🔺सर्व प्रलंबित प्रकरणे महिनाभरात निकाली काढा

🔺प्रलंबित प्रकरणांसाठी नोडल अधिकारी नेमावेत

मुंबई(दि.२२जुलै):-अंगणवाडी सेविकांना सेवानिवृत्तीनंतर देण्यात येणाऱ्या विम्याच्या रक्कमेचा धनादेश तात्काळ निवृत्तीच्या दिवशीच त्यांना देता येईल अशी प्रक्रिया राबवावी; तसेच सध्या प्रलंबित असलेली विमा प्रकरणे महिनाभरात निकाली काढावीत, असे स्पष्ट निर्देश महिला व बालविकास मंत्री ॲड. यशोमती ठाकूर यांनी आज दिले.

अंगणवाडी सेविकांना सेवानिवृत्तीनंतर १ लाख रुपये विम्याची रक्कम देण्यात येते. मात्र, ही रक्कमदेखील सेवानिवृत्तीनंतर लगेच न मिळता बऱ्याच विलंबाने मिळत असल्याच्या तक्रारी मंत्री ॲड. ठाकूर यांच्यापर्यंत आल्या होत्या. त्यांनी याची तात्काळ दखल घेतली आणि आज भारतीय आयुर्विमा महामंडळाच्या (एलआयसी) अधिकाऱ्यांना या संदर्भात मार्ग काढण्याच्या दृष्टीकोनातून बैठक घेतली. यावेळी महिला व बालविकास विभागाच्या सचिव श्रीमती आय. ए. कुंदन आणि एकात्मिक बालविकास योजना आयुक्त श्रीमती इंद्रा मालो उपस्थित होत्या.

सेवानिवृत्त अंगणवाडी सेविका, मदतनीस यांची एलआयसी विम्याची प्रकरणे प्रलंबित असल्यामुळे त्यांना आर्थिक अडचणींना सामोरे जावे लागत होते. त्याबाबत माहिती घेतानाच ॲड. ठाकूर यांनी विमा प्रक्रियेबाबतही माहिती जाणून घेतली. विम्याच्या दाव्यांवर सेवानिवृत्तीनंतर प्रक्रिया सुरू करण्यात येत असल्यामुळे विलंब होत असल्याचे लक्षात घेऊन विम्याचे पैसे सेवनिवृत्तीच्या दिवशीच मिळण्याकरिता निवृत्तीपूर्वी 2 महिने आधी प्रक्रिया पूर्ण करण्याचे निर्देश त्यांनी अधिकाऱ्यांना दिले. तसेच अंगणवाडी सेविका, मदतनीस या लहान बालकांचे पोषण, गर्भवती महिला, स्तनदा मातांचे पोषण, आरोग्य यासाठी समर्पण भावनेने काम करत असताना त्यांचेच देणे दीर्घकाळ प्रलंबित राहणे हे योग्य नाही. त्यामुळे सध्या असलेली सर्व प्रलंबित प्रकरणे तात्काळ निकाली काढून त्यांना दिलासा द्या; प्रकरणे तात्काळ निकाली काढण्याकरिता स्वतंत्र नोडल अधिकारी नेमावेत, असे निर्देशही ॲड. ठाकूर यांनी यावेळी दिले.

महाराष्ट्र, मागणी, रोजगार, विदर्भ, सामाजिक 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

©️ALL RIGHT RESERVED