम आहे. ह्रदय म्हणतं हे ह्रदयाचे जोरजोरात धडधडणे म्हणजे प्रेम आहे. दिमाखावर जोर टाकल्यास वाचलेल्या प्रेमाच्या अनेक व्याख्यांवरून तोही म्हणतो, हे प्रेम आहे. मग आकर्षण काय आहे..? या नात्याचं नाव तरी काय आहे..?

तिला ठेच लागली की, अश्रू मला का यावे..? हे भाव काय आहेत..? तिचा भूतकाळ डोळ्यांसमोर उभा राहताना…तिला भारी दु:खात पाहताना…मन बेचैन होते, ह्रदयाला कोरल्यागत होते. मन फार दुखते…हे घाव काय आहेत..? तिचा भूतकाळ समोर उभा राहताना तिला आनंद द्यावंसं वाटतं; पण ते क्षण आता हातात नाहीत आणि जे आहेत त्या क्षणात कधी मुलगा म्हणून तर कधी इतर जबाबदारी म्हणून याही क्षणात आनंद देता येत नाही. मनाला दुखावतो…आईबाबांचा विचारच येत नाही, असं त्यांना वाटतं. पण त्यांचा विचार येतो. प्रियकर म्हणून तिच्याच विचारात राहिल्याने इतर गोष्टींकडे दुर्लक्ष होतं…पण मग…माझ्या भावनांचं काय..? कुठे दबवू तिच्याशिवाय अपूर्ण वाटणारी भावना…तिच्यासोबत जगण्याची, हसण्याची भावना…डोक्या, खांद्यावर डोकं ठेवून रडण्याची भावना…तिच्यासोबत जुळलेल्या मनाला आवडणा-या प्रत्येक भावना…मनाला आवडणारी गोष्ट झाली की, मन खुूश असते ना…मग विविध जबाबदा-यांत मनालाच तर मारावं लागतं. स्वत:लाच खूश ठेवू शकलो नाही तर काय जीवन…काय दुस-यांच्या चेह-यावर हास्य आणता येणार…मग काय करायचं..? प्रेम निभवायचं…फक्त निभवायचं की, पूर्ण निष्ठेनं निभवायचं. परत तोच प्रश्न निभवत असलेल्या नात्याला, प्रेमाला काय नाव द्यायचं..?

तिच्यावर लिहायला बरंच काही आहे. पण लिहिताना काय लिहू आणि काय नाही असं होऊन शब्दही अबोल होतात. आठवणींच्या पालव्या गडून पडतात आणि भेटीच्या क्षणांना नजरेत साठवतं. क्षितिजापल्याड जाऊन चंद्र मावळतो, तसा काहीसा न मिटणारा, न संपणारा तिचा-माझा जीवनप्रवास अधोरेखित होतो…अजून आयुष्य पूर्णपणे जगलेलो नाही; पण आयुष्यात ती मिळावी हेच माझं अहोभाग्य समजतो. आठवणी आणि तिच्या-माझ्या प्रेमाचे विणलेले क्षण तिच्यापर्यंत पोहचविण्याचा हा छोटासा प्रयत्न…तिला नक्कीच आवडेल. चला, उगीच ती माझी काळजी करत बसेल…ती माझ्या काळजीत पडायला नको…तिने स्वत:कडे लक्ष द्यायला हवं…स्वत:चं ध्येय साध्य करायला हवं. पुरे आता! शब्द लांबत चालले. पूर्ण विराम घेतोय मी…

बांधली होती गाठ त्याने
आमच्या पवित्र नात्याची
नियतीलाच मान्य नव्हतं की
नजर लागली कुणाची

✒️शब्दस्पर्शी:-सुनील शिरपुरे(कमळवेल्ली,यवतमाळ)मो:-७०५७१८५४७९