पुसेगाव श्री सेवागिरी यात्रेचा १७ डिसेंबरपासून मानाच्या झेंडा मिरवणुकीने होणार प्रारंभ

60

✒️सातारा-खटाव,प्रतिनिधी(नितीन राजे)

खटाव(दि.6डिसेंबर):-लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या येथील पुसेगाव तालुका खटाव जिल्हा सातारा येथील श्री सेवागिरी महाराजांचा यंदाचा रथोत्सव सोहळा येत्या २२ डिसेंबर रोजी साजरा होणार आहे. तत्पूर्वी दि. १७ रोजी मनाच्या झेंडा मिरवणुकीने यात्रेचा प्रारंभ होणार आहे. श्री सेवागिरी महाराजांच्या ७५ व्या पुण्यस्मरणानिमित्त सेवागिरी अमृतमहोत्सव सोहळा उत्साहात साजरा होत असून दि. १७ ते दि. २७ डिसेंबर दरम्यान, पुसेगाव येथे वार्षिक यात्रा प्रदर्शन मोठ्या दिमाखात भरवण्यात येणार असल्याची माहिती मठाधिपती श्रीमहंत सुंदरगिरीजी महाराज व देवस्थान ट्रस्टचे चेअरमन संतोष उर्फ बाळासाहेब जाधव यांनी दिली.

महाराष्ट्रासह विविध राज्यातील भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या श्री सेवागिरी महाराजांच्या यात्रेनिमित्त ११ दिवसांच्या कालावधीत विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. दि. १७ डिसेंबर रोजी मानाच्या झेंडा मिरवणुकीने यात्रेस प्रारंभ होईल. दि. १४ ते १७ डिसेंबर दरम्यान भव्य क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. दि. १७ व १८ डिसेंबर रोजी गावातली श्री हनुमानगिरी हायस्कूलच्या मैदानावर अखिल भारतीय दिवसरात्र खुल्या शुटींग व्हॉलिबॉल स्पर्धा होणार आहेत. दि. १९ डिसेंबर रोजी सकाळी अकरा वाजता श्वान शर्यतीचे आयोजन करण्यात आले आहे. दि. २० डिसेंबर रोजी जंगी बैलगाडी शर्यतीचे आयोजन करण्यात आले आहे.

दि. २१ डिसेंबर रोजी कै. नारायणगिरी महाराज यांच्या ६९ व्या पुण्यतिथीनिमित्त निकाली कुस्त्यांचे जंगी मैदान आयोजित केले आहे. या आखाड्यात रुपयांपासून १ लाख ५१

हजार रुपयांपर्यंतच्या कुस्त्या होणार आहेत. दि. २२ डिसेंबर हा यात्रेचा मुख्य दिवस असून या दिवशी परमपूज्य सद्गुरू श्री सेवागिरी महाराजांच्या पादुका व प्रतिमेची फुलांनी व नोटांच्या माळांनी सजवलेल्या रथातून सवाद्य मिरवणूक काढण्यात येणार आहे. दि. २१ ते २६ डिसेंबर या कालावधीत ‘राज्यस्तरीय सेवागिरी कृषी प्रदर्शन २०२२’ भरवण्यात येणार आहे. दि. २४ डिसेंबर रोजी सकाळी ११ ते सायंकाळी ६ वाजता जिल्हास्तरीय खुला युवा महोत्सवाचे तसेच याच दिवशी राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. दि. २५ डिसेंबर रोजी बक्षीस जनावरांची नोंद, दि. २६ रोजी ५१ बक्षीसप्राप्त जनावरांची निवड, तर दि. २७ रोजी बक्षीस वितरण समारंभ होणार आहे,यात्रेकरूंच्या व जनावरांच्या पिण्याची सोय करण्यात आली आहे.

यात्रा सुरू होण्यापूर्वी दुकानदारांनी आपल्या जागा १० दिवसांपूर्वी आरक्षित कराव्यात. दि. १२ डिसेंबरपासून जागांचे आरक्षण सुरू होणार आहे. बैलगाडी शर्यती, बक्षीस जनावरांची निवड शासनाच्या नियमांना अधीन राहून होतील, अशी माहिती विश्वस्त गौरव जाधव, संतोष वाघ, सचिन देशमुख, डॉ.सुरेश जाधव,रणधीर जाधव यांनी दिली