रेती माफियांचे ट्रक- ट्रॅक्टर जोमात तर शेतकऱ्यांचे पीक धुळात!

    44

    ?ब्रम्हपुरी तालुक्यातील धुळीने खराब झालेले पीक बघून शेतकरी हतबल

    ✒️रोशन मदनकर(उप संपादक)

    ब्रम्हपुरी(दि. 28फेब्रुवारी):- बांधकामासाठी रेती आवश्यकच आहे. रेतीचे दरही नियंत्रणात राहणे आवाक्यातील घरांसाठी आवश्यक आहे तर दुसरीकडे सरकारी महसूल बुडता कामा नये. अशी कसरत सुरू असतानाच रेती तस्करी आणि त्या आडून चालणाऱ्या गुन्हेगारीचे मोठे संकट निर्माण झाले आहे. सरकारी अधिकाऱ्यांवर जीवघेणे हल्ले करण्यापर्यंत मजल गेली आहे.

    अवैद्य रेती चोरीला आळा घालण्यासाठी सरकारने कडक नियम केले आहेत. परंतु या नियमांची अंमलबजावणी होत नाही. सकाळपासून तर सायंकाळ पर्यंत रेतीचा उपसा करण्याचा नियम असला तरी रात्रीच्या वेळेस रेतीचा मोठ्या प्रमाणात उपसा होत आहे. नदीपात्रात वाहने उभी करुन त्यात रेती भरून भरवेगात गावाच्या बाहेर ट्रक – ट्रॅक्टर धावत असतात. या रात्रौच्या अवैद्य रेती कारवाईसाठी महसूल विभागातील तहसीलदारांचे पथक कार्यरत आहे. परंतु या पथकावर हल्ले करण्याचे प्रमाण वाढले आहे. कारवाईसाठी आलेल्या पथकांवर दगडफेक करणे, मारहाण करणे यांसारखे प्रकार सातत्याने घडत आहेत. ब्रम्हपुरी तालुक्यातील वैनगंगा नदीपात्रातून चोरट्या मार्गाने रेतीचा उपसा करून काही काळ ही रेती साठवायची नंतर अधिक भावाने रेती विक्री करुन अमाप पैसे कमवायचे. असा धंदा सध्या जोरात सुरू आहे.

    नदीपात्रातून रेतीचा अमर्याद उपसा होत असल्याने नदी पात्रात मोठे खड्डे पडले आहेत. नदीची पाणी धरुन ठेवण्याची क्षमता यातून कमी झाली आहे. नदीची पाणी धरून ठेवण्याची क्षमता कमी झाल्याने शेतकऱ्यांच्या विहिरीतील पाणी पुरवठा खंडित होत आहे. आणि सर्व पिकावर धूळ बसल्याने शेतकऱ्याचे पीक धुळीत जात आहे. रेती तस्करीचा सरकारवरच नाही तर दिवसरात्र राबणाऱ्या बळीराजाचा मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे. भारत हा शेतकऱ्यांचा देश असल्याने संबंधित महसूल विभागाने शेतकऱ्यांचा विचार करून धुळीत मिळणारे शेतकऱ्यांचे पीक वाचविण्यासाठी रेती तस्करावर लवकरात-लवकर कारवाई करावी अशी शेतकऱ्यांची मागणी आहे.