जिगरबाज…!

41

कशाला उद्याची बात
आजच आखतोय बेत भविष्याचा
येऊ दे संकटे हजार..
थांबणार नाही कधी
थकणार तर नाहीच
तो खरा ‘जिगरबाज’

समाजाची अनेक अंगे आहेत. तशा अनेक शरीरप्रकृती पण आहेत. कोणी शरीराने निरोगी आहे; तर कोणी रोगी! कोणी दिसायला व्यवस्थित आहे; तर कोणाचा एखादा अवयव निकामी आहे. कोणाचे शरीर चांगले असताना त्याचे मन त्याच्या चांगल्या शारीरिक भागाला व्यवस्थित काम करू देत नाही. तर कोणाच्या शरीराचे अवयव व्यवस्थित नसल्यामुळे त्याच्या मनाची इच्छा असूनही त्याचे ते शारीरिक अंग त्याला ते काम करू देत नाही. पण कधी-कधी घडते असे की ते अविश्वसनीय वाटते. आपण नेहमी म्हणतो, आपले मन शरीरावर हावी आहे; तसे एखादया वेळेस सकारात्मक दृष्टीने घडतेही. हे मन कधीकधी शरीराच्या कमकुवत अंगावरती एवढे हावी होते की त्या कमकुवत भागालाही काम करायला लावते. तो कमकुवत भाग किंवा शरीराची एखादी कमजोरी यालाच आपण ‘अपंगत्व’ म्हणतो आणि त्या शरीरप्रकृतीच्या माणसाला ‘अपंग’! अपंगाला ‘अपंग’ म्हणू नये, म्हणून शासनही सध्या त्यांना ‘दिव्यांग’ म्हणत आहे. एखादा व्यक्ती अपंग असेल आणि तो भिक मागत असेल तर आपण ठीक आहे म्हणतो. पण तो अपंग नसताना भीक मागणे हे ठीक नाही. पण आपल्या अपंगत्वावर मात करून अपंग असणाऱ्या लोकांसह अपंग नसणाऱ्यांनाही प्रेरणा देणाऱ्या एका प्रेरकाविषयी आज मला आपल्याला सांगायचे आहे.

‘प्रशांत चंद्रकांतराव कुलकर्णी’; वय वर्ष- 29! काळी दाढी- मध्यम कट केलेली; सडपातळ बांधा, गहूवर्ण असलेला, दिसायला जेमतेम देखणा पण स्वच्छ व नीटनेटके राहणीमान असलेला, सतत हसतमुख, कामात व्यग्र असलेला ‘प्रशांत;’

आपण नांदेड येथील ऐन मोर चौकाच्या समोरच्या जागृती बिल्डिंगमधील, तळमजल्यावर कोपऱ्यातील गाला जिथे ‘सप्तश्रृंगी’ नावाचे संगणकाशी निगडित त्याचे छोटेसे दुरुस्तीचे दुकान आहे, तिथे पहाल! त्याचे हात व पाय सतत हालत असतात. त्याची ती हालचाल ऐच्छिक की अनैच्छिक काही लक्षात येत नाही. बोलण्यात तोतरेपणा, पण आपले म्हणणे पटविण्याचे प्रयत्न उल्लेखनीय! चेहऱ्यावर नेहमी हास्य. चेहरा तसा ताजतवानाच असतो. इतका आनंदी दिसतो की त्याच्यात कुठली गोष्ट कमी आहे, हे जाणवतच नाही. प्रशांतला मी गेल्या तीन महिन्यांपासून ओळखतो. म्हणजे त्याआधी माझी अन् त्याची ना ओळख होती, ना कधी मी त्याला पाहिले होते; न कधी कोणाच्या बोलण्यातून त्याचा उल्लेख मी ऐकला होता. मग तीन महिन्यानंतर मला त्याच्यावरती लिहावे का वाटले? या मागचे कारण फार वेगळे पण तितकेच सोपे आहे. ते सांगेल पुढे. प्रशांतचा व्यवसाय म्हणजे आपल्या सामान्य माणसाच्या भाषेमध्ये झेरॉक्स, प्रिंट्स काढून देण्याचा. परंतु तो वर वरचा लोकांना दिसणारा व्यवसाय आहे. त्याच्याच कम्प्युटरच्या भाषेमध्ये सांगायचे झाले तर तो ‘कम्प्युटर नेटवर्किंग आणि हार्डवेअर’चा व्यवसाय करतो.

न्यूज पोर्टलला शासनमान्यता!

म्हणजे तो कम्प्युटर-प्रिंटर यांची दुरुस्ती, डीटीपी वर्क्स, लोकांच्या निमंत्रण पत्रिका छापून देणे आणि प्रिंट्स काढणे अशी विविधांगी कामे करतो. यासाठी त्याने दहावी झाल्यावर दोन छोटे डिप्लोमा व दोन सर्टिफिकेट कोर्स केले आहेत. तसे पहायला गेलो तर, ही कामे करायला माणूस तरबेज पाहिजे. मी या ठिकाणी मुद्दाम ‘तरबेज’ म्हटले. त्या माणसाला हात-पाय पाहिजे आणि ते व्यवस्थित पाहिजे; असे मी म्हणालो नाही. कारण त्याला असणारे हात-पाय आणि ते व्यवस्थित असलेले मी आधीच गृहीत धरलेले आहे. जे आहेत ते तरबेज पाहिजे, असे माझे नेमके म्हणणे होते;आहे. प्रशांतला तर हे जे गृहित आहे, जे जरुरी आहे, तेच नेमके आहे. वरती तरबेज कुठून होणार? पण तो तरबेज नाही तर ‘महातरबेज’ आहे. चुकटकीसरशी त्याला न झेपावणारे कामही पटापटा करतो. आपण बऱ्याच ठिकाणी झेरॉक्स सेंटरवर कामे करणारी मुले पाहिली असतील, ती किती चपळाईने कामे करतात हेही आपण पाहिले असेल. परंतु असे आपण फार कमी वेळा पाहिले असेल की एखादा मुलगा जो त्या संपूर्ण कामांमध्ये एकटाच आहे; त्याचे शरीर अत्यंत कमकुवत आणि क्षीण आहे.

ते इतके कमकुवत आहे की त्याचे दोन्ही हात आणि पाय, त्याचे त्याला, त्याचे शरीर सांभाळू शकत नाही; त्याला चालवू शकत नाही; त्याचे वैयक्तिक काम व्यवस्थितरित्या करवू शकत नाही. परंतु त्याच्या आणि त्याच्या परिवाराच्या जिद्दीच्या जोरावर, त्याने कुठेही न थांबता, आपल्या नैमित्तीक कामासह त्याच्या व्यावसायिक कामांमध्ये देखील प्रगती साधली आहे. नेमका तसाच प्रशांत आहे; जो ‘वन मॅन आर्मी’च आहे. प्रशांतकडे पाहिल्यानंतर आपल्याला प्रथमदर्शनी तो अपंगच वाटतो. पण त्याची प्रत्येक कृती, तो अपंग नाही हेच परत परत दाखवून देते. तो अपंग आहे; हे सांगण्याला विशेष ज्ञान प्रत्येकाकडे असावे याची गरज नाही. त्याकडे पाहून आपण ते सहज सांगू शकतो, की तो अपंग आहे. परंतु हा वरवर अपंग दिसणारा मुलगा, जो काहीच करू शकत नाही; असे आपल्याला वाटायला लावणारा मुलगा, ज्या वेळेस एखाद्या चांगल्या शरीरप्रकृती असणाऱ्या माणसालाही जमत नाही अशी कामे स्वतःची आर्थिक क्षमता भागवून आपल्या कुटुंबालाही मदत करत असेल तर ते चांगले शरीर असणाऱ्यांना किंवा आपण अपंग आहोत या अपंगत्वाला ढाल करू पाहणाऱ्यांना, तो प्रेरणादायक का होऊ शकत नाही! निश्चितच तो प्रेरक असायलाच हवा; आणि हा प्रेरक एक तेजस्वी दिवा म्हणून प्रत्येकाच्या रस्त्यातला पक्का मार्ग असावा म्हणून हा लेखन प्रपंच आहे.

’भारत जोड़ो’ यात्रा : जाना किधर है? मंजिल कहाँ है??

इतके दिवस म्हणजे मागील तीन महिन्यांपासून त्याचे आणि माझे संबंध एक व्यावसायिक आणि ग्राहकापुरतेच होते. मी एखादी प्रिंट काढण्यासाठी त्याला पीडीएफ पाठवणे आणि त्याने ती प्रिंट काढून देणे, इतकी कामे सहज तो खुर्चीवर बसून करत असे. त्याच्या शरीरामध्ये थोडीबहुत कमजोरी असेल; असे त्याला पाहून जाणवत होते. परंतु ती कमजोरी लक्षणीय असेल, असे मला कधी यापूर्वी वाटले नाही. त्यामुळे मला त्याच्यावरती लिहावे असे देखील वाटले नाही. पण काल ज्यावेळेस मी जवळपास 40 पेजेसच्या झेरॉक्स त्याला काढायला सांगितल्या; त्यावेळेस त्याने स्वतः उठून झेरॉक्सच्या मशीनला एका जागेवरून दुसऱ्या जागेवर आणण्यासाठी, एक- एक कागद त्या झेरॉक्स मशीन मध्ये टाकून एक-एक कागद बाजूला ठेवल्यावर, ती ठेवण्यासाठी त्याला जी धावपळ करावी लागली होती, त्याच्या शरीराच्या ज्या हालचाली होत होत्या आणि त्याला त्या हालचाली घडवून आणाव्या लागत होत्या; त्यासाठी त्याची जी दमछाक होत होती, त्या हालचाली पाहून मी एक संवेदनशील माणूस म्हणून भारावून-हरवून गेलो अन् प्रशांतवरती आता लिहावेच लागेल आणि असा प्रेरणादायी स्त्रोत सर्वांना कळावा लागेल यासाठी मी प्रयत्न सुरू केले. प्रशांतसाठी मला लिहायची गरजच नाही किंवा माझ्या लिहिण्यातून त्याला प्रेरणा मिळावी इतकापण मी मोठाही नाही.

कारण त्याने त्याच्या हिम्मतीवर केलेली कामे आणि त्याची हिंमत वाढविण्यासाठी त्याच्या कुटुंबाने त्याला दिलेला आधार हीच त्याची प्रेरणा आहे; जी प्रेरणा त्याने स्वतःची स्वतःसाठी निर्माण केली आहे. मला फक्त हा प्रेरणेचा स्त्रोत आपल्या पर्यंत पोहचवायचा होता. तसाही प्रशांत नावाचा महासागर आहेच की, आणि त्याच्या नावाचा अर्थ ‘शांत’ आहे; ‘संरचित’ आहे; आणि हा मोठा सागर आणि त्याची संरचना प्रत्येक सामान्यांपर्यंत या लेखाच्या माध्यमातून जाईलच.जन्मल्याच्या सहा महिन्यापासून ते आज 29 वर्षाचा होईपर्यंत त्याने, त्याच्या संपूर्ण कुटुंबाने त्याचे शरीर असेच पाहिले आहे. त्याला किंवा त्याच्या कुटुंबाला त्याच्या अपंगत्वाला कमजोरी म्हणून त्याला पडद्याआड ठेवता आले असते; परंतु त्याला इतर कोणावरही अवलंबून न ठेवता स्वतःच्या पायावर उभे करण्याची उमेद त्याच्यामध्ये जागविण्याची त्याच्या कुटुंबाने बांधलेली मोटं खरंच वाखणण्याजोगी आहे. जरी त्याच्या बोटांच्या कमजोरीमुळे त्याच्या हाताची बोटे शाईच्या पेनने काहीच लिहू शकत नसली तरी पेनने लिहिलेला माणूसच यशस्वी होतो यासाठी न लिहिताही यशाचे शिखर गाठायला लावणारा ‘प्रशांत’ हे सर्वात मोठे उदाहरण आहे.

जरी तो काही लिहित नसला तरी त्याच बोटांचा वापर करून तो टाईपरायटिंग करून स्वतःचा उदरनिर्वाह करून रोजचे निदान हजार रुपये तरी कमावतो. बरेच प्रेरणेचे स्त्रोत आपल्या आजूबाजूला भरपूर असतील, काही स्त्रोत आपल्यापर्यंत पोहोचत असतील,काही नको असलेली तुमच्यापर्यंत येत असतील परंतु हा महास्रोत आपल्यापर्यंत पोहोचवण्याचा मी हा एक साधा आणि सोपा प्रयत्न केला आहे.आज प्रशांत जितके काही काम करू शकतो, त्यात त्याच्या आईवडिलांचा सिंहाचा वाटा आहे. त्याच्या आईचे प्रशांतच्या सेंटरच्या बाजूलाच ‘ऍक्युप्रेशर थेरपी’ सेंटर आहे.( ‘तियांशी’ ऍक्युप्रेशर अँड हेल्थ केअर सेंटर, मोर चौक, नांदेड ) ज्याच्या थेरपीमुळेच प्रशांतमध्ये परिणामकारक सुधारणा झाली.

प्रशांतकडे मी आतापर्यंत जेमतेम 5-6 वेळा गेलो असेल. आतापर्यंत त्याने केलेल्या कामाचा मोबदला ऑनलाइन रक्कम अदा करूनच दिला. त्याने म्हटले तितके पैसे मी दुसरा कुठला प्रश्न न विचारता त्याला ताबडतोब पेड केले. म्हणजे मी काही मोठे काम केले नाही. पण तो प्रिंट्स काढण्याचे पैसेच इतके कमी घेतो की आपण त्यात तोलमोल करूच शकत नाही. ऑनलाइन पेमेंट केल्यावर त्याला दाखवलेला स्क्रीनशॉट तो पाहतो, आणि त्याला पैसे पोहचल्याची होकारार्थी मान डोलावतो; त्याच्या अकाउंटला चेक न करता! मला प्रशांतला इतकेच सांगायचे की तू लगेच कोणावरही भरोसा ठेवत जाऊ नकोस! इथे लुटारू व दिखाऊंची मैफिल फार मोठी आहे. त्यात तुला गायब करायला खूप मस्तवाल लोकं आहेत. तू जसा तसा समाज नाही. तुझा भोळेपणा सगळ्यांना कळणार नाही. त्यामुळे भाबडा असशील तर तसा रहा, पण व्यवहारात जरा चोख राहून स्वतःला धनानेही रग्गड कर. आणि तू चार- दोन रुपये जास्तही घेतले तरी माझ्यासारख्यांना आंनदच होईल; आणि माझ्यासारखेही अनेक आहेत. दामदुप्पटीचे अनेक काटणारे अडकित्ते असताना तू सुपारी होऊन प्रत्येकाला गोड होऊन आर्थिक नुकसान करून घेऊ नये; असे मला तुझा प्रशंसक म्हणून वैयक्तिक वाटते.

प्रशांतचे कम्प्युटर नेटवर्किंग आणि हार्डवेअरचे शॉप मोर चौक, नांदेड येथे जागृती बिल्डिंग मध्ये आहे. कधी वेळ मिळाला, कधी चुकून या रस्त्यावर आले तर नक्की भेट द्या! त्याला अन् मला आनंद होईल.इथे शरीराने आणि बुद्धीने धष्टपुष्ट असलेले लोक शिकून मोठे होतात आणि ‘सुशिक्षित बेकार’ हा टॅग लावून आपल्या बेकारीला सरकारला दोष देऊन शांत बसतात.आता त्यांच्यामधला ‘जिगर’ हा मरणाची वाट पाहत आहे. पण जी असेल त्या परिस्थितीवर हातबल न होता, प्रतिकूल परिस्थितीवर मात करून जीवनातील कठीणातल्या कठीण आव्हानाला तोंड देणारा प्रशांत हा खरा ‘जिगरबाज’ आहे.
धन्यवाद!

प्रशांत सम्पर्क-8999271024

✒️लेखक:-अमोल चंद्रशेखर भारती(लेखक/कवी/व्याख्याते, नांदेड)मो:-8806721206