राजकारण धर्मावर असावे की समस्येवर?

  49

  भारत हा भौगोलिक दृष्ट्या परिपक्व देश आहे. ऐतिहासिक दृष्टीने बघितले तर परिवर्तनकारी आणि प्रेरणाकारी इतिहास आहे. देशातील नागरिकांचा सर्वांगीण विकास व्हावा, देशाचे शासन प्रशासन पारदर्शक व जनहितासाठी कार्यरत रहावे यासाठी सर्वगुणसंपन्न असे संविधान आहे. परिवर्तन, प्रगती आणि संशोधन करण्यासाठी युवकांची उर्जा सर्वाधिक आहे. शिक्षण, संशोधन आणि देशाचा विकास करण्यासाठी सर्व घटक आवश्यक असताना आपण या बाबतीत पिछाडीवर का आहोत तर याचा संबंध सरळ आहे तो राजकारणाशी. भारतामध्ये शिक्षणाला सर्वाधिक प्राधान्य देऊन शिक्षणासाठी सामाजिक बंड करून क्रांती देखील करावी लागली. संत आणि महापुरुष यांनी फक्त आणि फक्त शिक्षणाला प्राधान्य क्रम देऊन शैक्षणिक जनजागृती सोबत शिक्षणाची दारे उघडून तर्क वादी व विज्ञानवादी बनवले.

  जगाच्या पाठीवर प्राथमिक शिक्षणाचा शोधही लागला नसेल अशा वेळी भारताकडे नालंदा, तक्षशिला, विक्रमशिला आणि वल्लभी सारखे विश्वविद्यालये होते. सहा हजारापेक्षा जास्त विद्यार्थी राहु शकतील अशी व्यवस्था त्या काळी होती. परंतु प्रतीक्रांतीच्या काळात ती विश्वविद्यालये जाळून टाकली आणि भारतातील शिक्षण नष्ट करण्याचा प्रयत्न केला परंतु त्यातून परदेशी विद्वान शिकुन गेल्याने त्याचा इतिहास तरी जिवंत राहीला. इतिहासातील शिक्षणाचा आणि आजच्या शिक्षणाचा काय संबंध असा प्रश्न येईल कारण आम्हाला इतिहास विषय कंटाळवाणा वाटतो. आणि सत्य इतिहास तर पचनी पडणारा नसल्याने न वाचलेलाच बरा असे महान विचार भारतीय लोकांकडे आहेत. असो तेव्हाही शिक्षण नष्ट करून राजसत्ता प्रस्थापित करून ती वर्षानुवर्षे टिकावी म्हणून भारतीय लोकांना राजसत्तेतील लोकांनी भारतीय लोकांना शिक्षणच मिळू दिले नाही. शिक्षण मिळू दिले नाही म्हणून माणसिक गुलाम बनविण्यात ते यशस्वी झाले आणि मानसिक गुलाम आजही मोठ्या प्रमाणात आपल्याला आपल्या देशात बघायला मिळतात.

  शिक्षणाच्या अभावाने एवढे मानसिक गुलाम लोक झालेले आहेत की कधी कधी त्यांच्या बुद्धीची किव येते. इस्ट इंडिया कंपनी भारतात आली आणि त्यांनी भारतीय लोकांना शिक्षण द्यायला सुरुवात केली. इस्ट इंडिया कंपनीने सुरु केलेल्या शिक्षणाला सुद्धा विरोध होऊ लागला. त्यातच महात्मा फुले हे शैक्षणिक क्रांती करत आहेत हे बघुन अजुनच विरोध झाला. आणि शिक्षण थांबवावे या साठी खूप प्रयत्न झाले. माणसाने शिक्षण घ्यावे याला एवढ्या टोकाचा विरोध होणे हे जगाच्या इतिहासातील भारत एकमेव उदाहरण असेल. शिक्षणाने खरचं एवढे परिवर्तन होते याची जाणीव च आम्हाला राहली नाही. महात्मा फुले शिकले समस्त महिलांना शिकवले, शाहु महाराज शिकले त्यांनी त्यांनी भास्करराव जाधव आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना घडवले. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर शिकले सर्वांना शिक्षणाचा अधिकार दिला आणि सर्वांना समान मान सन्मान आणि किंमत दिली हे परिवर्तन शिक्षणानेच होते म्हणून आजही लोकांना शिक्षणापासून दुर करून त्यांना धार्मिक, अंधविश्वासु आणि भावनिक बनवले जात आहे.

  संविधान लागु झाल्यानंतर शिक्षणाची दारे खुली झाली सर्वजन एकाछताखाली शिकु लागली, शिकून तर्क आणि चिकित्सा करून प्रश्न विचारू लागली आणि काही प्रश्नांची उत्तरे देऊन सत्ता धोक्यात तर येणार नाही ना याच्या भितीने पुन्हा शिक्षणाची दारे बंद करण्याचा प्रयत्न केल्या गेला. आणि हे काम केले ते राजकारणाने. राजकारण हे समाजाच्या सामाजिक समस्या सोडवण्यासाठी अत्यावश्यक असते. जनप्रतिनिधींनी जनहिताचे व देशहिणाचे कार्य करून जनतेच्या उद्धारासोबतच देशाची निरपेक्ष प्रगती साधने आवश्यक असते. परंतु भारतीय राजकारणाने वेगळेच वळन घेऊन तर्क, चिकित्सा बाजूला राहुन शिक्षण, आरोग्य, रोजगार, सामाजिक न्याय, स्त्रि अत्याचार, अंधविश्वास, अघोरी कृत्ये, अमानुष अत्याचार अशा अडचणी सोडवून देशात शांतता, सुरक्षितता अबाधित राहुन राष्ट्र एक संघ राहील्या जाईल या प्रकारचे विषय राजकारणाच्या पटलावर असायला पाहिजे होते. परंतु आज धार्मिक आणि भावनिक विषय निवडणूक पटलावर घेऊन लोकांची दिशाभूल केली जाते. आणि म्हणुनच देशामध्ये तरुणांची उर्जा असुन देखिल वेगवेगळ्या भागामध्ये विभाग्यात आली. म्हणून तरुणांच्या उर्जेचा स्पार्क आपल्याला सामाजिक समस्येवर दिसत नाही.

  उलट पक्षी राजकीय क्षेत्रात तरुण लवकर पेटून उठतात त्याचे कारण आहे. आम्ही उपाशी राहु, बेरोजगार राहु , शिक्षण कमी शिकु पण आमचा नेता व पक्ष याबद्दल आम्ही काहीही ऐकुन घेणार नाही. राजकीय पक्षानी धार्मिक आणि भावनिक विषय पक्षाच्या अजेंड्यावर आनुन तरुणांना देशहित शिक्षण आरोग्य रोजगार थोडक्यात मुलभूत सुविधा आणि अधिकार यांच्या पासून कोसो दूर नेऊन ठेवले. धार्मिक आणि भावनिक बनवल्याने कोणत्या ही पक्षाला आयडोलॉजी असो की नसतो, नेत्यामध्ये गुण आणि पात्रता असो की नसो म्हणून काही घेण देणे फक्त जात आणि धर्म बघुन उमेदवारांना निवडून आणण्याचा अट्टाहास केला जातो. अनुसूचित जातीचे लोक आपल्याच नेत्याला व त्यांच्या पक्षाला जास्त उचलून घेतात, मुस्लिम मध्येही तसच, हिंदु मध्ये दोन गट एक कट्टर हिंदुत्व जे हिंदुत्वाच्या गप्पा मारतात आहे मते मिळवून पोळी भाजून घेतात, दुसरा कट स्वतः ला सेक्युलर समजतो पण पाटील पाटील, देशमुख देशमुख अस बघुन नेता आणि पक्ष ठरवला जातो विषेश म्हणजे नेत्याने काय काय काम केले माहिती नसते, पक्षाचा अजेंडा काय आहे माहिती नसते. केवळ आणि केवळ जातीचा आहे म्हणून नेता आणि पक्ष यांना महत्व दिले जाते म्हणून निवडणूकीच्या वेळी अजून जास्त भावनिक केले जाते आणि महागाई, बेरोजगारी, वाढतच जाते. सर्वात महत्वाचे म्हणजे जो पक्ष सत्तेत असतो त्यांच्या चले चपेटांना महागाई बेरोजगारी आरोग्य सुविधांचा अभाव दिसत नाही ते फक्त विरोधी पक्षाला दिसते.

  आणि विरोधी पक्ष सत्तेत गेला की पुन्हा जो विरोधी पक्ष राहील त्याला सामाजिक समस्या दिसतात. सत्तेत असताना सत्ताधारी जोश मध्ये असतात शिक्षण बेरोजगार महागाई यावर काही काम होत नाही, विरोधी पक्ष ओरडतात पण त्यांना काही करता येत नाही. सत्तेत असलेले विरोधी, व विरोधी असलेले सत्तेत जातात सर्व जन मिळून मिसळून लुटतात. आणि कार्यकर्ते नेता आणि पक्ष यांच्या कामाची माहिती जरी नसली तरी गुणगान गातात. परिणाम सामाजिक समस्या वाढत जातात. व्यक्ती पुजक लोकांना वाटत आपला पक्ष सत्तेत आला म्हणजे समस्या सुटल्या पण खऱ्या अर्थाने तिथुनच समस्या सुरू होतात.

  भारत सर्वात खराब शिक्षणाच्या बाबतीत क्रमांक दोनवर आहे. जेथे सर्वाधिक खराब शिक्षण मिळते त्या देशाकडून जग काय अपेक्षा ठेवेल आणि देशातील तरुण देशात राहुण काय साध्य करू शकतील. खराब शिक्षणाला कुटील राजकारणाने बदनाम करून देशाला कमकुवत करून टाकले आहे. परंतु या गंभीर समस्येकडे अजूनही कोणी जास्त गांभिर्याने बघत नाही. आजचे राजकारण तरुणांना धार्मिक भावनिक बनवते म्हणुन आजच्या तरुणांना वाटते धर्म धोक्यात आहे म्हणुन आपण लढले पाहिजे. परंतु इकडे शिक्षण, रोजगार, शेवटच्या श्वास घेत असताना भ्रष्टाचाराचे स्तोम माजलेले आहे. सुड भावनेतुन शासकीय यंत्रणेचा गैरवापर करून सरकार वरची विश्वासहर्ता गमावलेली आहे. परंतू तरीही लोक धर्म जात बघुनच नेता आणि पक्ष यांच्या कडे आकर्षित होतात. नाही की नेत्याचे काम बघुन. आज जे काही राजकारण केले जाते ते एकतर घराणेशाही, किंवा धार्मिक या गोष्टी लक्षात घेऊनच केले जाते. जनतेच्या हिताचे काम करणारा, शिक्षण आरोग्य रोजगार यावर लक्ष देऊन मुलभूत सुविधा प्रदान करून मतदार संघाची जडणघडण करणारा, जनतेच्या संपर्कात राहुन जनतेचे प्रश्न समजून त्यांचा आवाज विधानसभा लोकसभा मध्ये उठवणारे नेतेचे या धार्मिक आणि भावनिक राजकारणाने निर्माण होऊ दिले नाही. लोकांना धार्मिक आणि भावनिक बनवून सामाजिक समस्या वाढवलेल्या आहेत.

  परंतु राजकीय नेत्यांनी स्वतः च्या दहा पिढ्या आरामात बसुन खातील एवढ्या कमाया करून ठेवल्या आणि गावात स्वच्छ पाणी, रस्ता दुरुस्ती करण्यासाठी निधीच मिळत नाही म्हणून त्या समस्या वर्षानुवर्षे तशाच खितपत पडलेल्या आहेत. याचे सर्वात महत्त्वाचे कारण आहे राजकारण करणाऱ्या लोकांनी लोकांच्या मनातून सामाजिक समस्या वर राजकारण केले जाते हे बाहेर काढून धर्म आणि भावना पेरल्या आणि तेच समाजात उगवले. म्हणुन जागृत नागरिकांना आपले हक्क अधिकार, आपल्या समस्या सोडविण्यासाठी, आपला आवाज उठवण्यासाठी आपण धर्म जात नाही तर सामाजिक समस्या सोडवणाऱ्या खऱ्या अर्थाने जनहिताचे काम करणाऱ्या नेत्यांकडे आकर्षित होऊन त्यांना समर्थन करणे आवश्यक आहे. तरच देशातील राजकारण योग्य दिशेने वाटचाल करेल.
  *************************************
  ✒️विनोद पंजाबराव सदावर्ते(रा. आरेगांव ता. मेहकर)मो:-९१३०९७९३००
  *************************************