🔹मुख्यमंत्र्यांच्या ओबीसी बैठकीत जोरदार मागणी

✒️मुंबई(पुरोगामी संदेश नेटवर्क)

मुंबई(दि.22जुलै):-मुस्लीम ओबीसी समाजाला भरीव मदत द्या असे ऑल इंडिया मुस्लीम ओबीसी ऑर्गनायझेशन चे मंत्रालयीन सचिव शाहरुख मुलाणी यांनी महाराष्ट्र राज्य मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या समवेत नुकतेच झूम या अप्लिकेशनच्या व्हिडीओ कॉन्फरन्स द्वारे झालेल्या बैठकीत जोरदार मागणी केली आहे व त्याबाबतचे ईमेल द्वारे पत्र सुद्धा दिले आहे.

यावेळी मुलाणी म्हणाले की, महाराष्ट्रात सुमारे 01 कोटी 29 लाख इतकी लोकसंख्या आहे. त्यापैकी बहुसंख्य हे बलुतेदार पद्धतीने काम करत आहेत. लॉकडाऊन मुळे त्यांचे उदरनिर्वाह होणे अडचणीचे झाले आहे. अशात अल्पसंख्याक आयोगाला अधिकार व निधी देणे, मुस्लीम विद्यार्थ्यांना शिषवृत्ती देणे, प्रत्येक जिल्ह्यात मुला – मुलींसाठी स्वतंत्र वसतिगृह करणे, आरक्षणाचा विचार होणे, मुस्लीम विद्यार्थ्यांमध्ये शिक्षणाचे प्रमाण कमी आहे त्यामुळे बालमजूर व बाल गुन्हेगारी वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही त्यानुसार शिक्षणावर भर देणे, शिषवृत्ती साठी होणारी पायपीट थांबविण्यासाठी विशेष नियमावली करणे, मुस्लीम बहुल भागात मराठी भाषेची जागृती करणे, मुस्लीम ओबीसी साठी शासकीय अनुदानित कोर्स कमी आहेत ते वाढविणे, उर्दू भाषेचा दर्जा खालावत चालला आहे त्यामुळे उर्दू शाळेचा दर्जा सुधारणे, राज्यात 10 टक्के मुसलमान लोकसंख्या आहे, त्यातील 40 लाख लोक हे उर्दू बोलतात त्यांच्यासाठी उर्दू भाषेचे जतन व संवर्धन करण्यासाठी मासिक सुरु करणे, शिषवृत्ती 25 हजार वरून 50 हजार करणे, परदेश शिक्षणासाठी बिनव्याजी कर्ज मौलाना आझाद महामंडळ तर्फे देणे, इंजि. पदवी सारखे फार्मसी साठी द्वितीय पाई शिक्षण पद्धत सुरु करणे, मुंबई जोगेश्वरी येथील इस्माईल युसुफ मध्ये तात्काळ वस्तीगृहासाठी मंजुरी देणे, मुस्लीम ओबीसी समाजाला न्याय देण्यासाठी बार्टी व सारथी च्या धर्तीवर एखादे संचालनालय किंवा संस्था स्थापन करणे, अल्पसंख्याक विभागाला अनुदानात वाढ करणे, तसेच महत्वाचे म्हणजे अल्पसंख्याक विभागातील शाळांचे पायाभूत सुविधा देण्यासाठी असलेले अनुदान 02 लाख वरून किमान 05 लाख करण्यात यावे अशा महत्त्वाच्या मुद्दांना ऑल इंडिया मुस्लीम ओबीसी ऑर्गनायझेशन मंत्रालयीन सचिव शाहरुख मुलाणी यांनी वाचा फोडली.

या दरम्यान ओबीसी समाजावर अन्याय होऊ देणार नाही असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी ग्वाही दिली. यावेळी सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण, अन्न, नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ, नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे, इतर मागास बहुजन कल्याण विकास मंत्री विजय वडेट्टीवार, सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे, ओबीसी-व्हीजेएनटी संघर्ष समितीचे प्रकाश शेंडगे, हरिभाऊ राठोड, महाराष्ट्र शासन ओबीसी विभागाचे सचिव जे. पी. गुप्ता, संजय कुमार, विकास खर्गे, अप्पर मुख्य सचिव सीताराम कुंटे आदी अधिकारी व यांच्यासह ओबीसी चळवळीतले अनेक नेते व्हिडिओ कॉन्फरन्सींगमध्ये सहभागी झाले.

महाराष्ट्र, मागणी, मुंबई, सामाजिक 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

©️ALL RIGHT RESERVED